Wednesday, 13 February 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 13.02.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 13 February 2019

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १३ फेब्रुवारी २०१९ दुपारी .०० वा.

****



 संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी प्रारंभी समाजवादी पक्षाच्या सदस्यांच्या गोंधळामुळे लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी लोकसभेचं कामकाज बारा वाजेपर्यंत तहकूब केलं. राज्यसभेमध्ये प्रथम माजी सदस्य चैतन्य प्रसाद मांझी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला. भारतीय वायुदलाच्या कामगिरीबाबतचा नियंत्रक आणि महालेखापरिक्षक - कॅगचा अहवाल पटलावर मांडण्यात आला. या अहवालात राफेल व्यवहाराचाही समावेश आहे. मात्र समाजवादी पक्षाच्या सदस्यांनी सुरू केलेल्या गोंधळामुळे सभापती एम. वेंकय्या नायडू यांनी सदनाचं कामकाज बारा वाजेपर्यंत तहकूब केलं. बारा वाजता कामकाज सुरू झाल्यानंतर प्रथम राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबाबत धन्यवाद प्रस्ताव मंजूर झाला. त्यानंतर २०१९ च्या अंतरिम अर्थसंकल्पाला चर्चेशिवाय मंजुरी देण्यात आली. त्यानंतर राज्यसभेचं कामकाज संस्थगित करण्यात आलं. लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यावर नागरिकत्व विधेयकातल्या सुधारणांबाबत बोलताना, भाजप खासदार किरिट सोमैय्या यांनी या विधेयकाला विरोध करण्याबद्दल तृणमूल काँग्रेसवर टीका केली.



 दरम्यान, भाजप सरकारनं केलेल्या राफेल सौद्याची किंमत याआधीच्या संपुआ सरकारनं केलेल्या सौद्याहून दोन पूर्णांक शहाऐंशी टक्क्यांनी कमी असल्याचं कॅगच्या अहवालात म्हटलं असल्याचं वृत्त पीटीआय या वृत्त संस्थेनं दिलं आहे. या अहवालामुळे काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांचा राफेल व्यवहारातल्या कथित  घोटाळ्याबाबतचा दावा निकालात निघाला असून, या पक्षांचा खोटेपणा उघडकीला आला आहे, असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. सत्याचा विजय होतो, हे सिद्ध झाल्याचं जेटली यांनी म्हटलं आहे.

****



 संरक्षण मंत्रालयानं नौदलासाठी एकशे अकरा हेलिकॉप्टर खरेदीची प्रक्रिया सुरू केली आहे. या हेलिकॉप्टरची निर्मिती करू इच्छिणाऱ्या भारतीय तसंच परदेशी कंपन्यांनी प्रस्ताव पाठवण्याचं आवाहन संरक्षण मंत्रालयानं केलं असून, या एकशे अकरा पैकी पंचाण्णव हेलिकॉप्टरची निर्मिती भारतातच करावी लागेल, असं स्पष्ट केलं आहे. हे नवे हेलिकॉप्टर जुन्या चेतक हेलिकॉप्टरची जागा घेतील, आणि यांचा उपयोग तपास, मदत आणि बचाव कार्यासाठी केला जाईल. मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये संरक्षण खरेदी परिषदेनं या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. या परियोजनेमुळे सरकारच्या `मेक इन इंडिया` अभियानाला चालना मिळणार असून, यामुळे भारताची हेलिकॉप्टर निर्मिती क्षमताही वाढणार आहे.

****



 घटनेची तत्व आणि तरतुदींवर मोदी सरकारकडून सातत्यानं आघात केले जात असल्याचं मत काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांनी व्यक्त केलं आहे. काँग्रेसच्या संसदीय समितीची आज बैठक झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. संस्थांचं खच्चीकरण होत असून राजकीय विरोधकांना त्रस्त केलं जात आहे आणि मतस्वातंत्र्यही धोक्यात आलं आहे, असा आरोपही गांधी यांनी यावेळी केला.

****



 कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदत वाढवून मिळण्याची पुणे पोलिसांची मागणी फेटाळण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला. मात्र, याप्रकरणात आरोपी असलेले पाच मानवाधिकार कार्यकर्ते आता नियमित जामीनासाठी अर्ज करू शकतील, असंही सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं.

****



 केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडच्यावतीने बुलढाणा जिल्ह्यात  मेहकर, लोणार, देऊळगांव राजा, सिंदखेड राजा आणि मोताळा , या पाच ठिकाणी तूर खरेदी केंद्रं सुरु करण्यात आली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. या केद्रांवर शेतकऱ्यांनी आपली तूर विक्री करण्याकरता आधी नोंदणी करुन घ्यावी आणि विक्रीच्या तारखेबाबतचा संदेश आपल्या मोबाईल फोनवर आल्यानंतरच तूर केंद्रांवर आणावी, असं प्रशासनातर्फे सांगण्यात आलं आहे.

****



 गुजरातमधल्या पाचशे आठ किलोमीटर लांबीच्या भारत-पाकिस्तान सीमेवर तीनशे चाळीस किलोमीटर्सचं कुंपण घालणं शक्य असून, त्यापैकी दोनशे ऐंशी किलोमीटर लांबीच्या कुंपणाचं काम पूर्ण झालं असल्याची माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिजीजू यांनी काल लोकसभेत दिली. उर्वरित साठ किलोमीटर लांबीचं कुंपण मार्च २०२० पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. एकशे अडुसष्ट किलोमीटर सीमेवर प्रत्यक्ष कुंपण शक्य नसल्यामुळे सीमासुरक्षा दलाच्या जवानांची गस्त आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, याद्वारे सीमेचं रक्षण केलं जात असल्याचं रिजिजू यांनी सांगितलं.

*****

***

No comments:

Post a Comment