Friday, 8 February 2019

Text- AIR NEWS BULLETIN 08.02.2019 7.10


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 08 February 2019

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०८ फेब्रुवारी  २०१ सकाळी ७.१० मि.

****

§  राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरचा धन्यवाद प्रस्ताव लोकसभेत संमत

§   रिजर्व्ह बँकेचं पतधोरण जाहीर; रेपो दरात कपात तर विनातारण कृषी कर्ज मर्यादेत वाढ

§   सामाजिक बहिष्कार प्रकरणात त्वरीत दखल घेऊन कठोर कारवाईचे गृहराज्यमंत्र्यांचे निर्देश

§   काँग्रेस पक्षाच्या ५० जनसभांच्या मोहिमेला औरंगाबाद इथून प्रारंभ

आणि

§   रणजी करंडक स्पर्धेत विदर्भ क्रिकेट संघ सलग दुसऱ्यांदा अजिंक्य

****

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्ताव काल लोकसभेत संमत झाला. या प्रस्तावावरील चर्चेदरम्यान विरोधकांनी सुचवलेल्या सर्व सुधारणा फेटाळण्यात आल्या. भारतानं गेल्या साडेचार वर्षात कृषी, दुग्धोत्पादन, लोह आणि हवाई क्षेत्रांसह सर्वच क्षेत्रात प्रगती केल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर देतांना सांगितलं. आपलं सरकार प्रामाणिक आणि पारदर्शकतेबरोबरच गरीबांप्रती संवेदनशील म्हणून ओळखलं जात असल्याचं पंतप्रधान म्हणाले. गॅस जोडणी, सर्वांसाठी घरं, बँकेत गरीबांची खाती उघडणं तसंच सर्व गावांत वीज नेण्याचा विशेष उल्लेखही त्यांनी आपल्या उत्तरात केला.

वैधानिक संस्था नष्ट करण्याच्या काँग्रेसच्या आरोपाचं पंतप्रधानांनी जोरदार खंडन करत, काँग्रेसनं आणीबाणी लादली, लोकशाही पद्धतीनं निवडलेली राज्य सरकारं अनेकवेळा बरखास्त केल्याचा आरोप त्यांनी केला. राफेल करारावर संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी सर्व प्रश्नांची उत्तरं दिली असूनही काँग्रेस देशाची दिशाभूल करत आहे असंही ते म्हणाले.

****

देशातल्या सर्व खेड्यांचं येत्या मार्चअखेरपर्यंत विद्युतीकरण पूर्ण होईल, अशी माहिती ऊर्जा राज्यमंत्री आर के सिंह यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली, काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ते बोलत होते. राजस्थान आणि छत्तीसगडमधली काही खेडी अद्याप विद्युतीकरणापासून वंचित आहेत, येत्या मार्चअखेर तिथंही वीज पोहोचल, अशी माहिती आर के सिंह यांनी दिली.

भारतमाला योजनेअंतर्गत नव्यानं उभारल्या जात असलेल्या दिल्ली मुंबई राष्ट्रीय महामार्गाचं पंतप्रधानांच्या हस्ते लवकरच भूमिपूजन केलं जाणार असून, अडीच वर्षांत हा रस्ता तयार होणं अपेक्षित आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नीतिन गडकरी यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. या नव्या महामार्गामुळे दिल्ली मुंबई अंतर बारा तासात कापता येईल, एकशे वीस मीटर रुंदीच्या या रस्त्यामुळे राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रातल्या मागास भागाचा विकास होणार असल्याचा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.

****

विद्यापीठांमध्ये प्राध्यापक आरक्षणाच्या मुद्यावरून समाजवादी पक्ष तसंच बहुजन समाज पक्षाच्या सदस्यांनी काल राज्यसभेत केलेल्या घोषणाबाजीमुळे सभागृहाचं कामकाज वारंवार स्थगित झालं, गदारोळ न थांबल्यानं, सभापतींनी दुपारी दोन वाजेनंतर कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं.

****

भारतीय रिजर्व्ह बँकेनं, शेतकऱ्यांसाठीच्या विनातारण कर्जाची मर्यादा साठ हजार रुपयांनी वाढवली आहे, त्यामुळे, आता शेतकऱ्यांना एक लाख साठ हजार रुपयांपर्यंत विनातारण कर्ज मिळू शकेल. बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरण समितीच्या बैठकीनंतर ही घोषणा केली. बँकेनं, रेपो दरात पाव टक्क्यांनी कपात केली आहे. त्यामुळे रेपो दर सहा पूर्णांक पंचवीस शतांश टक्के तर रिव्हर्स रेपो दर सहा टक्के झाला आहे. या दरकपातीमुळे गृहकर्ज आणि वाहन कर्जांचे दर कमी होणार आहेत.

****

केंद्रीय सशस्त्र पोलिस दल तसंच निमलष्करी दलातल्या शहात्तर हजार पाचशे पेक्षा अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया येत्या अकरा फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. संगणकीय परीक्षेच्या आधारे होणाऱ्या या पदभरतीत सुमारे पंचावन्न हजार कॉन्स्टेबल, तर, लिपिक, वैद्यकीय अधिकारी, तसंच अभियंत्यांच्या वीस हजारांपेक्षा अधिक जागांसाठी उमेदवार निवडले जातील.

