Sunday, 17 February 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 17.02.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 17 February 2019

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १७ फेब्रुवारी  २०१ सकाळी ७.१० मि.

****



v भारत हा नवीन परंपरा आणि नव्या धोरणांचा स्वीकार करणारा देश - पंतप्रधान नरेंद्र मोदी

v नांदेड इथल्या एकलव्य निवासी विद्यालयासह राज्यात विविध प्रकल्पांचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

v बुलडाणा इथले जवान संजय राजपूत आणि नीतिन राठोड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

v मराठवाड्यात अनेक ठिकाणी बंद पाळून हुतात्म्यांना श्रद्धांजली

आणि

v वरिष्ठ गट राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवाल आणि सौरभ वर्मा अजिंक्य

****



 भारत हा नवीन परंपरा आणि नव्या धोरणांचा स्वीकार करणारा देश असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. धुळे इथं काल विविध विकासकामांचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते. पुलवामा हल्ल्यातल्या हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांसोबत संपूर्ण देश असून, या हल्ल्याला चोख प्रत्यूत्तर दिलं जाईल, असं ते म्हणाले. सरकारनं राबवलेल्या विविध योजनांची माहितीही पंतप्रधानांनी यावेळी दिली. यावेळी कृषी सिंचन योजनेंतर्गत ‘निम्न पांझरा’ प्रकल्पाचं लोकार्पण, धुळे - नरडाणा रेल्वेमार्ग, जळगाव - मनमाड रेल्वेमार्गाच्या तिहेरीकरणाचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते झालं. राज्यपाल सी विद्यासागर राव, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसंच सुभाष भामरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरी महाजन यावेळी उपस्थित होते. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते भुसावळ-वांद्रे खादेश एक्सप्रेस, उधना-नंदूरबार मेमू ट्रेन, उधना-पाळधी मेमू ट्रेन, या रेल्वेगाड्यांना दूरदृश्य प्रणालीद्वारे  हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आलं.



 त्यापूर्वी काल सकाळी, यवतमाळ जिल्ह्यातल्या पांढरकवडा इथंही विविध विकास कामांचा शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते झाला. २०२२ पर्यंत सर्वांना स्वत:चं घर देण्याची योजना प्रगतीपथावर असल्याचं त्यांनी सांगितलं.



 एकलव्य निवासी विद्यालय योजनेंतर्गत, नांदेड जिल्ह्यात सहस्त्रकुंड इथं, आदिवासी मुला-मुलींसाठी बांधलेल्या शाळेचं दूरदृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधानांनी उद्घाटन केलं. प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना नव्या घराचा ताबा पंतप्रधानांच्या हस्ते देण्यात आला. अजनी - पुणे हमसफर एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवून त्यांनी रवाना केलं. राज्यपालांसह मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, पालकमंत्री मदन येरावार यावेळी उपस्थित होते. वर्धा - यवतमाळ - नांदेड रेल्वेमार्गाच्या भूसंपादनाचं काम ९५ टक्के पूर्ण झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

****



 जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली इथं काल सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीत या हल्ल्याच्या निषेधाचा ठराव संमत झाला. दहशतवाद आणि दहशतवाद्यांना सीमेपलिकडून मिळणारं संरक्षण याबाबतही या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या बैठकीत, काश्मीरला दहशतवाद आणि हिंसेतून मुक्त करण्याच्या सरकारच्या कटीबद्धतेचा पुनरुच्चार केला. देशाची एकता आणि सुरक्षेसाठी आपण सरकार आणि सुरक्षा बलांसोबत असल्याचं काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी बैठकीनंतर वार्ताहारंशी बोलताना सांगितलं. दहशतवादाचा सामना करण्यासाठी काँग्रेस पक्ष सरकारसोबत असल्याचं त्यांनी नमूद केलं.

****



 दरम्यान, या हल्ल्यात हुतात्मा झालेले बुलडाणा जिल्ह्यातल्या मलकापूरचे जवान संजय राजपूत तसंच लोणार तालुक्यातल्या चोरपांगरा इथले नीतिन राठोड यांच्या पार्थिव देहावर काल लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या दोन्ही जवानांचे पार्थिव देह काल औरंगाबाद इथं सकाळी लष्कराच्या विमानानं पोहोचले. त्यानंतर राठोड यांचा पार्थिव देह रस्तामार्गे लोणारकडे तर राजपूत यांचा पार्थिव देह हेलिकॉप्टरनी, मलकापूर इथं नेण्यात आला.



