Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 04 February
2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४
फेब्रुवारी २०१९ दुपारी १.०० वा.
****
पश्चिम बंगाल सरकार आणि केंद्रीय
अन्वेषण विभाग -सीबीआय यांच्यात सुरू असलेल्या वादाचे पडसाद आज संसदेतही उमटले. संसदेत
आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावर चर्चा होणार होती. मात्र राज्यसभेत
कामकाज सुरू होताच, तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी सभापतींच्या आसनासमोरच्या हौद्यात
येत घोषणाबाजी सुरू केली, त्यामुळे सभापती व्यंकय्या नायडू यांनी कामकाज दोनवाजेपर्यंत
स्थगित केलं.
लोकसभेत अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी, माजी केंद्रीय
मंत्री जॉर्ज फर्नांडीस यांच्यासह दिवंगत सदस्यांना श्रद्धांजलीचा प्रस्ताव वाचून दाखवला,
सदनानं या दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण केली, त्यानंतर लगेचच तृणमूल काँग्रेसच्या
सदस्यांनी हौद्यात उतरून गदारोळ सुरू केला. या गदारोळातच अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा
तास पुकारला, मात्र गदारोळ वाढत गेल्यानं, अध्यक्षांनी कामकाज बारा वाजेपर्यंत स्थगित
केलं.
कामकाज सुरू झाल्यावर या मुद्यावरून वादळी चर्चा
झाली. तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेससह विविध पक्षांच्या सदस्यांनी सीबीआय कारवाईच्या
विरोधात मत मांडली. या दरम्यानही सदस्यांचा गदारोळ सुरूच होता. या गदारोळातच गृहमंत्री
राजनाथसिंह यांनी या प्रकरणी आपलं निवेदन सदनासमोर सादर केलं. सीबीआयला तपासकार्यापासून
रोखण्याची देशातली ही पहिलीच घटना असल्याचं, त्यांनी नमूद केलं.
त्यानंतरही गदारोळ सुरू राहिल्यानं, अध्यक्षांनी
सदनाचं कामकाज दुपारी दोनवाजेपर्यंत स्थगित केलं.
****
दरम्यान, पश्चिम बंगालमधल्या बहुचर्चित शारदा चिटफंड
घोटाळ्याच्या चौकशीत पश्चिम बंगाल सरकार करत असलेल्या हस्तक्षेपाविरोधात सीबीआयनं सर्वोच्च
न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालय या प्रकरणी उद्या सुनावणी घेणार आहे. या प्रकरणी चौकशीला सहकार्य करण्याचे
निर्देश न्यायालयानं पश्चिम बंगाल सरकारला द्यावे आणि पोलिस आयुक्त राजीव कुमार यांना तपास यंत्रणांसमोर हजर राहण्याचे निर्देश
देण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणी कोलकात्याचे पोलिस आयुक्त राजीव कुमार
यांच्या घरावर छापा घालण्यासाठी गेलेल्या सीबीआयच्या ४० अधिकाऱ्यांना कोलकाता पोलिसांनी
अटक केली. सीबीआयच्या या कारवाईच्या विरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी
यांनी आंदोलन पुकारलं आहे.
दरम्यान सीबीआयचे नवनियुक्त संचालक ऋषीकुमार यांनी
आज सीबीआय मुख्यालयात आपला पदभार स्वीकारला.
****
खुल्या प्रवर्गातल्या आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना
शिक्षण आणि नोकरीत १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत, मंत्रिमंडळानं या निर्णयाला
मंजूरी दिली. या निर्णयामुळे सर्वच जाती धर्मातल्या आर्थिक दृष्ट्या दुर्बलांना शिक्षण
आणि नोकरीत दहा टक्के आरक्षण लागू होणार आहे.
****
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी लोकपाल
नियुक्तीच्या मागणीसाठी सुरु केलेलं आंदोलन मागे घ्यावं, असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण
सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या राळेगणसिद्धी इथं
ठाकरे यांनी आज अण्णांची भेट घेतली, त्यानंतर ते बोलत होते. अण्णांच्या आंदोलनामुळेच
भारतीय जनता पक्ष सत्तेत आला असल्याचं ते म्हणाले. पाच वर्ष झाली तरी अद्याप लोकपालवर
कारवाई केली नसल्याबद्दल त्यांनी सरकारवर टीका केली.
****
जागतिक कर्करोग दिन आज पाळण्यात येत आहे.
या आजाराबद्दल जागरुकता वाढवणं, आणि यामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण
कमी करण्यासाठीच्या प्रयत्नात जगातल्या सगळ्या देशांना समाविष्ट करून घेणं, हा या दिनाचा
उद्देश आहे. यानिमित्त आज जगभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. “मी आहे
आणि मी असेन” ही यंदाच्या कर्करोग दिनाची संकल्पना आहे. जागतिक कर्करोग दिनाच्या पार्श्वभूमीवर
उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी, या आजारावर प्रतिबंधनासंदर्भात जनजागृती करण्याचं
आवाहन केलं आहे. कर्करोगाचं प्राथमिक निदान करण्यासाठी ग्रामीण भागात कर्करोग निदान
आणि उपचार केंद्र सुरु करण्याची गरजही उपराष्ट्रपतींनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त
केली आहे.
*****
***
No comments:
Post a Comment