Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 16 January 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
१६ जानेवारी २०१९ दुपारी १.०० वा.
*****
मराठवाड्यासह राज्याचा एकूणच पाणी प्रश्न सोडवण्यासाठी दोन नदीजोड प्रकल्पांवर
काम करत असल्याचं, केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद
इथं आयोजित नवव्या आंतरराष्ट्रीय सुक्ष्म जलसिंचन परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत
होते. तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत ५६ देशांचे १०० हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार
आहेत.
*****
मुंबईत सुरू असलेल्या
बेस्ट बसेसच्या संपाबाबत सध्या मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. दरम्यान, या
संपाबाबत कोणताही समाधानकारक तोडगा काढू न शकल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भारतीय जनता पक्ष तसंच शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर
टीका केली आहे. ते आज सांगली जिल्ह्यातल्या शिराळा इथे पत्रकारांशी बोलत होते.
****
विश्व हिंदू परिषदेचे
माजी अध्यक्ष विष्णू हरि दालमिया यांचं आज दिल्लीत निधन झालं. ते नव्वद वर्षांचे होते.
विहिंपचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पहिलं होतं. देशातल्या प्रमुख
उद्योगपतींमध्ये गणल्या जाणाऱ्या दालमिया यांची राम जन्मभूमी आंदोलनातही मोठी भूमिका
राहिली होती. आज दुपारी नवी दिल्लीत त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
केंद्र सरकारनं महात्मा
गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेसाठी सहा हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी वितरीत
केला आहे. यामुळे या आर्थिक वर्षात, या योजनेसाठी वितरीत झालेला निधी सुमारे एकसष्ट
हजार कोटींपर्यंत पोहचला असून, एका आर्थिक वर्षात वितरीत झालेला हा आतापर्यंतचा सर्वात
जास्त निधी असल्याचं केंद्रीय ग्राम विकास मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
भविष्यातली विमान
वाहतुकीची गरज भागवण्यासाठी सुमारे दोन हजार विमानांची गरज असून, ही विमानं देशातच
निर्माण करण्याबाबत सरकार विचार करत आहे, असं नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू
यांनी म्हटलं आहे. मुंबईत झालेल्या जागतिक हवाई वाहतूक परिषदेत ते बोलत होते. विमानांच्या
देखभाल, दुरुस्ती आणि तपासणीचं कामही देशातच व्हावं, असा सरकारचा प्रयत्न असल्याचं
प्रभू यांनी यावेळी सांगितलं.
****
दहावी आणि बारावीच्या
परीक्षेत राज्यातून आणि विभागातून सर्वप्रथम येणाऱ्या, इतर मागास प्रवर्गातल्या गुणवंत
विद्यार्थ्यांना वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या
बैठकीत काल घेण्यात आला. एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असं या पुरस्काराचा
स्वरुप असेल.
****
राज्यात इतर मागास
वर्ग प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यांच्या ठिकाणी मुलांसाठी अठरा आणि मुलींसाठी
अठरा, अशी एकूण छत्तीस वसतिगृहं मागणीनुसार सुरू करण्यालाही कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत
मान्यता देण्यात आली. या योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या प्रत्येक वसतिगृहामध्ये शंभर
विद्यार्थ्यांना नि:शुल्क निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य आणि आरोग्य सुविधा उपलब्ध
करून देण्यात येतील.
****
ऊसतोडीसाठी कर्जाऊ
दिलेले पाच लाख रुपये परत देण्याच्या मागणीसाठी कामगाराचं अपहरण करणाऱ्या जालन्याच्या
एका ठेकेदाराला जालना पोलिसांनी परभणी जिल्ह्यातून अटक केली. कुंडलिक चव्हाण असं या
ठेकेदाराचं नाव असून, त्यानं, नामदेव जाधव नावाच्या कामगाराचं गेल्या २८ डिसेंबरपासून
अपहरण केलं होतं. जाधव यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून चव्हाण याच्या विरोधात
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
नाशिक जिल्ह्यातल्या
पेठहून पुण्याला जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस उलटून झालेल्या अपघातात चार जण
गंभीर जखमी झाल्याचं वृत्त आहे. आज सकाळी साडेसहाच्या सुमाराला पेठ पुणे मार्गावरच्या
गोळशी फाटा परिसरात हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
औरंगाबाद इथं महात्मा
गांधी मिशन संगीत अकादमीच्या वतीनं येत्या १८ ते २१ जानेवारी दरम्यान शार्ग्ङंदेव समारोहाचं
आयोजन करण्यात आलं आहे. यंदाचा ‘शार्ग्ङंदेव सन्मान’ गुरू बनमाली महाराणा यांना मरणोत्तर
प्रदान करण्यात येणार आहे. या महोत्सवात नृत्य तसंच सांगितिक सादरीकरणांसह विविध विषयांवर
कार्यशाळा, परिसंवाद होणार आहेत.
****
मलेशियन मास्टर्स
बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवाल आणि किदाम्बी श्रीकांतसह सात भारतीय खेळाडू आज क्वालालंपूरमध्ये
पहिल्या फेरीचे सामने खेळणार आहेत.
*****
***
No comments:
Post a Comment