Wednesday, 6 February 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 06.02.2019 07.10AM




Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 06 February 2019

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०६ फेब्रुवारी  २०१ सकाळी ७.१० मि.

****



v ोकपालसह अन्य मागण्यांसाठी अण्णा हजारे यांनी पुकारलेलं उपोषण, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मागे

v राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २५ फेब्रुवारी पासून; २७ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होणार

v संदेशवाहक उपग्रह जीसॅट-३१चं यशस्वी प्रक्षेपण

v येत्या २० फेब्रुवारीला नाशिक ते मुंबई महामोर्चा - अखिल भारतीय किसान सभेचा इशारा 

आणि

v दुष्काळग्रस्त भागात नुकसान भरपाईपोटी एक हजार ४५० कोटी रूपयांचा पहिला हप्ता वितरित

****



 ोकपालसह अन्य मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुकारलेलं उपोषण काल रात्री मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मागे घेतलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी काल राळेगण सिद्धी इथं जाऊन अण्णांसोबत सुमारे सहा तास चर्चा केली, त्यानंतर अण्णा उपोषण मागे घेण्यास राजी झाले. अण्णांच्या सर्व मागण्या मान्य असून या मागण्यांवर सरकारकडून लवकरच योग्य कारवाई करण्यात येईल, तसंच लोकपाल नियुक्तीची प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वेळेत पूर्ण करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. अण्णांच्या मार्गदर्शनात संयुक्त चिकित्सा समितीची स्थापना करण्यात येणार असून समितीनं तयार केलेला मसुदा, येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मसुदा विधेयक स्वरूपात मांडण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नाशवंत शेतमालाच्या दरासाठी कृषीमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करणं तसंच कृषीमूल्य आयोगाला स्वायत्तता देण्याची अण्णांची मागणीही मान्य करत असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

****



 राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २५ फेब्रुवारी पासून सुरु होणार आहे. अधिवेशनाचं कामकाज दोन मार्च पर्यंत चालणार असून २०१९-२०२० चा अंतरिम अर्थसंकल्प २७ फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. विधानसभेत प्रलंबित असलेली सहा विधेयकं, तर विधानपरिषदेतलं एक प्रलंबित विधेयक या अधिवेशनकाळात मांडण्यात येणार आहे. विधानसभा आणि विधान परिषदेच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक काल पार पडली, त्यात हा निर्णय घेण्यात आला.

****



 २०१७ चे संगीत नाटक अकादमी पुरस्कार आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. प्रसिध्द नाट्य लेखक अभिराम भडकमकर, नाट्य दिग्दर्शक सुनील शानबाग, लोककलेचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे आणि तबला वादक योगेश सामसी यांच्यासह देशभरातल्या ४२ कलाकारांना राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवण्यात येईल. एक लाख रुपये, ताम्रपत्र आणि शाल असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. ललित कलेतल्या योगदानासाठी प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना डॉ. संध्या पुरेचा यांना यावर्षी मानाची फेलोशिप बहाल करण्यात येणार आहे. तीन लाख रुपये, ताम्रपत्र आणि शाल असं या फेलोशिपचं स्वरूप आहे.                    

****



 भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोच्या संदेशवाहक उपग्रह जीसॅट-३१चं आज पहाटेपूर्वी अडीच वाजेच्या सुमारास फ्रेंच गयाना अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण करण्यात झालं. प्रक्षेपणाच्या ४२ व्या मिनिटानंतर हा उपग्रह त्याच्या अपेक्षित कक्षेत स्थापित झाला. जीसॅट-३१ हा उपग्रह पूर्वीचा संदेशवाहक उपग्रह इनसॅट-४ सीआरची जागा घेईल, पुढची पंधरा वर्ष तो कार्यरत असेल.

****



 केंद्र सरकारच्या विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर आयकर विभागानं बेनामी मालमत्ता व्यवहार कायद्याअंतर्गत मोठ्या प्रमाणावर कारणे दाखवा नोटीस बजावल्याचं सरकारनं काल राज्यसभेत सांगितलं. ज्यांच्या खात्यात मोठी रक्कम जमा झाली, मात्र त्यांनी २०१७-१८ या आर्थिक वर्षात आयकर विवरणपत्रं भरलेलं नाही, अशांना ही नोटीस जारी करण्यात आल्याचं सरकारनं सांगितलं.

****



 राज्यात पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. ते काल मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. राज्यात मोठ्या भावाची भुमिका आम्ही यानंतरही बजावणार असून शिवसेना स्वतःच्या ताकदीवर लढेल असंही राउत म्हणाले. संयु्क्त जनता दलाचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी उद्धव ठाकरे यांच्या घेतलेल्या भेटीबाबत बोलतांना उद्धव ठाकरे हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या घटक पक्षांचे नेते असल्यानं किशोर यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतल्याचं राऊत म्हणाले.

****



 काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं निवडणुकीत चिन्हांची अट शिथील करावी, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्वबळावर निवडणूक लढवेल, अशी ठाम भूमिका रिपाईचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनी घेतली आहे. ते काल अमरावती इथं वार्ताहरांशी बोलत होते. रिपाईला लोकसभेची अमरावतीची जागा सोडण्याच्या बदल्यात आपल्याच चिन्हावर निवडणूक लढवावी असं दोन्ही काँग्रेसचं म्हणणं असलं तरी ती अट मान्य नसल्याचं गवई म्हणाले.