****

ग्रामीण तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्याअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातल्या श्री संत नामदेव संस्थानसाठी पहिल्या टप्प्यात पंधरा कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. मुंबईत काल ग्रमीण तर्थक्षेत्र विकास आराखड्यासंदर्भात झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली. यामध्ये भक्त निवास, भक्तांसाठीच्या सुविधा, घनकचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा आदींचा समावेश आहे. अमरावती जिल्ह्यातल्या श्री संत गाडगेबाबा यांची कर्मभूमी असलेल्या आमला तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी सहा कोटी एकोणऐंशी लाख, नागरवाडीच्या विकासासाठी अठरा कोटी रुपये, तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या गणपतीपुळे देवस्थानाच्या विकासासाठी दहा कोटी रुपयांच्या आराखड्याला यावेळी मंजुरी देण्यात आली.    

****

प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेचा राज्यातल्या ऐंशी टक्के शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे, अशी माहिती कृषी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षभरात सात हजार दोनशे कोटी रुपये जमा होणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.

दरम्यान, केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची प्रभावी आणि जलद अंमलबजावणी करण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांची निवड करुन त्यांची संपूर्ण माहिती राज्य सरकारांनी संकलित करावी, असं सिंह यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

****

सामाजिक बहिष्कार, लैंगिक शोषण, अत्याचार, कौमार्य चाचणी प्रकरणांची त्वरीत दखल घेऊन कठोर कारवाई करावी असे निर्देश गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी पोलिसांना दिले आहेत. काल मुंबईत यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. नीतिमत्ता, सामाजिक स्वीकृती, राजकीय कल, लैंगिकता यांच्या आधारे किंवा इतर कोणत्याही कारणाच्या आधारे समाजातल्या सदस्यांमध्ये भेदभाव करणाऱ्या व्यक्ति अथवा समूहाविरुद्ध सामाजिक बहिष्कार कायद्याअंतर्गतच्या तरतुदीनुसार तक्रार दाखल करण्याचे निर्देश सर्व पोलीस ठाण्यांना द्यावेत असं पाटील यांनी यावेळी सूचित केलं.

****



हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

काँग्रेस पक्षाच्या पन्नास जनसभांच्या मोहिमेला काल औरंगाबाद जिल्ह्यातल्या दौलताबाद इथून प्रारंभ झाला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी या सभेत बोलताना, राज्यात दुष्काळ पडला आहे, प्यायला पाणी नाही, जनावरांना चारा नाही आणि मुख्यमंत्री मात्र क्रिकेट खेळण्यात मग्न आहेत आणि जोरदार भाषण देत असल्याची टीका केली. 

पेट्रोल - डिझेलच्या भाववाढीला आंतरराष्ट्रीय बाजारातल्या दरवाढीची खोटी कारणे सांगितली जातात, प्रत्यक्षात मात्र कर वसुलीच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा खिसा कापण्याचं काम सुरू असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. अच्छे दिनांचं आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या या सरकारनं जनतेवर अत्यंत दयनीय दिन आणले असल्याचं, चव्हाण म्हणाले.

औरंगाबाद शहरात सिडको भागातल्या राजीव गांधी क्रीडा संकुलावरही काँग्रेसची सभा झाली, खासदार अशोक चव्हाण यांच्यासह, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार, आमदार सुभाष झांबड, शहराध्यक्ष नामदेव पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी सभेला संबोधित केलं.

****

राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीनं काल औरंगाबाद-जालना रस्त्यावर शेंद्रा गावाजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. उत्तर प्रदेशात राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या छायाचित्रावर गोळ्या झाडल्याप्रकरणाचा निषेध करत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू महासभा या संघटनांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचं यावेळी दहन करण्यात आलं.

 ****

धनगर समाजाला अनुसूचित जमाती मध्ये आरक्षण मिळावं, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसंदर्भात औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल सकल धनगर समाजाच्या वतीनं मुंडण आंदोलन करण्यात आलं. सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं नाव देण्यात यावं, शेळी मेंढी विकास महामंडळासाठी दोनशे कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करावी, यासह अन्य मागण्याचं निवेदन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना देण्यात आलं.

****

क्रिकेट -

यंदाची रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा विदर्भाच्या संघानं जिंकली आहे. नागपूरच्या जामठा मैदानावर काल झालेल्या अंतिम सामन्यात विदर्भानं सौराष्ट्र संघाचा अट्ठ्याहत्तर धावांनी पराभव केला. पहिल्या डावातल्या पाच धावांच्या आघाडीसह दुसऱ्या डावात विदर्भानं दोनशे धावा करत सौराष्ट्र समोर विजयासाठी दोनशे सहा धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान पेलू न शकलेला सौराष्ट्रचा दुसरा डाव एकशे सत्तावीस धावांमध्ये संपुष्टात आला. विदर्भ संघानं रणजी करंडक सलग दुसऱ्यांदा पटकावला आहे.

****

भारत आणि न्यूझीलंड दरम्यान तीन टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील महिला तसंच पुरुष संघांचा दुसरा सामना आज ऑकलंड इथं होणार आहे. महिला संघाचा सामना सकाळी साडेआठ वाजता तर पुरुषांचा सामना सकाळी साडेअकरा वाजता सुरु होईल. मालिकेतला पहिला सामना जिंकून न्यूझीलंडचे दोन्ही संघ एक - शून्यनं आघाडीवर आहेत.

****

भारोत्तोलक मीराबाई चानू हिनं थायलंडमध्ये झालेल्या इजीटी चषक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं. अट्ठेचाळीस किलो वजन गटात चानूनं एकशे ब्याण्णव किलो वजन उचललं. या स्पर्धेतले गुण दोन हजार वीस मध्ये होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी महत्त्वाचे आहेत.

//************//

No comments:

Post a Comment