Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 14 February
2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ फेब्रुवारी
२०१९ दुपारी १.०० वा.
****
2022 पर्यंत सर्वांना घरं देण्याच्या दृष्टीनं सरकार वेगानं वाटचाल करत
आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं
आहे. ते काल नवी दिल्ली इथं ‘क्रेडाई युथकॉन-19’
परिषदेत बोलत होते. ग्रामीण आणि शहरी भागात गरीबांसाठी सुमारे एक कोटी 50 लाख घरं बांधून
झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. रेरा, अर्थात
स्थावर मालमत्ता नियामक प्राधिकरणामुळं ग्राहक आणि स्थावर मालमत्तांचे अभिकर्ते यांच्यातला
विश्वास मजबूत झाल्याचं पंतप्रधानांनी यावेळी म्हटलं.
****
अनुसूचित जमातींसाठीच्या
उप योजना मार्च 2020 पर्यंत चालू ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थव्यवहार समितीनं
मंजुरी दिली आहे. काल मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर अर्थमंत्री पियुष गोयल यांनी बातमीदारांना
या संबंधी माहिती दिली. अनुसूचित जमातींच्या 10 कोटीहून अधिक लोकांना याचा लाभ मिळेल.
त्यासाठी 11 हजार 900 कोटी रुपये खर्च येणार असल्याचं गोयल यांनी सांगितलं. सफाई कर्मचारी
राष्ट्रीय आयोगाला 31 मार्चनंतर 3 वर्षांची मुदतवाढ, अनिवासी भारतियांसाठी विवाह नोंदणी
विधेयक, तसंच कर्जाशी निगडीत भांडवली अनुदान आणि तंत्रज्ञान दर्जा सुधार योजनेलाही
मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिल्याचं गोयाल म्हणाले.
****
नियमांचं उल्ल्ंघन
केल्याच्या कारणावरून भारतीय रिझर्व्ह बँकेनं, भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ बडोदा, कॉर्पोरेशन
बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया या चार मोठ्या बँकांना एकूण पाच कोटी रूपयांचा दंड ठोठावला
आहे.
या बँकांनी बँकेची
रक्कम, इतर बँकांशी माहितीची देवाणघेवाण तसंच खात्यांशी संबधित असलेल्या नियंमाचं उल्लंघन
केल्याच्या कारणावरून त्यांना हा दंड ठोठावण्यात आल्याचं युनीवार्तानं म्हटलं आहे.
****
आयुर्वेदिक, सिद्ध,
यूनानी आणि होमिओपॅथी औषधींच्या ऑनलाईन परवाना मिळण्यासाठीच्या ई-औषधी पोर्टल या प्रणालीचा
शुभारंभ आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी काल काल नवी दिल्ली इथं केला. यामुळं
या व्यवहारात पारदर्शक्ता आणि सुलभता येईल असा विश्वास नाईक यांनी यावेळी व्यक्त केला.
****
बिकानेर जमीन घोटाळा
प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं काल सलग दुसऱ्या दिवशी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका
गांधी यांचे पती व्यावसायिक रॉबर्ट वड्रा यांची चौकशी केली. या घोटाळयात वड्रा यांच्या नेमक्या भूमिकेबाबत दिवसभर
चौकशी सुरु होती.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांना आज उत्तराखंडमधील रुद्रपूरच्या नियोजित दौऱ्यावर जाताना खराब
हवामानामुळं डेहराडून विमानतळावर अडकून पडावं लागलं. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी
दिलेल्या माहितीनुसार ते सकाळी सव्वासात वाजता डेहराडून विमानतळावर पोहचले. तिथून
ते हेलीकॉप्टरनं रुद्रपूरला रवाना होणार होते पण पाऊस आणि खराब हवामानामुळं
त्यांना थाबावं लागलं.
****
एक मिनिटांत कर्ज या केंद्र सरकारच्या योजेनेअंतर्गत
आतापर्यंत ९२ हजार उद्योजकांना ३० हजार कोटी रूपये कर्ज मंजूर केल्याची माहिती वित्त
मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. यात प्रथमच
व्यवसाय करणारे २४ हजार उद्योजक आहेत.
****
पी. व्ही. सिंधूनं आसामच्या गोहत्तीमध्ये सुरू वऱिष्ठ
राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत आज उपउपांत्य फेरी गाठली. सायना नेहवाल आज आपला उपउपांत्यपूर्व
फेरीचा सामना खेळणार आहे. पुरुषा गटामध्ये समीर वर्मा स्पर्धेचं प्रमुख आकर्षण आहे.
दरम्यान, सौरभ वर्मा, लक्ष्यसेन आणि हर्षिल दानी अन्य १२ खेळाडुंसह पुरुष एकेरीच्या
चौथ्या फेरीत दाखल झाले आहेत.
****
सिन्नर-शिर्डी रस्त्यावर खोपडी शिवारात आज सकाळी
मोटारीनं धडक दिल्यानं दुचाकीहून घरी जाणारे दोन तरुण कामगार ठार झाले. मृत कामगार मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील कारखान्यातील काम संपवून
परतत होते.
****
अमरावती येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर
तिसऱ्या दिवशीही प्रकल्प ग्रस्तांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे. प्रकल्पासाठी जमिनीचे
अधिग्रहण करताना झालेला दुजाभाव आणि कमी मोबदला देण्यात आल्यामुळे वाढीव मोबदला मिळावा
ही आंदोलन कर्त्याची प्रमुख मागणी आहे. आमच्या वार्ताहरानं दिलेल्या माहितीनुसार प्रकल्पग्रस्तांचं
कुटुंबीय सहभागी झाल्यानं आंदोलनाची तीव्रता वाढली आहे.
*****
***
No comments:
Post a Comment