▼

Thursday, 17 January 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 17.01.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 17 January 2019

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १७  जानेवारी २०१९  दुपारी १.०० वा.

*****



 राज्यातल्या डान्सबार संबंधी अनेक नियम आणि अटी सर्वोच्च न्यायालयानं शिथील करत, काही नियम रद्द ठरवले आहेत. आज झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं, डान्सबारमध्ये सीसीटीव्ही बसवणं, तसंच बार आणि डान्स फ्लोर या दोन्हीत पार्टीशन असावं आणि डान्सगर्लना बक्षीस देण्यास बंदीसह इतर अनेक नियम रद्द केले आहेत. डान्स बारला सायंकाळी सहा ते रात्री साडे अकरा वाजेपर्यंतची मर्यादा, तसंच डान्सगर्लवर पैसे उधळण्यास बंदी, या अटी मात्र न्यायालयानं कायम ठेवल्या आहेत.

****



 नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी अर्थसहाय्य करायला सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या संघानं मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचे मुख्य सचिव भूषण गगराणी यांनी ही माहिती दिली. सुमारे ५० हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पात, रस्ते बांधणीसाठी २६ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यासाठी स्टेट बँक सर्वाधिक साडे आठ हजार कोटी निधी देणार असून, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, महाराष्ट्र बँक, तसंच आयुर्विमा महामंडळाकडूनही निधी मिळणार आहे. या महामार्गावर प्रस्तावित २५ पथकर नाक्यातून पुढची चाळीस वर्ष पथकर वसुली प्रस्तावित आहे.

****



 भारतीय गिर्यारोहक सत्यरुप सिद्धांत हे जगभरातल्या सर्व खंडांमधली सात सर्वोच्च शिखरं आणि ज्वालामुखीय पर्वत सर करणारे पहिले भारतीय आणि सर्वात तरुण गिर्यारोहक ठरले आहेत. सत्यरुप यांनी काल अंटार्क्टिकामधलं माउंट सिडले हे सर्वोच्च शिखर सर करून इतिहास रचला. पहाटे सहा वाजून २८ मिनिटांनी उणे ४० अंश सेल्सियस तापमानात त्यानं हे शिखर सर केलं.

****



 जम्मू काश्मीरच्या पूँछ जिल्ह्यातल्या गुलपूर सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्यानं आज पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. आज पहाटे पाकिस्तानी सैन्यानं लष्करी चौक्यांना लक्ष्य करत गोळीबार सुरु केला. भारतीय सैन्यानंही या गोळीबाराला चोख प्रत्यूत्तर दिलं. यात कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही.

****



 राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दिनेश महेश्वरी यांना सर्वोच्च न्यायालयात पदोन्नत्ती देण्यास मान्यता दिली आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना सध्या दिल्ली उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत, तर न्यायमूर्ती दिनेश महेश्वरी सध्या कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आहेत. देशाचे मुख्य सर न्यायधीश रंजन गोगोई  यांच्या अध्यक्षतेखालच्या सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजिअमनं त्यांच्या  पदोन्नत्तीची शिफारस केली होती.

****



 महिला आणि बालकल्याण मंत्रालयानं पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार २०१९ साठी २६ बालकांची निवड केली आहे. शौर्य, सामाजिक कार्य आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी आणि क्रिडा, तसंच कला क्षेत्रातल्या योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो.

****



 भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रो २४ जानेवारीला या वर्षातलं पहिलं अंतराळ प्रक्षेपण करणार आहे. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ प्रक्षेपण केंद्रावरून कलामसॅट हा विद्यार्थी उपग्रह आणि मायक्रोसॅट आर या इमेजिंग उपग्रहाचं सी-४४ क्रमांकाच्या पीएसएलव्हीद्वारे प्रक्षेपण केलं जाणार आहे. या प्रक्षेपकाच्या रचनेतले बदल आणि त्याचा वेगळ्या प्रकारे होणारा वापर हे यावेळच्या प्रक्षेपणाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. उपग्रहांना निर्धारित कक्षेत सोडल्यावर या प्रक्षेपकाचा चौथा टप्पा अंतराळात वर्तुळाकार कक्षेत काही विशिष्ट प्रयोगांसाठी नेला जाईल. इतर वेळी हा टप्पा अंतराळात सोडून दिला जातो मात्र या वेळी नावीन्यपूर्ण संशोधनासाठी त्याचा वापर चालू ठेवला जाईल.

****



 हरियाणा राज्यसरकारच्या डिजिटल इनोव्हेशन आणि सायबर सुरक्षा या विषयावर गुरुग्राम इथं सुरू असलेल्या एका राष्ट्रीय परिषदेत, महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सुरक्षा आणि स्वयंचलित जीवमीतीय ओळख यंत्रणेला स्मार्ट पोलिसिंग श्रेणीत पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह आणि त्यांच्या पथकानं हा पुरस्कार स्वीकारला.

****



 कुष्ठरोग निर्मूलनासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे सदिच्छा दूत योहेई सासाकावा यांना कुष्ठरोग निर्मूलनासंबंधात भारतात आणि जगभरात केलेल्या कार्यासाठी २०१८ चा गांधी शांतता पुरस्कार देण्यात येणार आहे. २०१७च्या पुरस्कारासाठी एकल अभियान ट्रस्टची निवड झाली आहे. तर अक्षयपात्र फाऊंडेशन आणि सुलभ इंटरनॅशनल या संस्थाना २०१६ चा पुरस्कार संयुक्तरित्या देण्यात येणार आहे. २०१५ सालासाठीच्या पुरस्कारासाठी कन्याकुमारी इथल्या विवेकानंद केंद्राची निवड झाली आहे. एक कोटी रुपये आणि मानपत्र असं गांधी शांतता पुरस्काराचं स्वरूप आहे.

****



 मलेशियात क्वालालंपूर इथं सुरू असलेल्या मलेशियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवालनं उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

*****

***

No comments:

Post a Comment