Wednesday, 13 February 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 13.02.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 13 February 2019

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १३  फेब्रुवारी  २०१ सकाळी ७.१० मि.

****



Ø राज्यात खुल्या प्रवर्गातल्या आर्थिक दुर्बलांना दहा टक्के आरक्षणाचा शासननिर्णय जारी

Ø दुष्काळग्रस्तांसाठीच्या आकस्मिकता निधीच्या मर्यादेत दोन हजार कोटी रुपयांनी वाढ

Ø राज्यात ३४९ फिरती पशुवैद्यकीय चिकित्सालयं सुरू करण्यास राज्यशासनाची मान्यता

Ø प्रेक्षकांना पसंतीनुसार दूरचित्रवाणी वाहिन्या निवडण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

आणि

Ø मराठवाडा साहित्य परिषदेचा लोटू पाटील पुरस्कार प्रसिद्ध रंगकर्मी मोहन आगाशे यांना जाहीर

****



 खुल्या प्रवर्गातल्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना केंद्र सरकारनं जाहीर केलेला दहा टक्के आरक्षणाचा निर्णय राज्यसरकारनं लागू केला आहे. काल याबाबतचा शासननिर्णय जारी करण्यात आला. या निर्णयानुसार आता शासकीय सेवा तसंच शैक्षणिक संस्थांमध्ये खुल्या प्रवर्गातल्या आर्थिक दृष्ट्या मागास घटकांसाठी दहा टक्के जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेले उमेदवार या आरक्षणासाठी पात्र असतील.



 पूर्णा प्रकल्पांतर्गत सिद्धेश्वर आणि येलदरी धरणामुळे हिंगोली जिल्ह्याच्या औंढा नागनाथ तालुक्यातल्या पुनर्वसित गावांमधल्या नागरी सुविधांसाठी एक कोटी ३७ लाख ६७ हजार दोनशे रुपयांच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यतेचा शासननिर्णयही काल जारी करण्यात आला.



 नांदेड इथल्या शासकीय आयुर्वेद आणि युनानी रसशाळेत औषध परीक्षण प्रयोगशाळेसाठी यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी ४० लाख रुपये मंजुरीचा शासन निर्णयही काल निर्गमित करण्यात आला आहे.

****



 राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल राज्याच्या ग्रामीण भागासाठी महत्त्वाचे अनेक निर्णय घेण्यात आले. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या मर्यादेत दोन हजार कोटी रुपयांची तात्पुरत्या स्वरुपाची वाढ करण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिली. आता ही रक्कम दोन हजार १५० कोटी रुपये इतकी झाली आहे. गेल्या खरीप हंगामातल्या १५१ दुष्काळी तालुक्यातल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी तातडीनं मदत वाटप करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. 



 राज्यात ३४९ फिरती पशुवैद्यकीय चिकित्सालयं स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात दुर्गम भागात ८० चिकित्सालयं सुरू करण्यात येणार आहेत. या फिरत्या पशू चिकित्सालयांसाठी १६ कोटी ७४ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.



 केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान योजना राबवण्यास राज्य मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. या अभियानाअंतर्गत जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्राम पंचायतीतल्या सदस्यांना प्रशिक्षण देऊन क्षमता वाढीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.



 राज्यातल्या सहकारी सुतगिरण्यांना अर्थसहाय्य करण्याच्या आकृतीबंधातल्या सुधारणांनाही या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातल्या कापूस उत्पादक प्रदेशात सहकारी सूत गिरण्यांच्या स्थापनेला प्रोत्साहन मिळणार आहे.

****



 दुष्काळावर राजकारण करण्यापेक्षा, बळीराजाला मदत करुन आपलं कर्तव्य पार पाडण्यासाठी आपण मराठवाड्यात आलो असल्याचं युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते उस्मानाबाद इथं शेतकरी आणि महिलांना मदत वाटप कार्यक्रमात बोलत होते. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातल्या अकरा महिलांना शिलाईयंत्र, बारा शेतकऱ्यांना शेळ्या तसंच पंधरा गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टाक्यांचं वाटप यावेळी करण्यात आलं. दोन दिवसांपासून लातूर आणि उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर असलेले ठाकरे यांनी काल सोलापूर जिल्ह्यातही मोहोळ, माढा या तालुक्यात दुष्काळी स्थितीची पाहणी केली.

****



 लोकसभेनं वित्त विधेयक काल आवाजी मतदानानं संमत केलं. या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना, अर्थमंत्री पियुष गोयल यांनी, प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा पहिला हप्ता देण्यासाठी, सर्व राज्य सरकारांनी आपापल्या राज्यातल्या पात्र शेतकऱ्यांची आकडेवारी उपलब्ध करून देण्याचं आवाहन केलं.

       

 त्यापूर्वी काल सकाळी, संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात, दिवंगत पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या तैलचित्राचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अनावरण झालं.



 दरम्यान, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज समारोप होत आहे.

