Tuesday, 5 February 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 05.02.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 05 February 2019

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०५ फेब्रुवारी  २०१ सकाळी ७.१० मि.

****



v खुल्या प्रवर्गातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दहा टक्के आरक्षण मंजूर करण्याला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

v मानवाप्रमाणेच पशुंसाठी जनेरिक अर्थात स्वस्त दरात औषधी सेवा सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश 

v ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचं निधन

आणि

v मराठवाड्यात काल विविध अपघातात सात जणांचा मृत्यू

****



 केंद्राप्रमाणेच राज्यातही खुल्या प्रवर्गातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शासकीय सेवा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये दहा टक्के आरक्षण मंजूर करण्याला कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्यातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था वगळता सगळ्या अनुदानित किंवा विनाअनुदानित शैक्षणिक संस्था, विद्यालयं, महाविद्यालयं,  उच्च शिक्षण शैक्षणिक संस्था, स्वायत्त विद्यापीठं यामध्ये एकूण जागांमध्ये १० टक्के आरक्षण लागू करण्यात आलं आहे. तसंच शासकीय आस्थापना, निमशासकीय आस्थापना, मंडळं, महामंडळं, नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामीण स्वराज्य संस्था, प्राधिकरणं यांच्या आस्थापनांवरच्या सरळसेवेच्या पदांमध्ये हे आरक्षण लागू होणार आहे.





 मोतीबिंदू किंवा डोळ्यांच्या विकारांनी ग्रस्त असणाऱ्या, निर्धन आणि दुर्बल घटकांतल्या रुग्णांना आता धर्मादाय नेत्र रुग्णालयामध्ये मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रियेचे उपचार करून घेता येणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियमात सुधारणा करण्यासही काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.



 कमी मुद्रांक शुल्क भरल्यामुळे आकारण्यात आलेल्या दंडाच्या रकमेत नव्वद टक्के सूट देणाऱ्या, ‘मुद्रांक शुल्क अभय’ योजनेलाही काल मंत्रिमंडळानं मान्यता दिली. ही योजना लागू झाल्याच्या तारखेपासून सहा महिने अस्तित्वात राहणार आहे.

****



 मानवाप्रमाणेच पशुंसाठी जनेरिक अर्थात स्वस्त दरात औषधी सेवा सुरू करण्याचे निर्देश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. जालना इथं काल अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. पशुपक्ष्यांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी, आधुनिक रूग्णवाहिका सेवा सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्याचं आवाहनही, त्यांनी केलं. ते म्हणाले…



शेतकऱ्यांना जरेरिक औषधी मिळाली पाहिजेत, जरूर त्या संदर्भात मी विभागाला निर्देश देतो. जशी माणसा करता जनेरिक औषधाची दुकाने सुरू केली तशी आपण पशुकरीता देखील जनेरिक औषधाची दुकाने सुरू करावी जणेकरून औषधावरचा खर्च हा आपला कमी होईल. आमच्या शेतकऱ्यांला मदत करण्याकरीता मला असं वाटत की, आपण ॲम्बूलन्सची सेवा देखील सुरू केली पाहिजे.



 पशूसंवर्धन विभागात पशुसहाय्यकांसह विविध पदांची भरती केली जात असल्याचं ते म्हणाले. मराठवाडा आणि विदर्भात दूध उत्पादन वाढीसाठी शासन विविध योजना राबवत असून, २४३ कोटी रुपयांच्या योजनेतून शेतकऱ्यांना दुभत्या जनावरांचं वाटप केलं जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. दुधाळ जनावरांच्या विविध जातींचं संवर्धन होण्यासाठी, औरंगाबादेत कृत्रिम लिंग निर्धारित रेतन प्रयोगशाळा सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

****



 या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना, मुख्यमंत्र्यांनी, येत्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती निश्चित असल्याचं सांगितलं. प्रत्येक घरात काही वाद असतातच, पण ते मिटवलेही जातात, असं मुख्यमंत्री म्हणाले.

 ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या असून केंद्र सरकारशी संबंधित मागण्यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयातून त्यांना पत्र देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. अण्णांनी उपोषण मागे घेण्याची विनंती करताना मुख्यमंत्री म्हणाले….



मला त्यांना विनंती कराची आहे. की, त्यांनी निश्चितपणे या ठिकाणी आता उपोषण मागे घ्यावं. मी तश्या प्रकारचे विनंती करणारे पत्र देखील त्यांना पाठवलेल आहे. आम्ही सातत्याने त्यांच्या संर्पकात देखील त्या ठिकाणी आहोत. आमचे मंत्री देखील च्या संर्पकात आहे.  त्यांना भेटी देताहेत, अनेक लोक आपलं समर्थन जाहिर करता येत. त्याचं उपोषण मागे घेण्याच्या संर्दभात  सगळ्यांनी त्यांना विनंती केली पाहिजे. पण काही लोक त्यामागे राजकारण करण्याचा प्रयत्न करता येत. अश्या ठिकाणी राजकारण करणं काही योग्य नाही.



 दरम्यान, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी काल अण्णांसोबत तीन तास चर्चा केली. मात्र या चर्चेतून काहीही तोडगा निघाला नाही.



