Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 16 December 2018
Time - 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ डिसेंबर २०१८ सायंकाळी ६.००
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज इथं कुंभमेळ्यासाठी अत्याधुनिक
नियंत्रण कक्षाचं उद्घाटन केलं. पंतप्रधानांनी यावेळी गंगा पूजन केलं, तसंच स्वच्छ
कुंभ प्रदर्शनाला भेट दिली. तत्पूर्वी त्यांनी आज सकाळी रायबरेली इथं रेल्वेचे डबे
बनवण्याच्या कारखान्याची पाहणी केली. यावेळी हमसफर रेल्वेगाडी आणि कारखान्यात तयार
झालेल्या नऊशेव्या वाघिणीला त्यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं, तसंच रायबरेली
इथं विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन केलं.
****
केंद्रीय
राखीव पोलिस बल - सीआरपीएफनं देशाची एकता आणि अखंडता राखण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका
बजावली असल्याचं उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. गुरुग्राम इथं
आज कादरपूर प्रशिक्षण संस्थेत सीआरपीएफच्या राजपत्रित अधिकाऱ्यांच्या दीक्षांत समारंभात
ते बोलत होते. संसदेवर २००१ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या जवानांनी
संसद भवन आणि तिथल्या कर्मचाऱ्यांचं संरक्षण केलं असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं.
नक्षलग्रस्त भागातल्या युवकांना सीआरपीएफमध्ये भरती होण्यासाठी विविध संधी निर्माण
केल्या जात असून, यामुळे नक्षलविरोधी अभियानात स्थानिकांचा सहभाग वाढवण्यास मदत मिळेल,
असं उपराष्ट्रपती यावेळी म्हणाले.
****
गेल्या
चार वर्षात देशांतर्गत सुरक्षेची स्थिती मोठ्या प्रमाणात सुधारली असल्याचं केंद्रीय
गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज विजय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात
ते बोलत होते. कायदा आणि सुव्यवस्थेतही लक्षणीय सुधारणा झाली असल्याचं ते म्हणाले.
पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाविरुद्ध कारवाई करण्यासाठी सीमा सुरक्षा
बलाला पूर्ण सूट दिली असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
काँग्रेसनं
छत्तीसगढचे मुख्यमंत्री म्हणून प्रदेशाध्यक्ष भूपेश बघेल यांची निवड केली आहे. रायपूर
इथं आज झालेल्या पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत बघेल यांची विधिमंडळ नेता
म्हणून नियुक्ती झाल्याची घोषणा करण्यात आली. भूपेश बघेल हे उद्या छत्तीसगढचे मुख्यमंत्री
म्हणून शपथ घेणार आहेत.
****
राफेल
लढाऊ विमान खरेदीतला ४० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार हाच आमचा आगामी निवडणुकीतला
प्रमुख मुद्दा असेल, असं माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी
म्हटलं आहे. ते आज औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. विमुद्रीकरण, वस्तू आणि सेवा
करासारख्या निर्णयामुळे बसलेल्या धक्क्यातून देश अजून सावरलेला नसून, सरकारसोबत जागतिक
दर्जाचा एकही अर्थतज्ञ काम करायला तयार नाही, अशी टीका त्यांनी केली.
****
चांगल्या
मार्गाने जगण्यास इच्छुक अनाथ निराधार मुला मुलींना प्रत्येकानं आपापल्या परीनं सहकार्य
करण्याचं आवाहन, ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर यांनी केलं आहे. ‘एकता निराधार संघा’च्या
वतीनं औरंगाबाद इथं प्रस्तावित अनाथ निराधार वसतीगृहाचं भूमीपूजन आज खांडेकर यांच्या
हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. सामाजिक कार्यकर्त्या राधा पेठे कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी होत्या. उद्योजक विवेक देशपांडे, सामाजिक कार्यकर्त्या शुभा रिसबुड,
एकता संघाचे संस्थापक सागर रेड्डी यावेळी उपस्थित होते.
****
हिंगोली
जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातल्या केंद्रा खुर्द इथं पिकअप गाडी उलटून झालेल्या अपघातात
२० जण जखमी झाले. त्यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. आज सकाळी हा अपघात झाला.
वाशिम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातल्या नावली इथले भाविक हिंगोली तालुक्यातल्या फाळेगाव
इथं खंडोबा मंदिरात नवस फेडण्यासाठी जात असताना हा अपघात झाला. जखमींना हिंगोली जिल्हा
रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
****
नांदेड
इथले आंबेडकरी चळवळीतले नेते माजी नगरसेवक एन. यु. सदावर्ते यांचं आज हदयविकाराच्या
झटक्यानं निधन झालं, ते ७१ वर्षांचे होते. सदावर्ते हे प्रभात नगर सहकारी गृहनिर्माण
संस्थेचे २५ वर्षे अध्यक्ष होते.
****
भारत
आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पर्थ इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या
आजच्या तिसऱ्या दिवस अखेर ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात चार बाद १३२ धावा झाल्या.
मोहम्मद शमीनं दोन, तर जसप्रित बुमराह आणि इशांत शर्मानं प्रत्येकी एक गडी बाद केला.
तत्पूर्वी भारताचा पहिला डाव आज २८३ धावांवर संपुष्टात आला. भारत १७५ धावांनी पिछाडीवर
आहे.
****
भुवनेश्वर
इथं सुरू असलेल्या विश्वचषक हॉकी स्पर्धेचा अंतिम सामना आज बेल्जियम आणि नेदरलँड दरम्यान
होणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
राज्यात
तापमानात किंचित घट झाली आहे. आज सर्वात कमी १० पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमान जळगाव
इथं नोंदवलं गेलं. परभणी ११ पूर्णांक सहा, औरंगाबाद १२ पूर्णांक पाच, तर नांदेड इथं
१३ पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
****
No comments:
Post a Comment