****



 भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणं ट्राय नं आता ग्राहकांना त्यांच्या पसंतीनुसार वाहिन्या निवडण्याची मुदत येत्या ३१ मार्चपर्यंत वाढवली आहे. कुठल्या वाहिन्या निवडायच्या यामुळे संभ्रमात असलेल्या ग्राहकांसाठी, सर्वोत्तम वाहिन्या समूहाचा पर्याय देण्याचे निर्देशही ट्रायनं डीटीएच ऑपरेटर आणि स्थानिक केबल चालकांना दिले आहेत.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या दोन पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. यंदाचा लोटू पाटील पुरस्कार प्रसिद्ध रंगकर्मी मोहन आगाशे यांना, तर यशवंतराव चव्हाण विशेष पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते भाई संपतराव पवार यांना जाहीर झाला आहे. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी येत्या १२ मार्चला, हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. अकरा हजार रूपये रोख, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

****



 शिवार सांस्कृतिक प्रतिष्ठानचा शेतकरी साहित्य पुरस्कार कवी अमृत तेलंग यांना काल औरंगाबाद इथं, साहित्यिक रा.रं. बोराडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तेलंग यांच्या 'पुन्हा फुटतो भादवा' या काव्यसंग्रहाला हा पुरस्कार मिळाला आहे. 'संदीप दळवी कथालेखन स्पर्धेचे पुरस्कारही यावेळी देण्यात आले.

****



 ग्रामपंचायत निवडणूकीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातल्या वाळूज परिसरातल्या विविध ग्रामपंचायतींच्या २२ सदस्यांना औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवलं आहे. यात लांझी तसंच नारायणपूरच्या दोन महिला सरपंचाचाही समावेश आहे. अपात्र ठरलेल्या जागांवर पुन्हा निवडणूक घेण्यात येईल.

****



 जालना इथला लाचखोर महसूल अधिकारी बाबुराव नानासाहेब आर्दड याचं संपूर्ण सेवानिवृत्तीवेतन काढून घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. तालुका भूमी अभिलेख निरीक्षक म्हणून कार्यरत असताना, लाच घेतल्याचं सिद्ध झाल्यानं, उच्च न्यायालयानं आर्दड याना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. शासकीय कर्मचाऱ्याचा दोष सिद्ध झाल्यास, त्यांना देण्यात येणाऱ्या शिक्षेच्या समन्यायी तत्त्वानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

****



 जालना जिल्ह्यातल्या अंबड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शिवाजी बनगे यांना चार हजार रूपयांच्या लाचेची मागणी केल्या प्रकरणी लाचलुचपत पथकानं पकडलं आहे. तक्रारदार यांचे वैद्यकीय देयक काढण्यासाठी बनगे यांनी ही लाच मागितली होती.

****



 बीड जिल्ह्यातल्या माजलगाव भूमी अभिलेख कार्यालयातला भूमापक अरूण राठोड याला एक हजार रुपये लाच घेतांना लाचलुचपत पथकानं काल रंगेहाथ पकडलं. जमिनीचं क्षेत्र निश्चित करण्यासाठी राठोड यानं ही लाचेची मागितली केली होती.

****



 बुलडाणा जिल्ह्याच्या मोताळा तालुक्यात काल सुमारे सव्वा कोटी रुपये दर्शनी मूल्याच्या बनावट नोटा पोलिसांनी हस्तगत केल्या, या प्रकरणी एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, त्याच्या फरार साथीदारांचा शोध सुरू आहे.

****



 परभणी जिल्ह्यातल्या बाभूळगाव आणि सेलू इथल्या प्रस्तावित औद्योगिक वसाहतीचे प्रश्न जलदगतीनं सोडवून शेतकऱ्यांना तातडीनं मोबदला देण्याचे निर्देश पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले. काल मंत्रालयात या संदर्भात झालेल्या आढावा बैठकीत लोणीकर बोलत होते. परभणी जिल्ह्यातील बाभूळगाव आणि उजळंबा इथं ७०२ हेक्टर जमिनीवर औद्योगिक वसाहत प्रस्तावित आहे.

****



 राज्याच्या एकात्मिक जल आराखड्यात कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठी २३ पूर्णांक ६६ दशलक्ष घनफूट पाण्याची तरतूद करण्यात आल्याबदल उस्मानाबादचे आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. आमदार ठाकूर यांनी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठी पाण्याची तरतूद करण्याची मागणी केली होती.

****



 आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जालना जिल्हा प्रशासनाकडून मतदार याद्या अद्ययावत करण्यात आल्या आहेत. जिल्ह्याच्या मतदार यादीत ६६ हजार ६०९ मतदारांची नावं वाढली असून, पाच हजार २९० मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. जालना जिल्ह्यातल्या मतदारांची संख्या आता १५ लाख १६ हजार ४३१ इतकी झाली आहे.

****



 वीज देयकातली वाढीव आकारणी, विविध अधिभार, आणि इतर प्रश्नांसंदर्भात औरंगाबाद जिल्ह्यातल्या लघू, मध्यम आणि सूक्ष्म उद्योजकांनी काल ‘वीज बील होळी’ आंदोलन केलं. औरंगाबाद इथं रेल्वे स्थानक औद्योगिक वसाहतीतल्या सीएमआयए कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं.

****



 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं काल हिंगोली इथं बेरोजगारीसह इतर मुद्यांवरुन शासनाचा धोरणांचा निषेध करण्यासाठी भजी तळून आंदोलन केलं. गांधी चौकात झालेल्या या अनोख्या आंदोलनानं नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं.

****



 औरंगाबाद इथं आजपासून दोन दिवस राष्ट्रीय गझल चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. शहरातल्या डॉ. रफिक झकेरिया शिक्षण संस्थेच्या परिसरात आयोजित या चर्चासत्रात देशभरातले मान्यवर सहभागी होणार आहेत.

*****

***

No comments:

Post a Comment