Monday, 11 February 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 11.02.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 11 February 2019

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ११ फेब्रुवारी  २०१ सकाळी ७.१० मि.

****



Ø देशाच्या विकासासाठी सरकार आवश्यक ती पावलं उचलत असल्याचं पंतप्रधानांचं आश्वासन

Ø राज्याचं नवीन सर्वंकष खनिज धोरण लवकरच तयार करण्यात येणार - मुख्यमंत्री

Ø हिंगोली इथं आयोजित ‘अटल महाआरोग्य शिबीराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद

आणि

Ø न्यूझीलंडविरुद्ध अखेरच्या टी-२० क्रिकेट सामन्यांत भारताच्या दोन्ही संघांचा पराभव; मालिकाही गमावली

*****



 देशाच्या विकासासाठी सरकार आवश्यक ती पावलं उचलत असल्याचं आश्वासन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे. तामिळनाडूमधल्या तिरुपूर इथं झालेल्या सभेत ते काल बोलत होते. यंदाच्या अर्थसंकल्पात देशाच्या विकासासाठी आवश्यक असलेले अनेक निर्णय घेतल्याचं ते म्हणाले. सरकारच्या विविध योजनांचा उल्लेख करताना, आयुष्मान भारत ही जगातली सर्वात मोठी आरोग्य सेवा योजना असल्याचं पंतप्रधानांनी सांतिगलं. तत्पूर्वी पंतप्रधानांनी तिरुपूर इथं कामगार रुग्णालयाच्या कोनशिलेचं अनावरण, तसंच त्रिची विमानतळाच्या नवीन इमारतीची पायाभरणी केली.

****



 विद्यमान सरकारनं फ्रान्ससोबत राफेल विमान खरेदी रार केल्यामुळे देशाचे हजारो कोटी रुपये तर वाचलेच त्यासोबतच युद्ध सामर्थ्यातही वाढ झाली असं, केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. काँग्रेसनं यासंदर्भात केलेल्या टीकेला उत्तर देतांना फेसबुक या सामाजिक संकेतस्थळाद्वारे त्यांनी हे नमूद केलं. खोटे आरोप करणाऱ्या काँग्रेस पक्षानं यासंदर्भातील अर्धीच कागदपत्रं सादर करत, स्वत:चा खोटेपणा आणखीच उघड केला, आपली विश्वसार्हता यामुळे पूर्णपणे संपुष्टात आल्याची जाणी काँग्रेसला असायला हवी, असं मत जेटली यांनी व्यक्त केलं आहे.



 राफेलबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या दोन भाषणांमधून त्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दलचा वैयक्तिक द्वेषच दिसून येतो असं सांगून राहुल गांधींनी संसदेची प्रतिमा मलिन केल्याचा आरोपही जेटली यांनी केला.

****



 खनिज आणि खाणकाम क्षेत्रातल्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासोबत या क्षेत्रात असलेल्या रोजगाराच्या भरपूर संधी आणि गुंतवणुकीला चालना मिळावी, यासाठी राज्याचं नवीन सर्वंकष खनिज धोरण तयार करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नागपूर इथं काल खनिज आणि खाणकाम क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मिनकॉन कॉनक्लेव्ह- २०१९ या उद्योजकांच्या राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. खनिज क्षेत्रातल्या उद्योगांना वीजदरात सवलत देण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

****



 स्मृतीभ्रंश अर्थात अल्झायमर आजारावर उपचार आणि रुग्णांच्या नातेवाईकांचं समुपदेशन करण्यासाठी राज्यातल्या प्रत्येक जिल्हा रूग्णालयात मेमरी क्लिनिकसुरु करण्यात आलं आहे.



 आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली. या रूग्णालयांमध्ये या आजाराशी संबंधित रुग्णांची तपासणी करण्यासह, त्यांचं वर्गीकरण, विविध उपचार, तसंच त्यांना सांभाळणाऱ्यांसाठी योग्य मार्गदर्शन उपलब्ध असेल, असं शिंदे यांनी सांगितलं.

