Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date –
21 january 2019
Time
1.00 to 1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
२१ जानेवारी २०१९ दुपारी १.०० वा.
****
जगभरात प्रत्येक क्षेत्रात भारतीय
आघाडीवर असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशातल्या
वाराणसी इथं आज युवक प्रवासी भारतीय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
प्रवासी भारतीय दिनाचा उद्देश हा केवळ आपलं मूळ शोधून काढणं हाच नाही, तर भारताच्या
प्रगतीचा एक भाग बनणं हा सुद्धा असल्याचं स्वराज यांनी सांगितलं. केंद्रीय माहिती आणि
प्रसारण राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड यावेळी उपस्थित होते, प्रवासी भारतीयांमुळें
जगभरात भारताची ओळख असल्याचं त्यांनी नमूद केलं.
****
केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयचे अंतरिम संचालक
एम नागेश्वर राव यांच्या नियुक्तीला आव्हान देणाऱ्या याचिकेवरच्या सुनावणीतून सरन्यायाधीश
रंजन गोगोई बाहेर पडले आहेत. सीबीआयच्या नवीन संचालक निवडीसाठी स्थापन करण्यात आलेल्या
समितीचा एक भाग असल्यानं आपण ही सुनावणी घेऊ शकत नाही, असं सरन्यायाधीशांनी म्हटलं
आहे. एका स्वयंसेवी संस्थेनं दाखल केलेल्या या याचिकेवर सरन्यायाधीश आणि न्यायमूर्ती
संजीव खन्ना आज सुनावणी घेणार होते.
****
जम्मू काश्मीरमधल्या बडगाम जिल्ह्यात सुरु असलेल्या
दहशतवाद विरोधी कारवाईत दोन दहशतवादी मारले गेले. बडगाम जिल्ह्यातल्या हापतनगर चरार
ए शरीफ परिसरात ही चकमक सुरू आहे. या परिसरात जवानांनी आणखी एका दहशतवाद्याला घेरलं
असून, चकमक सुरु असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
संरक्षण दलाच्या प्रणालीमध्ये कृत्रिम बुद्धीमत्ता आणि
बिग डाटा काँम्प्युटींगचा समावेश करण्याच्या मुद्यांवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज
असल्याचं लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी म्हटलं आहे. संरक्षण उत्पादनातली स्वयंपूर्णता
या विषयावर हैद्राबाद इथं आयोजित परिषदेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. भविष्यातली
युद्ध ही मुख्यत्वे सायबर विश्वाच्या माध्यमातून लढली जातील, हे
लक्षात घेऊन कृत्रिम बुद्धीमत्ता आणि बिग डाटा काँम्प्युटींगचं महत्त्व लक्षात घेत
त्यांचा समावेश संरक्षणदलाच्या प्रणालीत करायला हवा असं ते म्हणाले. तंत्रज्ञानाच्या
क्षेत्रात वेगानं होणाऱ्या प्रगतीमुळे संरक्षण उत्पादन क्षेत्रात उद्योग क्षेत्राचा
सहभाग अनिवार्य झाल्याचं रावत यांनी नमूद केलं.
****
आम आदमी पक्षानं सध्या तरी महाराष्ट्रातून लोकसभा
निवडणूक लढवणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या प्रवक्त्या प्रीती शर्मा मेनन
यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती. दिली. दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि
गोवा या चार राज्यांमध्येच पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार दिले जाणार
आहे, मात्र महाराष्ट्रात काही जागांवर भारतीय जनता पक्षाला हरवण्याचा विश्वास वाटला,
तर त्या जागांवर निवडणूक लढवण्याचा विचार केला जाईल, असं प्रीती शर्मा यांनी सांगितलं.
****
खुल्या प्रवर्गातल्या आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना
सरकारी नोकरी आणि शैक्षणिक संस्थामध्ये दहा टक्के आरक्षण देणारा नवीन कायदा हा समाजातल्या
सर्व घटकांचा विकास सुनिश्चित करण्याच्या सरकारच्या कटिबद्धतेशी सुसंगत असल्याचं केंद्रीय
गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. ते काल नागपूर इथं भाजपाच्या अनुसूचित जाती
राष्ट्रीय परिषदेच्या समारोप प्रसंगी बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचं समतावादी
समाजाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवीन आरक्षण जाहीर
केल्याचं ते म्हणाले.
****
औरंगाबाद इथं सुरु असलेल्या ‘दहाव्या शार्ङ्गदेव
संगीत महोत्सवाचा’ आज समारोप होत आहे. महात्मा गांधी मिशनतर्फे या तीन दिवसीय महोत्सवाचं
आयोजन करण्यात आलं होतं. यात, काल सायंकाळच्या अखेरच्या सत्रात तेलंगणाच्या लोककलेतलं
यक्षगानम्, पंडीत कपिल जाधव, बलभीम जाधव आणि अमोल जाधव यांचं सुंद्री वादन, आणि उस्ताद
अहसान आणि आदिल हुसैन खान यांनी सुफी कव्वाली सादर केली. आज दिवसभराच्या दोन सत्रात,
सामगान आणि वाचिक अभिनयावर, पियाल भट्टाचार्य आणि शिल्पनृत्य विषयावर करुणा विजयेंद्र
यांच्या कार्यशाळेच्या समापनानं, यंदाच्या महोत्सवाची आज सांगता होत आहे.
****
आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाच्या वतीनं सिंगापूरमध्ये
आयोजित महिला टेनिस स्पर्धेचं अजिंक्यपद भारताच्या अंकिता रैनानं पटकावलं आहे. काल
झालेल्या अंतिम सामन्यात अंकितानं नेदरलंडच्या अरांत्जा रस हिचा सहा - तीन, सहा
- दोन अशा सेटमधे पराभव केला. अंकितानं ही स्पर्धा जिंकत जागतिक मानांकित चार टेनिसपटूंचा
पराभव करत यावर्षीचा पहिला आणि एकूण आठवा किताब मिळवला.
****
चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ आला असल्यानं, आज रात्री
सुपरमून पाहण्याची संधी आहे. चंद्र, पृथ्वी आणि सूर्य एका रांगेत आले असल्यानं, आज
चंद्रग्रहण होणार आहे. हे या आणि पुढच्या वर्षातलं एकमेव पूर्ण चंद्रग्रहण आहे, मात्र
हे भारतातून दिसणार नाही.
*****
***
No comments:
Post a Comment