Sunday, 17 February 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 17.02.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 17 February 2019

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १७ फेब्रुवारी २०१९ दुपारी .०० वा.

****



 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहारच्या दौऱ्यावर असून, त्यांचं पाटणा विमानतळावर स्वागत करण्यात आलं. बेगुसराजिल्ह्यात बरौनी इथं ३३ हजार कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होआहे. तसंच १३ हजार ३६६ कोटी रुपयांच्या पाटणा मेट्रो प्रकल्पाची पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत.

****



 पाकिस्तानचा सर्वाधिक पसंतीच्या देशाचा दर्जा काढून घेतल्यानंतर आता पाकिस्तानातून आयात होणाऱ्या सर्व वस्तूंवर २०० टक्के सीमाशुल्क आकारण्याचा निर्णय भारतानं घेतला आहे. पुलवामा इथल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी ट्विटरद्वारे सांगितलं. पाकिस्तानातून भारतात ताजी फळं, सिमेंट, पेट्रोलियम उत्पादन, कमावलेली कातडी, तसंच मोठ्या प्रमाणावर खनिजाची आयात होते. २०१७-१८ साली पाकिस्तानमधून भारतात तीन हजार ४८२ कोटी रुपयांची आयात केली होती.

****



 पुलवामा इल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या राज्यातल्या दोन जवानांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारच्या वतीनं ५० लाख रुपयांची मदत काल सुपूर्द करण्यात आली. बुलडाणा जिल्ह्यातल्या मलकापूरचे शहीद जवान संजय राजपूत आणि लोणार तालुक्यातले शहीद जवान नितीन राठोड यांच्या कुटुंबीयांना माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी काल हा धनादेश सुपूर्द केला.

****



 देशातील संगीत निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी जम्मू-काश्मीरमधल्या पुलवामा इथल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी गायकांसोबत काम करणं थांबवावं अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेनं केली आहे. नुकत्याच भूषण कुमारच्या टी-सिरीज कंपनीनं गायक राहत फतेह अली खान आणि आतिफ असलम यांच्या सोबत दोन अल्बम बनवले होते. याआधी २०१६ मध्ये उरी हल्ल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाकिस्तानी गायकांना ४८ तासांत देश सोडून जाण्याचा इशारा दिला होता.

****



 पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी औरंगाबाद शहरातील इतिहासप्रेमी आज मेणबत्ती मोर्चा काढणार आहेत. सायंकाळी सात वाजता पैठणगेट येथून मोर्चाला प्रारंभ होईल. काळा चबुतऱ्यावर हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करून याचा समारोप होईल.

****



 पोषक वातावरण आणि कीड रोगांचा फारसा प्रादुर्भाव नसल्यानं यंदा आंबा उत्पादनात १० ते २० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता कृषी विभागानं व्यक्त केली आहे. रायगड जिल्हयात ४२ हजार हेक्टर क्षेत्रावर आंब्याची लागवड केली गेली असून, त्यातील १४ हजार ५०० हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. रायगड जिल्ह्यातल्या आंब्याचं वार्षिक सरासरी उत्पादन २१ हजार ४२४ मेट्रिक टन एवढं असून, यामध्ये वाढ अपेक्षित असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 औरंगाबाद इथल्या पन्नालाल नगर विकास संस्थेच्या वतीनं आयोजित अष्टविनायक संगीत महोत्सवाचा आज समारोप होत आहे. कलश मंगल कार्यालयात आयोजित या महोत्सवात आज विशाल धुमाळ यांचं बासरीवादन, तसंच मुंबईच्या शर्वरी नागवेकर वैद्य यांचं शास्त्रीय गायन होणार आहे.

****



 रणजी ट्रॉफी विजेत्या विदर्भ क्रिकेट संघानं शेष भारत संघाचा पराभव करत इराणी चषकावरही आपलं नाव कोरलं आहे. काल सामन्याच्या शेवटच्या दिवशी विदर्भानं पहिल्या डावातल्या धावांच्या आघाडीवर शेष भारत संघावर मात केली. हा सामना अनिर्णित राहिला असला, तरी पहिल्या डावाच्या ९५ धावांच्या आघाडीवर विदर्भाला विजयी ठरवण्यात आलं.



 सामन्यानंतर विदर्भ संघाचा कर्णधार फैज फैजल यानं या सामन्यातल्या पारितोषिकाची रक्कम पुलवामा हल्ल्यातल्या शहिदांच्या कुटुंबीयांना देणार असल्याची घोषणा केली.

****



 बल्गेरियात सोफिया इथं सुरू असलेल्या सत्तराव्या स्ट्रॅन्डजा मेमोरियल मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत, भारताच्या गौरव सोळंकी आणि नमन तन्वर यांनी आपापल्या वजनी गटात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. गौरवनं ५२ किलो वजनी गटाच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत कझाकिस्तानच्या अन्वर मुझापारोव्ह याला तीन - दोन असं हरवलं, तर नमननं ९१ किलो वजनी गटाच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत पोलंडच्या मायकेल सोझिन्स्की याला पाच - शून्य असं हरवलं.

****



विश्व मल्लखांब फेडरेशनच्या विद्यमाने आणि भारतीय मल्लखांब महासंघ, तसंच महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटना यांच्यावतीनं पहिल्या विश्व अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धेचं मुंबईत आयोजन करण्यात आलं आहे. क्रिडा मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते काल या स्पर्धेचा प्रारंभ झाला.

*****

***

No comments:

Post a Comment