****



 वसंत पंचमी काल देशभरात साजरी झाली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वसंत पंचमीनिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. वसंत ॠतूचं आमन आणि ज्ञानाच्या पूजेशी जोडलेला हा सण कुटुंब, समाज आणि देशात शिक्षण आणि ज्ञानाचा प्रसार करेल, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधानांनी, नवी ऊर्जा आणि नवस्फूर्तीचं प्रतीक असलेल्या वसंत पंचमीच्या शुभेच्छा देत देवी सरस्वती देवी ज्ञान आणि समृद्धी देवो, अशी प्रार्थना केली.



 पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरामध्ये काल वसंत पंचमीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा साजरा झाला. यानिमित्तानं शहरातून काढलेल्या विठ्ठल रुक्मिणीच्या मिरवणुकीत भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 प्रसिद्ध साहित्यिक पु.ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी निमित्त औरंगाबाद इथं काल मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं 'पु.लं चे साहित्य' या विषयावर एकदिवसीय चर्चासत्र घेण्यात आलं. साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या अध्यक्षतेखाली दोन सत्रात हे चर्चासत्र झालं. ज्येष्ठ विनोदी लेखक मुकुंद टाकसाळे आणि डॉ. शिरीष देखणे यांचं निबंध वाचन झालं. राष्ट्रपिता महात्मा गांधी, बाबा आमटे यांच्या विचारातून पु.लं.चं व्यक्तिमत्व तयार झाल्याचं टाकसाळे यावेळी म्हणाले.

****



 हिंगोली इथं काल ‘अटल महाआरोग्य शिबीर’ घेण्यात आलं. या शिबिरात जवळपास एक लाख नागरिकांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवून तपासणी करून घेतली. या विषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर…



तज्ञडॉक्टरा मार्फत तपासनी केल्या नंतर आवश्यकतेनूसार  औषधी, एम.आर.आय, सिटीस्कॉन, रक्ताच्या तपासण्या व शस्त्रक्रिया करण्यात आली. संपूर्ण शिबिरामध्ये विविध प्रकारचे दिडहजार डॉक्टर आणि २९ ओपीडी मार्फत रूग्णांची तपासणी करण्यात आली. दंत चिकित्सा व शस्त्रक्रियासाठी ४ मोबाईल व्हॅन उपलब्ध करण्यात आल्या होत्या. सव्वा कोटी औषधीचे वाटप रूग्णांना करण्यात आले. या शिबिरात ज्यांच्यावर उपचार करणे शक्य नाही अश्या रूग्णांना नापूर, नांदेड, औरंगाबाद, पुणे, मूंबई येथे नेऊन अत्याधूनिक पध्दतीचे उपचार करण्यात येणार आहे. रमेश कदम, आकाशवाणी वार्ताहर, हिंगोली.



****



 न्यूझीलंडविरुद्ध अखेरच्या तिसऱ्या टी-२० क्रिकेट सामन्यात भारताच्या महिला आणि पुरुष, अशा दोन्ही संघांचा काल पराभव झाल्यानं, दोन्ही संघांनी मालिकाही गमावली.



 भारतीय पुरुष संघाचा न्यूझीलंडनं कालच्या सामन्यात चार धावांनी पराभव केला. न्यूझीलंडनं दिलेलं २१२ धावांचं लक्ष्य गाठणारा भारतीय संघ २०८ धावाच करू शकला.

     

 न्यूझीलंडच्या मुन्रोला सामनावीर तर सिफर्टला मालिकावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं.



 त्याआधी सकाळी झालेल्या महिला संघांच्या सामन्यात, न्यूझीलंड संघानं भारतीय संघाचा दोन  धावांनी पराभव केला. न्यूझीलंडनं दिलेलं १६१ धावांचं आव्हान गाठताना महिला संघ १५९ धावाच करू शकला.

****



 सोलापूर जिल्ह्यात काल पहाटे शस्त्रास्त्रानं भरलेली मोटार हस्तगत केल्यानंतर गुंड आणि पोलिसांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत एक गुंड ठार झाला, तर तीन पोलीस जखमी झाले. सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत उलेगाव इथं पोलीस गस्त घालत असताना संशय आल्यानं त्यांनी ही मोटार थांबवली. या मोटारीमध्ये चार-पाच व्यक्ती तसंच शस्त्रास्त्रं आणि दारुगोळा होता. पोलिसांनी विचारपूस सुरु करताच गुंडांनी पोलिसांवर हल्ला केला. पोलिसांनी बचावासाठी केलेल्या गोळीबारात मोटार चालक ठार झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.

