Monday, 18 February 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 18.02.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 18 February 2019

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १८  फेब्रुवारी  २०१ सकाळी ७.१० मि.

****



v राज्यात शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांमध्ये 'प्रेरणा प्रकल्पा'च्या माध्यमातून ९० हजारांहून जास्त शेतकऱ्यांचं समुपदेशन

v हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबीयांना मदत करण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या संस्थांपासून सावध राहण्याचं केंद्रीय गृहमंत्रालयाचं आवाहन

v कांदा अनुदानासाठी अर्ज करण्याला २२ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ

 आणि

v शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्का राज्यपालांच्या हस्ते प्रदान; मराठवाड्यातल्या चौघांचा गौरव

****



 राज्यात शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांमध्ये 'प्रेरणा प्रकल्पा'च्या माध्यमातून गेल्या तीन वर्षात सुमारे ९० हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांचं समुपदेशन करून त्यांना नैराश्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली. यापैकी आठ हजार जणांवर, व्यक्तिगतरित्या मानसिक उपचार करण्यात आले तर सहा हजार जणांवर सामुहिक उपचार करण्यात आले. मराठवाड्यातल्या सर्व आठ आणि विदर्भातल्या अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ आणि वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये २०१५ पासून प्रेरणा प्रकल्प राबवण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत मानसिक तणाव आणि नैराश्यासोबत  इतरही आरोग्य तपासणी केली जाते. त्यात गेल्या डिसेंबर अखेर २६ लाख ७५ हजार २२४ बाह्यरुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

****



हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबीयांना मदत करण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या संस्थांपासून सावध राहण्याचं आवाहन केंद्रीय गृहमंत्रालयानं केलं आहे. खोट्या संस्था स्थापन करुन नागरिकांना लुबाडण्याचा प्रयत्न अनेक जण करत असल्याचं, गृह मंत्रालयाच्या निदर्शनास आलं आहे, हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी 'भारत के वीर' हे संकेतस्थळ अधिकृत असून, त्याद्वारे नागरिकांनी मदत करावी, किंवा इतर संकेतस्थळांची खात्री करुन, मगच मदत पाठवावी, असं गृह मंत्रालयानं सांगितलं आहे.

****



 पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ, भारतीय जनता पक्षातर्फे देशभरात जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी प्रार्थना सभा घेण्यात आल्या. औरंगाबाद आणि नांदेड इथं काल सायंकाळी मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला.



 हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांसाठी कोल्हापूर जिल्हा पोलिस दलान आपला एक दिवसाचा पगार देऊ केला आहे. कोल्हापूरचे जिल्हा पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी ही माहिती दिली. या माध्यमातून आतापर्यंत ३० लाख रुपये जमा झाले आहेत.

****



 पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशाच्या डोळ्यात अश्रू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र जाहीर सभा घेण्यात दंग आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. ते काल नाशिक जिल्ह्यात, मालेगाव इथं, एका कार्यक्रमात बोलत होते, अन्य एका जाहीर सभेत बोलताना भुजबळ यांनी, आपण 'जय जवान जय किसान' असा नारा देतो, मात्र आज देशात किसान सुखी नाही तसेच जवानांच्या डोळ्यात पाणी असल्याची टीका केली.

****



कांदा अनुदानासाठी अर्ज करण्याची मुदत २२ फेब्रुवारी पर्यंत वाढवण्यात आली आहे. राज्यात कांद्याचे भाव गडगडल्यानं, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी, यासाठी राज्य शासनानं प्रत्येक शेतकऱ्याला २०० क्विंटलच्या मर्यादेत प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान जाहीर केलं होतं. या योजनेत सोलापूर बाजार समिती अव्वल ठरली आहे. मराठवाड्यासह अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यांतून सोलापूर बाजार समितीत कांद्याची आवक झाली होती. नऊ जिल्ह्यांतल्या ५४ तालुक्यांतल्या जवळपास १६ हजार शेतकऱ्यांना आतापर्यंत आठ कोटी रुपये कांदा अनुदान वितरित करण्यात आलं आहे.



 ज्या शेतकऱ्यांनी कांदा अनुदानासाठी अद्याप अर्ज केलेला नाही, त्यांनी त्वरित अर्ज करण्याचं आवाहन बाजार समितीनं केलं आहे.

****



 पाकिस्तानच्या न्यायालयानं मृत्यूदंड सुनावलेल्या भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्याशी संबंधित खटल्याची, आजपासून आतंरराष्ट्रीय न्यायालयात जाहीर सुनावणी होणार आहे. नेदरलँडमध्ये हेग इथं ही सुनावणी होणार असून ती चार दिवस चालेल. निवृत्त नौदल अधिकारी जाधव यांना हेरगिरीसह दहशतवादाच्या आरोपाखाली एप्रिल २०१७मध्ये पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं मृत्यदंड ठोठावला होता. त्याविरोधात भारतानं आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली आहे.

****



 पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी २४ तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहे. या कार्यक्रम मालिकेचा हा ५३ वा भाग असेल.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 औरंगाबाद इथल्या नियोजित क्रीडा विद्यापीठाद्वारे क्रीडा विकास गतिमान होईल, असा विश्वास, राज्य सी विद्यासागर राव यांनी व्यक्त केला आहे. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्का काल मुंबईत राज्यपालांच्या हस्ते प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.



