Saturday, 16 February 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 16.02.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 16 February 2019

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ फेब्रुवारी २०१९ दुपारी .०० वा.

****



 शहीद जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या पांढरकवडा इथं आज अनेक विकास कामांचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते. पुलवामा हल्ल्याला चोख प्रत्यूत्तर देण्यासाठी लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य दिल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. २०२२ पर्यंत सर्वांना स्वत:चं घर देण्याच्या योजनेचं काम प्रगतीपथावर असल्याचं त्यांनी सांगितलं. पंतप्रधानांनी यावेळी नांदेड जिल्ह्यात सहस्त्रकुंड इथं एकलव्य निवासी विद्यालय योजनेंतर्गत, आदिवासी मुला-मुलींसाठी बांधलेल्या शाळेचं दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उद्घाटन केलं. तसंच प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना नव्या घराचा ताबा, आणि अजनी - पुणे हमसफर एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवून त्यांनी रवाना केलं. राज्यपाल सी विद्यासागर राव, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, हंसराज अहिर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री मदन येरावार यावेळी उपस्थित होते. वर्धा - यवतमाळ - नांदेड रेल्वेमार्गाच्या भूसंपादनाचं काम ९५ टक्के पूर्ण झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, पंतप्रधान धुळे इथंही विविध विकास कामांचा शुभारंभ करणार आहेत.

****



 जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक सुरु आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ही बैठक बोलावली असून, जवळपास सर्व प्रमुख पक्षांना निमंत्रण देण्यात आलं आहे. हा दहशतवादी हल्ला आणि यानंतर सरकार करत असलेल्या उपाययोजनांबाबत या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांना माहिती देण्यात येत आहे. संरक्षण विषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीत सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला.

****



 पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ आज नांदेड जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. या बंद मध्ये शाळा, महाविद्यालयं, खाजगी शिकवणी वर्ग, सहभागी झाले आहेत. आज सकाळपासून शहरातली व्यापारी प्रतिष्ठानं बंद असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.



 बुलडाणा जिल्ह्यातल्या नांदुरा, मलकापुर, लोणार, खामगावसह सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.  मलकापुर शहरामध्ये शहीद जवान संजय राजपुत यांच्यावर, तर लोणार तालुक्यातल्या चोरपांग्रा इथं नितीन राठोड यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. तत्पूर्वी या दोन जवानांचे पार्थिव देह औरंगाबाद विमानतळावर दाखल झाले असून, त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

****



 अमेरिकेनं भारताला दहशतवादाचा सामना करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याच्या आश्वासनाबरोबरच, भारताला स्वसंरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार असल्याचं म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी दूरध्वनीवरून भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी संवाद साधून, पाकिस्तानमधले दहशतवादी तळ नष्ट करण्यासाठी पूर्ण समर्थन केलं आहे. त्याचबरोबर बोल्टन यांनी पुलवामामधल्या दहशतवादी हल्ल्याबाबत शोकही व्यक्त केला. तत्पूर्वी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पीओ यांनी, पाकिस्तानला सर्व दहशतवादी संघटनांना तात्काळ मदत थांबवण्याबरोबरच, दहशतवाद्यांना कोणताही आश्रय न देण्याचा इशारा दिला आहे.

****



 सक्तवसुली संचालनालयानं बिकानेर जमिन घोटाळ्याप्रकरणी रॉबर्ट वाड्रा यांच्या स्काय लाईट हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड आणि इतर कंपन्यांसह चार कोटी ६२ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. वाड्रा आणि त्यांची आई याच आठवड्यात जयपूरमध्ये संचलानालयात चौकशीसाठी उपस्थित राहीले होते. २०१५ मध्ये झालेल्या या जमीन खरेदी व्यवहाराबाबत संचलनालयानं गुन्हेगारी खटला दाखल केला होता.

****



 ई-व्हिसा नियमांमधल्या सुधारणाबरोबर व्हिसा प्रणाली पर्यटकांच्या सोयीची करण्यावर केंद्र सरकारनं भर दिला आहे. ई-टुरिस्ट आणि ई- बिझिनेस व्हिसामधली वास्तव्याची मुदत एक वर्ष करण्याबरोबरच अनेकवेळा प्रवेशाची मुभा देण्यात आल्याचं पर्यटन मंत्रालयानं म्हटलं आहे. परदेशी नागरिकांना केवळ तीनदाच व्हिसा देण्याची अट काढून टाकण्यात आली असून, भुवनेश्वर आणि पोर्ट ब्लेअर विमानतळासह ई- व्हिसाद्वारे भारतात प्रवेश करण्याच्या विमानतळांची संख्या आता २८ झाली आहे.

*****

***

No comments:

Post a Comment