****



 औरंगाबाद शहरात चोरी करणाऱ्या टोळीला बुलडाणा पोलिसांनी अटक केली. गेल्या चार तारखेला या टोळीनं समर्थ नगर परिसरात चोरी करुन पन्नास तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि एक लाख रुपये रोख रक्कम चोरली होती. या आरोपींना काल औरंगाबादच्या न्यायालयात हजर केलं असता, त्यांना १३ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

****



 औरंगाबाद इथले माजी उपमहापौर, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते ‘अल्हाज अजीम खान ऊर्फ दादामियाँ ’  यांचं काल संध्याकाळी निधन झालं. ते ७१ वर्षांचे होते. काँग्रेसच्या शहराध्यक्ष पदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती. त्यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी दहा वाजता शहरातील सिल्लेखाना कब्रस्तानात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

****



 काँग्रेस पक्षाचे जालना इथले ज्येष्ठ नेते विष्णू दौलतराव पवार यांचं काल दुपारी सिंदखेडराजा जवळ एका अपघातात निधल झालं. नागपूर - जालना महामार्गावर आपल्या चारचाकीचं पंक्चर दुरुस्त करत असताना,  भरधाव आलेल्या ट्रेलरने दिलेल्या धडकेत त्यांच मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिंदखेडराजा इथल्या सरकारी रुग्णालयात हलवला आहे.

****



 आदिवासीरत्न ठकाबाबा गांगड यांचं काल सकाळी अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातल्या उडदावणे या त्यांच्या जन्मगावी निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. पशु-पक्षांचे हुबेहुब आवाज काढणं, नाटक, गाणी, पारंपारिक कथा सांगणं या त्यांच्या कलागुणांचं देशभर कौतुक झालं. १९६५ साली तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या हस्ते सुवर्ण पदक मिळालेल्या आदिवासी पथकात त्यांचा सहभाग होता.

****



 वापरलेल्या सॅनेटरी नॅपकिनची विल्हेवाट लावणारी विशेष यंत्रणा, लातूर महापालिकेतर्फे, उभारण्यात आली आहे. अशी यंत्रणा उभारणारी लातूर ही मराठवाड्यातली ही पहिलीच महापालिका असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नैसर्गिक विघटन होत नसल्यानं, प्रदूषण वाढवणारे सॅनिटरी नॅपकीन, या यंत्रणेत शास्त्रोक्त पद्धतीनं नष्ट केले जातात.

****



 अंबाजोगाई इथं नरहर कुरुंदकर स्मृती संस्थेचे विविध पुरस्कार काल प्रदान करण्यात आले. कवी प्राध्यापक इंद्रजीत भालेराव यांना नरहर कुरूंरकर साहित्य सेवा पुरस्कार,  लातूर इथले सामाजिक कार्यकर्ते माधव बावगे यांना स्वातंत्र्यसेनानी .आर.डी. देशपांडे स्मृती सामाजिक सेवा पुरस्कार, तर पोखर्णीचे त्र्यंबक वडसकर यांना संतुकराव भोकरे स्मृती बालसाहित्य सेवा पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आलं

****



 नांदेड इथं कालपासून नरहर कुरुंदकर व्याख्यानमालेला सुरुवात झाली. सुप्रसिद्ध हिंदी नाटककार, कवी आणि समीक्षक डॉ. नरेंद्र मोहन हे प्रमुख वक्ते असून, आज सायंकाळी सहा वाजता त्यांचं ‘विभाजन - हिंदी, उर्दू कहानियोंका विशेष संदर्भ’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.

****



 औरंगाबाद इथं काल ‘कृतीशील शिक्षक महाराष्ट्र’ समूहाच्या वतीनं पहिलं राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन घेण्यात आलं. या संमेलनात परिसंवाद, कथाकथन, कविसंमेलन, चर्चासत्र आदी कार्यक्रम घेण्यात आले.

*****

***

No comments:

Post a Comment