 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही काल राळेगण सिद्धी इथं जाऊन अण्णांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याचं आवाहन केलं. त्यानंतर अहमदनगर इथं वार्ताहरांशी बोलतांना ठाकरे यांनी केंद्र, तसंच राज्य सरकारवर टीका केली.



 हजारे यांनी सुरू केलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ, हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कालपासून भ्रष्टाचारविरोधी जन आंदोलनच्यावतीनं उपोषण आणि ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. या उपोषणाला अखिल भारतीय वारकरी मंडळानंही पाठिंबा दिला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 राज्यातल्या, गॅस जोडणी नसलेल्या एकूण पंचेचाळीस लाख कुटुंबांना येत्या गणेशोत्सवापूर्वी गॅस जोडणी देऊन पूर्ण महाराष्ट्र चूलमुक्त करणार असल्याचं, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत यासंदर्भातल्या एका बैठकीत बोलत होते. अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर करावा, असे निर्देशही त्यांनी दिले.

****



 पश्चिम बंगाल सरकार आणि केंद्रीय अन्वेषण विभाग -सीबीआय यांच्यात सुरू असलेल्या वादाचे पडसाद काल संसदेतही उमटले. संसदेत काल राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावर चर्चा होणार होती. तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी दोन्ही सदनात घोषणाबाजी गदारोळ घातल्यानं, दोन्ही सदनांचं कामकाज होऊ शकलं नाही.



 दरम्यान, पश्चिम बंगालमधल्या बहुचर्चित शारदा चिटफंड घोटाळ्याच्या चौकशीत पश्चिम बंगाल सरकार करत असलेल्या हस्तक्षेपाविरोधात सीबीआयनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालय या प्रकरणी आज सुनावणी घेणार आहे.

****



 फरार आर्थिक आरोपी विजय मल्ल्या याचं भारताला प्रत्यार्पण करण्याला इंग्लंडनं मंजुरी दिली आहे. इंग्लंडच्या गृहमंत्र्यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. भारतानं या निर्णयाचं स्वागत केलं आहे, मात्र या आदेशाविरुद्ध तिथल्या न्यायालयात याचिका करणार असल्याचं मल्ल्या यांनी म्हटलं आहे.

****

 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचं काल मुंबईतल्या एलिझाबेथ रुग्णालयात निधन झालं, ते ७० वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते कर्करोगानं ग्रस्त होते. ‘कमांडर’ आणि ‘हॅलो इन्स्पेक्टर’ या गाजलेल्या दूरचित्रवाणी मालिकांमध्ये भूमिका साकारलेल्या रमेश भाटकर, यांची ‘अश्रूंची झाली फुले’, ‘केव्हा तरी पहाटे’, ‘अखेर तू येशीलच’, ‘राहू केतू’, ‘मुक्ता’ यांसारखी अनेक नाटकं गाजली. १९७७ ला ‘चांदोबा चांदोबा भागलास का’ या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीतल्या कारकिर्दीला सुरुवात केलेल्या भाटकर यांनी, ९० हून अधिक मराठी तर अनेक हिंदी चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटात त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भूमिका साकारली होती, ही त्यांची अखेरची भूमिका ठरली. भाटकर यांच्या पार्थिव देहावर आज मुंबईत शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

****



 नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातले ज्येष्ठ नेते माजी आमदार बापूराव पाटील आष्टीकर यांचं काल निधन झालं, ते ८५ वर्षांचे होते. १९८५ आणि १९९५ असे दोन वेळा हदगाव विधान मतदार संघातून ते निवडून आले होते. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, तसंच नांदेड जिल्हा खरेदी विक्री संघाचं अध्यक्षपद आष्टीकर यांनी भूषवलं होतं. हदगावचे आमदार नागेश आष्टीकर यांचे ते वडील होत. त्यांच्या पार्थिव देहावर आज हदगाव तालुक्यात आष्टी इथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

****



 जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातल्या क्षीरसागर इथं एका गोठ्याजवळील चाऱ्याच्या गंजीला आग लागून, गोठ्यात खेळणाऱ्या तीन बालकांचा होरपळून मृत्यू झाला. काल सकाळी ही घटना घडली. संजीवनी मव्हारे, वेदांत मव्हारे, आणि सार्थक कोलते अशी मृत मुलांची नावं आहेत.

****



 लातूर- बार्शी राज्यमार्गावर काल एक ट्रक आणि तीन दुचाकी वाहनांच्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले. लातूरकडून बार्शीकडे जाणारा भरधाव ट्रक, चालकाचं नियंत्रण सुटल्यानं, तीन दुचाकी वाहनांना धडकून हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 समाजातल्या वंचित घटकांना शासनाच्या योजनांचा लाभ देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असं ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. बीड जिल्ह्यातल्या केज तसंच अंबाजोगाई तालुक्यातल्या विविध कामांचा शुभारंभ केल्यानंतर त्या काल बोलत होत्या. जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून, प्रत्येक गावाला पक्का रस्ता मिळावा यासाठी, मोठ्या प्रमाणात कामं मंजूर झाल्याचं त्यांनी सांगितलं. 

*****

***

No comments:

Post a Comment