Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 06 February
2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६
फेब्रुवारी २०१९ दुपारी १.०० वा.
****
काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी
आज संसद भवन परिसरात वेगवेगळ्या मागण्यांसाठी निदर्शनं केली. नागरिकत्व विधेयकातल्या
सुधारणेच्या विरोधात काँग्रेसनं, प्राध्यापक भरतीसाठी दोनशे बिंदू नामावली पद्धत वापरण्याच्या
मागणीसाठी समाजवादी पक्ष, बहुजन समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल आणि भारतीय कम्युनिस्ट
पक्षांनी तर आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याच्या मागणीसाठी तेलुगु देशम पक्षानं
निदर्शनं केली.
दरम्यान, बिजू जनता दलाचे खासदार लाडूकिशोर स्वैन
यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर आज लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
स्वैन यांचं भुवनेश्वर इथं आज सकाळी निधन झालं, ते ७१ वर्षांचे होते.
दुसरीकडे, राज्यसभेचं
कामकाज सुरू झाल्यानंतर नागरिकत्व विधेयकावरून विरोधकांनी गोंधळ केल्यामुळे सभापती
एम. व्यंकय्या
नायडू यांनी सदनाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करावं लागलं.
****
२०१७ चे संगीत नाटक
अकादमी पुरस्कार आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. प्रसिध्द
नाट्य लेखक अभिराम भडकमकर, नाट्य दिग्दर्शक सुनील शानबाग, लोककलेचे अभ्यासक डॉ. प्रकाश
खांडगे आणि तबला वादक योगेश सामसी यांच्यासह देशभरातल्या ४२ कलाकारांना यावेळी राष्ट्रपतींच्या
हस्ते गौरवण्यात आलं. एक लाख रुपये, ताम्रपत्र आणि शाल असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना डॉ. संध्या पुरेचा यांना या वर्षी मानाची फेलोशिप बहाल
करण्यात आली. तीन लाख रुपये, ताम्रपत्र आणि शाल असं या फेलोशिपचं स्वरूप आहे.
****
काँग्रेस नेत्या
प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांची काळा पैसा पांढरा केल्या प्रकरणी सक्तवसुली
संचालनालय आज चौकशी करणार आहे. वाड्रा यांनी, लंडन इथं दोन घरं, सहा सदनिकांसह एकोणीस
लाख पाऊंडाची मालमत्ता खरेदी केल्यासंदर्भात ही चौकशी होणार आहे. या प्रकरणी दिल्ली
न्यायालयानं गेल्या आठवड्यात वाड्रा यांना जामीन मंजूर केला आहे.
****
भारतीय रिजर्व्ह बँकेनं खाजगी क्षेत्रातल्या ॲक्सिस बँकेला दोन वेगवेगळ्या कारणांसाठी दोन कोटी
वीस लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. यूको बँकेला दोन कोटींचा आणि सिंडिकेट बँकेलाही
एक कोटी रुपयांचा दंड ठोठावल्याचं रिजर्व्ह बँकेनं
काल सांगितलं. ॲक्सिस आणि यूको बँकांनी चेकसंदर्भातल्या नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल
तसंच ॲक्सिस बँकेनं, जप्त केलेल्या नोटांसदर्भातल्या निर्देशांचं उल्लंघन केल्याबद्दल
हा दंड करण्यात आला आहे.
****
राज्य शासनातर्फे
मुंबईत येत्या २५ ते २८ फेब्रुवारीदरम्यान
आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. भारतासह कंबोडिया, फिलिपाईन्स
आणि इंडोनेशिया या देशांचे कलाकार या महोत्सवात संस्कृत आणि हिंदी भाषेत रामायण सादर
करणार आहेत. या महोत्सवाच्या तिकिटांचं ऑनलाईन बुकिंगही करता येणार आहे.
****
राज्यातल्या आदिवासींसाठी
सुरू असलेल्या विविध कल्याण योजनांचा आढावा घेण्यासाठी राज्य शासनानं एक समिती नियुक्त
केली आहे. सतरा सदस्यांच्या या समितीचे प्रमुख म्हणून माजी आमदार तसंच श्रमजीवी संघटनेचे
अध्यक्ष विवेक पंडित हे काम पाहतील. आदिवासींना रोजगाराच्या संधी, किमान वेतन आणि योग्य
जीवनमान मिळवून देण्यासाठी हाती घेतलेल्या कामांची सद्यस्थिती ही समिती जाणून घेणार
आहे. आदिवासी भागातली मुलं शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठीचे उपायही ही समिती
सुचवेल. दर तीन महिन्यांनी ही समिती आपला अहवाल सरकारला सादर करणार आहे.
****
पालघर जिल्ह्यातल्या
डहाणू आणि तलासरी तालुक्याच्या काही भागांत मागच्या तीन महिन्यांपासून वारंवार जाणवणाऱ्या
भूकंपाच्या धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर प्रशासन शक्य त्या सगळ्या उपाययोजना करत आहे. याचाच एक भाग म्हणून पालघर,
डहाणू आणि तलासरी इथं आपत्ती नियंत्रण कक्ष तयार करण्यात आले असल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
भारत आणि
न्यूझीलंड महिला क्रिकेट टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेला पहिला न्यूझीलंडनं २३ धावांनी
जिंकला आहे.
*****
***
No comments:
Post a Comment