Monday, 17 December 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 17.12.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 17  December 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १७ डिसेंबर २०१  दुपारी .०० वा.

****



 राफेल खरेदी प्रकरण आणि कावेरी खोऱ्यातल्या समस्यांच्या मुद्यावरुन संसदेच्या कामकाजातला व्यत्यय आजही कायम आहे. आज सकाळी दोन्ही सदनांचं कामकाज सुरू होताच, काँग्रेसचे सदस्य राफेल प्रकरणी संयुक्त संसदीय समितीच्या मागणीसाठी तर अण्णाद्रमुकचे सदस्य कावेरी खोऱ्यातल्या शेती समस्यांच्या मुद्यावरुन, तेलगुदेशम पक्षाचे सदस्य आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी, जोरदार घोषणाबाजी करत हौद्यात उतरले. भारतीय जनत पक्षाच्या सदस्यांनीही, राफेल प्रकरणी अपप्रचार करून देशाची दिशाभूल केल्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी माफी मागावी, या मागणीसाठी घोषणाबाजी केली. या गदारोळाबद्दल राज्यसभेत सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी नाराजी व्यक्त करत, सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं, तर लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सदनाचं कामकाज प्रथम बारा वाजेपर्यंत स्थगित केलं.



 कामकाज पुन्हा सुरू झाल्यावरही गदारोळ कायम होता, या गदारोळातच अध्यक्षांनी शून्य प्रहराचं कामकाज पुकारलं. मात्र गदारोळ वाढत गेल्यानं, अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित केलं.

****



 संसदेत अनेक महत्त्वपूर्ण विधेयकं संमत करण्यासाठी विरोधी पक्षानं सहकार्य करणं आवश्यक असल्याचं, संसदीय कामकाज मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी म्हटलं आहे. संसद भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना तोमर यांनी, सरकार प्रत्येक मुद्यावर चर्चेसाठी तयार असून, सर्वच राजकीय पक्षांकडे सरकारनं ही भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली असल्याचं सांगितलं.

****



 राफेल विमान खरेदी प्रकरणी, काँग्रेस पक्ष आणि गांधी परिवारानं सर्वोच्च न्यायालयाचा निकालही अमान्य ठरवणं, ही त्यांची हिंमत अचंभित करणारी असल्याचं, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होत्या. या संदर्भात भारतीय जनता पक्षानं आज देशभरात ७० ठिकाणी पत्रकार परिषदा घेऊन, राफेल प्रकरणी काँग्रेस पक्ष देशाची दिशाभूल करत असल्याची माहिती दिली.

****



 राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणून ज्येष्ठ नेते अशोक गहलोत यांनी आज शपथ घेतली. राज्यपाल कल्याणसिंह यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. गहलोत तिसऱ्यांदा राजस्थानचे मुख्यमंत्री झाले आहेत. काँग्रेसचे युवा नेते सचिन पायलट यांना यावेळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली.



 मध्यप्रदेश आणि छत्तीसगढमध्येही आज नवनिर्वाचित सरकारचा शपथग्रहण सोहळा होत आहे. मध्यप्रदेशात ज्येष्ठ नेते कमलनाथ तर छत्तीसगढमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भूपेश बघेल मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

****



 राज्य शासनाच्या वतीनं प्रत्येक जिल्ह्यात आयोजित ग्रंथ महोत्सवांच्या फलश्रृतीचा आढावा घेऊन,  त्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता ज्येष्ठ साहित्यिक रा.रं बोराडे यांनी व्यक्त केली आहे. राज्य शासनाचा उच्च आणि तंत्र  शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालयाच्या वतीनं  औरंगाबाद इथं विभागीय ग्रंथालय परिसरात आयोजित दोन दिवसीय ग्रंथ महोत्सवाचं उद्घाटन बोराडे यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. ग्रंथ पुरस्कारांचा सध्या सुळसुळाट झाला असून, पुरस्कार मिळवण्यासाठी ग्रंथांची निर्मिती केली जात आहे का, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली असल्याचं बोराडे म्हणाले. मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी यावेळी बोलताना, तालुकास्तरावर असे ग्रंथ महोत्सव होणं आवश्यक असल्याचं सांगितलं. या दोन दिवसीय ग्रंथ महोत्सवात विविध परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम आणि निमंत्रितांचं कवी संमेलन होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यापूर्वी क्रांतीचौक ते विभागीय ग्रंथालया पर्यंत ग्रंथदिडी काढण्यात आली. आमदार अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडेले, मराठवाड्याचे विभागीय माहिती संचालक यशवंत भंडारे यांच्यासह अनेक मान्यवर या ग्रंथदिंडीत सहभागी झाले.

****



 राज्यात थंडीच्या कडाक्यात आणखी वाढ झाली आहे. आज राज्यात धुळे इथं, सर्वात कमी सहा पूर्णांक आठ दशांश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं, तर नाशिक इथं आठ पूर्णांक पाच अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. औरंगाबाद इथं आज ११ अंश सेल्सियस तापमानाची  नोंद झाली.

****



 भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पर्थ इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलिया संघ, दुसऱ्या डावात २४३ धावांवर सर्वबाद झाला. मोहम्मद शमीनं भेदक गोलंदाजी करत, ऑस्ट्रेलियाचे सहा फलंदाज बाद केले, जसप्रीत बुमराहनं तीन तर ईशांत शर्मानं एक बळी घेतला. भारताला विजयासाठी २८६ धावा करायच्या आहेत. चहापानापर्यंत भारताच्या दोन बाद पंधरा धावा झाल्या होत्या, चेतेश्वर पुजारा चार तर लोकेश राहुल शून्यावर बाद झाला.

*****

***

No comments:

Post a Comment