▼

Thursday, 17 January 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 17.01.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१७   जानेवारी  २०१९ सकाळी ११.०० वाजता

****



     राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज उत्तरप्रदेशात प्रयागराज इथं कुंभमेळ्यातल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. महर्षी भारद्वाज यांच्या पुतळ्याचं अनावरणही राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. यानंतर राष्ट्रपती अरैल इथल्या परमार्थ निकेतन मध्ये विश्व शांती यज्ञात सहभागी होतील. महात्मा गांधीजींच्या दिडशेव्या जयंती निमित्त होणाऱ्या दोन दिवसांच्या गांधी विचार पुनरुत्थान परिषदेचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे. परमार्थ निकेतन, हरिजन सेवक संघ आणि परस्पर विश्वासासाठी जागतिक पातळीवर कार्य करणाऱ्या संघटनांनी ही परिषद आयोजित केली आहे.

****



 राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचं आज सकाळी मुंबईत जसलोक रुग्णालयात निधन झालं, ते ८१ वर्षांचे होते. बोपेगावच्या सरपंच पदापासून राजकीय कारकीर्द सुरु केलेल्या पाटील यांनी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, अध्यक्ष, जिल्हा बँक अध्यक्ष, आणि खासदार अशी अनेक पदं भूषवली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार मकरंद पाटील यांचे ते वडील होत. पाटील यांच्या पार्थीव देहावर वाई तालुक्यातल्या बोपेगाव या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

****









 नांदेड जिल्ह्यात होणाऱ्या ३२ व्या अखिल भारतीय बौध्द धम्म परिषदेसंदर्भातली कामं विहित मुदतीत पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहेत. अर्धापूर तालुक्यात महाविहार बावरीनगर दाभड इथं येत्या २० आणि २१ जानेवारीला होणाऱ्या या परिषदेच्या पूर्वतयारीचा आढावा डोंगरे यांनी काल घेतला, त्यावेळी ते बोलत होते. 

****



औरंगाबाद इथल्या महात्मा गांधी मिशन संगीत अकादमीचा यंदाचा ‘शार्ङ्गदेव सन्मान’ गुरू बनमाली महाराणा यांना मरणोत्तर जाहीर झाला आहे. उद्यापासून सुरु होणाऱ्या चार दिवसीय शार्ङ्गदेव समारोहात हा पुरस्कार प्रदान केला जाईल. या महोत्सवात नृत्य तसंच सांगितिक सादरीकरणांसह विविध विषयांवर कार्यशाळा, परिसंवाद होणार आहेत.

****



 पुण्यात सुरू असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्रानं ६४ सुवर्णपदकांसह आपली आगेकूच सुरू ठेवली आहे. कालपर्यंत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी एकूण ६४ सुवर्ण, ५१ रौप्य तर ६२ कांस्य पदकं जिंकली आहेत.

*****

***

No comments:

Post a Comment