 मल्लखांब क्रडा प्रकारासाठी योगदान देणाऱ्या उदय देशपांडेंना जीवगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं. १५ जणांना मिळालेल्या उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारांमध्ये औरंगाबादचे अमेय जोशी आणि सागर कुलकर्णी यांना जिमनॅस्टीकसाठी तर, ३१ जणांना मिळालेल्या उत्कृष्ट खेळाडू पुरस्कारांमध्ये औरंगाबादच्या नेमबाज हर्षदा निठवे यांचा समावेश होता.



 क्रीडा संघटक-कार्यकर्त्यांनाही यावेळी गौरवण्यात आलं, यामध्ये लातूर विभागातून जर्नादन गुपिले यांचा गौरव करण्यात आला. प्रत्येकी दोन महिला आणि दोन पुरुष दिव्यांग खेळाडूंना एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात आला.

****



 कनिष्ठ वयोगट राष्ट्रीय हॉकी स्पर्धेला कालपासून औरंगाबाद इथं सुरुवात झाली. हॉकी संघाचा माजी कर्णधार धनराज पिल्ले यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं. भारतीय क्रीडा प्राधिकरण -साईच्या मैदानावर ही स्पर्धा सुरु आहे

****



 लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या दर्पण पुरस्कारांचं काल लातूर इथं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत वितरण करण्यात आलं. यावेळी पत्रकार मुर्गाप्पा खुमसे, रामराव गोरे आणि झटिंग म्हेत्रे यांना जीवन गौरव पुरस्कार तर, अनेकांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.

****



 नांदेड इथं काल १८वं आंबेडकरवादी साहित्य संमेलन घेण्यात आलं. कवि राहूल वानखेडे संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी कवयित्री प्रा. संध्या रंगारी यांना ‘सत्यशोधक साहित्य पुरस्कार’ प्रदान  करण्यात आला.

****



 साहित्यिकांनी जागतिक बदलांची नोंद घेवून नवं साहित्य निर्माण केलं पाहिजे, अशी भूमिका  साहित्यिक गेल ऑम्वेट यांनी मांडली आहे. काल जालना जिल्ह्यातल्या बठाण बुद्रुक इथं आयोजित तिसऱ्या भूमिजन साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात त्या बोलत होत्या. औरंगाबाद इथल्या भाषा, साहित्य, संस्कृती आणि संशोधन परिषदेच्या वतीनं हे संमेलन घेण्यात आलं. 

****



 औरंगाबाद इथं, आयोजित अष्टविनायक संगीत महोत्सवाचा काल समारोप झाला. पन्नालाल नगर विकास संस्थेच्या वतीनं घेण्यात आलेल्या या दोन दिवसीय महोत्सवात काल विशाल धुमाळ यांचं बासरीवादन, तसंच मुंबईच्या शर्वरी वैद्य यांचं शास्त्रीय गायन झालं.

****



भविष्य काळात शाश्वत स्वच्छता टिकवून ठेवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्या पाणी स्वच्छता मिशन कक्षाचे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक मिलिंद व्यवहारे यांनी केलं आहे. काल नांदेड इथं, फिल्ड आऊटरीच ब्यूरोच्या वतीनं आयोजित जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यात शाश्वत स्वच्छतासाठी, घर आणि परिसराची स्वच्छता, सांडपाणी तसंच घनकचरा व्यवस्थापन या बाबींवर लक्ष केंद्रीत केलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****



 पुण्याहून अकोटकडे जाणाऱ्या खाजगी आराम बसला काल जालना शहरात आग लागून बस पूर्णत: जळाली. जालना शासकीय तंत्रनिकेतन समोर काल सकाळी ही घटना घडली. बसमधल्या सर्व प्रवाशांना तातडीनं खाली उतरवल्यामुळे, सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 दिव्यांग व्यक्तींच्या विकासासाठी शासन कटिबध्द असल्याचं पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री तथा जालन्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी म्हटलं आहे. जालना जिल्ह्यात परतूर इथं दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी घेण्यात आलेल्या महाशिबिरात, ते बोलत होते.

****



 आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सत्ता मिळाली तर मुंबई महानगरातल्या बेरोजगार तरुणांना रोजगार किंवा बेरोजगार भत्ता देऊ, असं आश्वासन मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी एका निवेदनाद्वारे दिल आहे. यासाठी काँग्रेस, आजपासून मुंबईत, 'चलो वॉर्ड अभियान' राबवणार आहे.

****



 लातूर शहर महानगरपालिकेच्या दुकानभाडे वाढ आणि मालमत्ता करासंदर्भात आमदार अमित देशमुख आज गांधी मार्केट इथं गाळेधारकांशी संवाद साधणार आहेत, लातूर महानगरपालिकेनं दुकानांची जवळपास १० ते २० पटीनं भाडेवाढ करण्याचा तर मालमत्ता करातही मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार देशमुख हे सवांद साधणार आहेत.

*****

***

No comments:

Post a Comment