 औरंगाबाद विमानतळावर, पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्यासह नागरिकांनी वीरजवानांना श्रद्धांजली अर्पण केली.



 जालना इथं, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, यांच्यासह अनेकांनी वीरजवानाच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन, त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती.



 दरम्यान, या हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांसाठी शिर्डीच्या श्री साईबाबा संस्‍थानच्या वतीने दोन कोटी एक्कावन्न लाख रुपये तर कोल्हापूर इथल्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने अकरा लाख रुपये अर्थसाह्य जाहीर केलं आहे.

****



 या हल्ल्याच्या निषेधार्थ काल बुलडाणा जिल्ह्यासह राज्यभरात ठिकठिकाणी बंद पाळण्यात आला.



 हिंगोली जिल्ह्यात बहुतांश मुख्य बाजारपेठा बंद होत्या. पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं ठिकठिकाणी दहन करत, हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.



 नांदेड जिल्ह्यातही उत्स्फुर्त बंद पाळण्यात आला. या बंद मध्ये शाळा, महाविद्यालयं, खाजगी शिकवणी वर्ग, सहभागी झाले. शहरातली बहुतेक व्यापारी प्रतिष्ठानं बंद राहिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.



 लातूर जिल्ह्यातही ठिकठिकाणी निषेध करण्यात आला. रेणापूर आणि नळेगाव इथं बंद पाळून, दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचं दहन करण्यात आलं.



 परभणी शहरासह जिल्ह्यात काल उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं, हुतात्म्यांच्या कुटूंबियांसाठी मानवत इथं मदत फेरी काढण्यात आली. नागरिकांनी या मदत फेरीला चांगला प्रतिसाद दिला.



 पालघर जिल्ह्यातल्या बोईसर, नालासोपारा, वसई मध्ये, तसंच नंदुरबार, रत्नागिरी, आदी जिल्ह्यातही  बंद पाळण्यात आला. काही ठिकाणी रेल रोको आंदोलनही करण्यात आलं. औरंगाबाद इथं आज सायंकाळी सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्यांना त्यांच्या पोलिस यंत्रणेला माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यातला कलम ६६ अ, रद्द केलेला असल्याबद्दल जागरुक करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे लोकांना विनाकारण अटक होणार नसल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. ऑनलाईन आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यास तुरुंगवासाची तरतूद असलेलं, माहिती तंत्रज्ञान कायाद्यातलं कलम ६६ अ, सर्वोच्च न्यायालयानं मार्च २०१५ मध्ये रद्द केलेलं आहे.

****



 गुवाहाटी इथं काल सायना नेहवालनं वरिष्ठ गट राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. सायनानं, पी व्ही सिंधूचा २१-१८, २१-१५ असा पराभव करत चौथ्यांदा हे विजेतेपद पटकावलं आहे. पुरुषांच्या गटात, सौरभ वर्मानं लक्ष्य सेनचा पराभव करून विजेतेपदाची हॅटट्रीक साधत पुरूष एकेरीतील किताब पटकावला. पुरूष दुहेरीत प्रणव जेरी चोप्रा आणि चिराग शेट्टी या जोडीनं अव्वल मानांकीत अर्जुन एम आर आणि श्लोक रामचंद्रन या जोडीचा सरळ लढतीत पराभव केला.

****



 जालना जिल्ह्यातल्या बठाण बुद्रुक इथं आज गुणीजन साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. समाजशास्त्रज्ञ, इतिहासकार, ज्येष्ठ साहित्यिक गेल ऑम्वेट संमेलनाच्या अध्यक्षस्थानी आहेत, पाटोदा या आदर्श गावाचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सरपंच, भास्करराव पेरे यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होईल.

****



 औरंगाबाद इथल्या पन्नालाल नगर विकास संस्थेच्या वतीनं आयोजित अष्टविनायक संगीत महोत्सवाला कालपासून प्रारंभ झाला.

*****

***

No comments:

Post a Comment