Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27
February 2019
Time 6.00 to 6.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ फेब्रुवारी
२०१९ सायंकाळी
६.०० वा.
****
नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते
****
पाकिस्ताननं आज सकाळी केलेला हवाई हल्ला, भारतीय
वायूसेनेनं मोडून काढला आहे. विदेश मंत्रालय प्रवक्ते रवीशकुमार आणि एअर व्हाईस मार्शल
आर जी कपूर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या कारवाईत वायूसेनेच्या मिग विमानानं
पाकिस्तानचं एक लढाऊ विमान पाडलं, मात्र या कारवाईत एक भारतीय विमान वैमानिकासह बेपत्ता
झाल्याची माहिती रवीशकुमार यांनी दिली. हा वैमानिक पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचा
दावा, पाकिस्तानकडून करण्यात आला असल्याचं, रवीशकुमार यांनी सांगितलं.
दरम्यान, जम्मू काश्मीर,पंजाब आणि हिमाचल प्रदेशातली नागरी
उड्डाणांसाठी आज बंद केलेली विमानतळं काही तासांनंतर पुन्हा खुली करण्यात आली आहेत
****
राज्याचा आगामी आर्थिक वर्षाचा, १९ हजार ७०० कोटी
रुपये तुटीचा अंतरिम अर्थसंकल्प आज विधीमंडळात सादर झाला. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार
यांनी विधान सभेत तर वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत अर्थसंकल्प
सादर केला. राज्याची आर्थिक स्थिती भक्कम असल्याची माहिती देताना, मुनगंटीवार यांनी,
गेल्या १५वर्षांच्या तुलनेत राज्यावर कर्जाचा बोजा स्थुल उत्पन्नाच्या १४ पूर्णांक
८२ शतांश टक्के एवढा असल्याचं सांगितलं.
या अर्थ संकल्पात अर्थमंत्र्यांनी, महिला उद्योजकांसाठी
नवतेजस्विनी योजना, अंगणवाडी सेविकांना भ्रमणध्वनी, इतर मागासवर्गीय कल्याण विभाग,
थकीत करांच्या वसूलीसाठी अभय योजना, पाच हजार अंगणवाडी केंद्रांचं आदर्श अंगणवाडी केंद्रात
रुपांतर, इत्यादी योजनांची घोषणा केली.
सामाजिक विकास विभागासाठी तीन हजार १८० कोटी, इतर
मागासवर्गीय कल्याणासाठी दोन हजार ८९२ कोटी, महिला बालविकास दोन हजार ९२१ कोटी, अल्पसंख्याक
विकास ४६२ कोटी, गर्भवती आणि स्तन्यदा मातांच्या पोषण आहार योजनेसाठी एक हजार ९७ कोटी,
न्यायालय इमारती बांधकाम ७२५ कोटी, पोलिस निवासस्थान बांधकाम ३७५ कोटी, ग्रामपंचायत
इमारती बांधकामासाठी ७५कोटी, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा विभागासाठी एक हजार ८७ कोटी,
शेती तसंच उद्योगांना सवलतीच्या दरात वीज पुरवठा करण्यासाठी पाच हजार २१० कोटी रुपये
निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.
महामार्ग उभारणीसाठी दोन हजार १६४ कोटी, उडान योजनेंतर्गत
विमानतळ विकासासाठी ६२ कोटी, बसस्थानक विकासासाठी एकशे एक कोटी, तर नवीन बस खरेदीसाठी
२१० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
औरंगाबादसह आठ शहरांमध्ये राबवल्या जात असलेल्या
स्मार्ट सिटी योजनेसाठी चोवीसशे कोटी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या
निधीत चारशे कोटी रुपये वाढ, राज्यातल्या ३८५ शहरांत राबवल्या जात असलेल्या प्रधानमंत्री
आवास योजनेसाठी सहा हजार ८९५ कोटी, मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांसह एकूण १४ जिल्ह्यांतल्या
शेतकऱ्यांना अल्पदरांत धान्य पुरवठ्यासाठी ८९६ कोटी तरतूद प्रस्तावित आहे.
या आर्थिक वर्षात महसूली जमा तीन लाख १४ हजार कोटी
तर महसूली खर्च तीन लाख ३४ हजार कोटी रुपये राहील, असा अंदाज या अंतरिम अर्थसंकल्पात
मांडण्यात आला आहे.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसईच्या परीक्षा
पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच होणार असून, परीक्षार्थी तसंच पालकांनी अफवांवर विश्वास
ठेऊ नये, असं आवाहन मंडळानं केलं आहे. सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारीपासून
सुरू झाल्या असून, तीन एप्रिलपर्यंत चालणार आहेत, तर दहावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून
सुरू झाल्या असून, त्या २९ मार्चपर्यंत चालणार आहेत.
****
मराठी राजभाषा दिन आज सर्वत्र साजरा होत आहे. कुसुमाग्रज
प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणारा, जनस्थान पुरस्कार, ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी
डहाके यांना आज नाशिक इथे प्रदान करण्यात येत आहे.नांदेड जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात
या दिनानिमित्त ग्रंथप्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. राज्य परिवहन महामंडळातर्फे राज्यातल्या
सगळ्या बसस्थानकांवर ”मराठी भाषा गौरव दिन”साजरा करण्यात आला.
****
नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या मनू भाकेर
आणि सौरभ चौधरी जोडीनं १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. मिश्र गटात
झालेल्या या स्पर्धेत भाकेर आणि चौधरी जोडीने,
चीन आणि जपानच्या नेमबाजांचं आव्हान मोडीत काढत, सुवर्णपदक मिळवलं आहे.
****
भारत ऑस्ट्रेलिया टी ट्वेंटी मालिकेतला दुसरा आणि
अंतिम सामना आज बंगळुरू इथं होत आहे, संध्याकाळी सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी भारताला आजचा सामना जिंकणं आवश्यक आहे.
****
याबरोबरच हे बातमीपत्र संपलं, आमचं यानंतरचं बातमीपत्र
उद्या सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी
No comments:
Post a Comment