Wednesday, 6 February 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 06.02.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०६  फेब्रुवारी २०१९ सकाळी ११.०० वाजता

****



 अंध लोकांना चलनी नोटा ओळखता याव्यात या दृष्टीनं एक मोबाईल ॲप तयार करण्यावर विचार करावा, असं मुंबई उच्च न्यायालयानं भारतीय रिजर्व्ह बँकेला सांगितलं आहे. नव्या नोटा आणि नाणी स्पर्शानं ओळखणं अवघड असल्याचं राष्ट्रीय अंध संघटना, एनएबीनं यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे, त्यावर न्यायालयानं हा उपाय सुचवला आहे. यावर विचार करण्यासाठी न्यायालयानं रिजर्व्ह बँकेला चार आठवड्यांचा वेळ दिला आहे.

****



 २००८ च्या मालेगाव बाँबस्फोट खटला प्रकरणाच्या सुनावणीत येणारे सगळे अडथळे दूर करावेत आणि या खटल्याची सुनावणी सुरळीतपणे चालेल, हे सुनिश्चित करावं, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं राष्ट्रीय तपास संस्था- एनआयए ला दिले आहेत. या खटल्यासंदर्भात चार हजारहून जास्त पुरावे सादर करू इच्छिणारे वीस हून जास्त अर्ज दाखल झाले असून, अशा स्थितीत या खटल्याची सुनावणी लांबत चालल्याचं नमूद करत, मूळ खटला सुरळीतपणे चालण्याची जबाबदारी एनआयएची असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.

****



 केंद्राच्या अंतरिम अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या, शेतकरी सन्मान योजनेच्या अंमलबजावणीचं नियोजन सुरू करण्यात आलं आहे. या योजनेच्या संभाव्य लाभार्थ्यांची यादी तयार करण्याचे आदेश, राज्य शासनानं प्रत्येक जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. ही आकडेवारी प्राप्त होताच मदतीचा पहिला हप्ता थेट शेतऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.

 दरम्यान, देशातल्या शेतीशी संबंधित असलेल्या सगळ्या कुटुंबांचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. चालू पीक वर्षासाठी हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणात, शेतकरी कुटुंबांची मिळकत, खर्च आणि कर्ज याची माहिती घेण्यात येणार आहे.

****



 भारत आणि न्यूझीलंड महिला क्रिकेट संघांदरम्यान टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेला पहिला सामना सध्या वेलिंग्टन इथं सुरू आहे. न्यूझीलंड संघानं प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकांत चार बाद एकशे एकोणसाठ धावा केल्या, अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा, भारताच्या नवव्या षटकात एक बाद ८४ धावा झाल्या होत्या. दोन्ही देशांच्या पुरुष संघातही टी ट्वेंटी मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे.

*****

***

No comments:

Post a Comment