****



 सरकारनं गेल्या वर्षी दिलेली आश्वासनं पूर्ण न केल्यामुळे येत्या २० फेब्रुवारीला नाशिक ते मुंबई महामोर्चाचा इशारा अखिल भारतीय किसान सभेनं दिला आहे. गेल्या वर्षी शेतकऱ्यांच्या मोर्चानंतर सरकारनं मागण्या मान्य केल्या, मात्र त्याची अंमलबजावणी न झाल्याने नाशिक ते मुंबई असा १८० किलोमीटरचा पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा २७ फेब्रुवारीला मुंबईत पोहोचणार आहे.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 दुष्काळग्रस्त भागात नुकसान भरपाईपोटी मदत निधीचा एक हजार ४५० कोटी रूपयांचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला असून हा निधी लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात तातडीनं जमा करावा, असे निर्देश मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांनी दिले आहेत. राज्यातल्या सर्व विभागीय आयुक्त तसंच जिल्हाधिकाऱ्यांशी मुख्य सचिवांनी काल दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य सचिवांनी प्रधानमंत्री कृषी सन्मान योजना, महाडीबीटी आणि दुष्काळग्रस्त भागात निधीच्या वाटपाबाबत आढावा घेतला. प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेच्या कामाला गती द्यावी, असे निर्देशही जैन यांनी यावेळी दिले.

****



 संविधान बदलू पाहणाऱ्या भारतीय जनता पक्ष सरकारचे मनसुबे उधळून लावू असा निर्धार वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे. ते काल हिंगोली इथं आघाडीच्या सत्ता संपादन सभेत बोलत होते. भाजप-शिवसेनेबरोबरच त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांवरही टीका केली. लातूर लोकसभा मतदार संघातून बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार म्हणून निवृत्त गटशिक्षणाधिकारी राम गारकर यांची उमेदवारी आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी लातूर इथल्या सभेत जाहीर केली आहे.

****



 परभणी जिल्ह्यात जिंतूर जवळच्या औद्योगिक वसाहतीत असलेल्या त्रिलोक कॉटन जिनिंगला काल सकाळी आग लागून मोठं नुकसान झालं. या आगीमध्ये कापसासह, यंत्रंही जळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे, सुदैवानं या दुर्घटनेत कोणत्याही जीवित हानीचं वृत्त नाही. 

****



 बचत गटाच्या महिलांनी गावातल्या समस्यांवर जनजागृती करावी, असं उस्मानाबादचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी म्हटलं आहे. उस्मानाबाद इथं काल राष्ट्रीय जीवन्नोन्नती अभियान - उमेद अंतर्गत आयोजित महिला बचत गट उत्पादित वस्तूंच्या प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. दारूबंदी, पाणी बचत, आणि शौचालयं बांधकाम आणि त्याचा वापर यासाठी बचत गटाच्या महिलांनी काम करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

****



 जालना सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम देवरे याच्या विरुध्द एक लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी काल औरंगाबाद इथं लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रस्ते दुरुस्ती कामाचं देयक देण्यासाठी लाच मागितल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पंचासमक्ष पडताळणी करून जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ही कारवाई केली. कार्यकारी अभियंता देवरे यानं यापूर्वी याच कामासाठी तक्रारदाराकडून चार लाख रुपयांची लाच स्वीकारली होती.

****



 कवयित्री संध्या रंगारी यांना राज्यस्तरीय “सत्यशोधक साहित्य पुरस्कार” जाहीर झाला आहे. ‘वाताहतीची कैफियत’ या कविता संग्रहासाठी हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. सत्यशोधक विचार मंचचे अध्यक्ष कोंडदेव हाटकर यांनी ही माहिती दिली. सत्यशोधक विचार मंचाच्या वतीनं नांदेड इथं आयोजित, आंबेडकरवादी साहित्य संमेलनात येत्या १७ फेब्रुवारी रोजी रंगारी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

****



 भारत आणि न्युझीलंडदरम्यान महिला तसंच पुरुषांच्या तीन टी-ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेला आजपासून वेलिंग्टन इथं सुरुवात होत आहे. महिलांचा सामना सकाळी साडेआठ वाजता तर पुरुषांचा सामना दुपारी साडेबारा वाजता सुरु होईल. दोन्ही संघांनी न्युझीलंडविरुध्दची एकदिवसीय क्रिकेट मालिका जिंकली आहे.

****



 परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तहसील कार्यालयावर काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. रोजगार हमी योजनेची कामं सुरु करण्यात यावी, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आदी मागण्यांचं निवेदन प्रशासनाला देण्यात आलं.

****



 जालना शहरालगतच्या वळण रस्त्यावर भरधाव ट्रकनं दुचाकीला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. काल दुपारी ही घटना घडली. या अपघातानंतर दोन्ही बाजूंची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

****



 हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी शहरातून जाणाऱ्या हिंगोली - नांदेड या मुख्य रस्त्यावर जुना बसस्थानकाजवळ ट्रकनं दिलेल्या जोरदार धडकेमुळं एक युवक ठार झाला आहे. काल संध्याकाळी ही घटना घडली.

****

  

 रत्नागिरी जिल्ह्यातल्या नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाबाबतची भूमिका समजावून घेण्यासाठी काल रत्नागिरीत आयोजित केलेली सुकथनकर समितीची जनसुनावणी शिवसेनेच्या शिष्टमंडळानं बंद पाडली. नाणार प्रकल्पाबाबतचा अहवाल तयार करण्यासाठी राज्याचे माजी मुख्य सचिव द. म. सुकथनकर यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पानं पाच तज्ज्ञांची समिती नियुक्त केली आहे, या समितीची जनसुनावणी काल सकाळी सुरु झाली होती.

*****

***

No comments:

Post a Comment