Sunday, 10 February 2019

Text - AIR News Bulletin, Aurangabad 10.02.2019....Afternoon Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 10 February 2019

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १फेब्रुवारी २०१९ दुपारी .०० वा.

****

महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत तापमानात उल्लेखनीय घट झाली आहे. नाशिक मध्ये थंडीचा कडाका कायम असून, आज पाच अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं, तर निफाड मध्ये तीन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद नाशिकच्या हवामान खात्यानं केली आहे. नाशिकमध्ये पंचवटीतील गोदा घाटावर दोन जणांचा थंडीमुळे मृत्यू झाल्याची घटना काल रात्री घडली. औरंगाबाद शहरात आज सकाळी आठ पूर्णांक चार अंश तापमानाची नोंद झाल्याचं चिकलठाणा वेधशाळेनं सांगितलं.

दरम्यान, अरबी समुद्रात उत्तरेकडून पश्चिमेकडे थंड वारे वाहू लागल्यानं हवेत गारवा निर्माण झाला असून, त्याचा आंबा पिकावर परिणाम होऊ शकतो, अशी भीती कृषी विभागानं व्यक्त केली आहे. दोन-तीन दिवस हेच वातावरण कायम राहिलं, तर आंब्याच्या मोहोरावर त्याचा परिणाम होऊ शकतो.

****

वसंत पंचमी आज देशभरात साजरी होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वसंत पंचमीनिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. वसंत ॠतूचं आगमन आणि ज्ञानाच्या पूजेशी जोडलेला हा सण कुटुंब, समाज आणि देशात शिक्षण आणि ज्ञानाचा प्रसार करेल, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. नवी उमेद, नवी ऊर्जा आणि नवस्फूर्तीचं प्रतीक असलेल्या वसंत पंचमीच्या शुभेच्छा देत पंतप्रधानांनी, सरस्वती देवी सर्वांना ज्ञान आणि समृद्धी देवो, अशी प्रार्थना केली.

****

जम्मू-काश्मीर मध्ये कुलगाम जिल्ह्यातल्या देवसर भागात आज सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. या भागात आणखी एक दहशतवादी असल्याची शक्यता असून, चकमक सुरू असल्याचं संरक्षण सूत्रांनी सांगितलं. स्थानिक प्रशासनानं घटनास्थळ आणि आसपासच्या भागात मोबाईल इंटरनेट सेवा बंद केली आहे.

****

शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआय आजही कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांची चौकशी करत आहे. राजीवकुमार यांची चौकशी सीबीआयच्या शिलाँग इथल्या कार्यालयात काल सुरू झाली असून, जवळपास आठ तास चौकशी सुरू होती. दरम्यान, सीबीआयनं या प्रकरणात चौकशीसाठी तृणमूल काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार कुणाल घोष यांना हजर राहण्यासाठी समन्स जारी केलं आहे.

****

देशातल्या रेशीम उद्योगाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय सर्वतोपरी सहकार्य करेल, असं आश्वासन परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी दिलं आहे. नवी दिल्ली इथं रेशीम महामेळाव्यात त्या काल बोलत होत्या. भारतातली रेशीम उत्पादनं, त्यांच्या गुणवत्ता आणि विविधतेसाठी जगात प्रसिद्ध असल्याचं स्वराज यांनी नमूद केलं. वस्त्रोद्योग मंत्रालय रेशीम उद्योगात कार्यरत असणाऱ्यांच्या समस्या दूर करणार असल्याचं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी यावेळी सांगितलं.

****

औरंगाबाद इथं आज मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं पु.ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित पु.लं चे साहित्य या विषयावरील चर्चासत्राचं उद्घाटन मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते झालं. साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या पहिल्या सत्रात ज्येष्ठ विनोदी लेखक मुकुंद टाकसाळे आणि डॉ. शिरीष देखणे यांचं निबंध वाचन झालं. राष्ट्रपिता महात्मा गांधी, बाबा आमटे यांच्या विचारातून पु.लं.चं व्यक्तिमत्व तयार झाल्याचं टाकसाळे यावेळी म्हणाले. चिं. वि. जोशी, आचार्य अत्रे, गडकरी यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन पु. लं. नी दर्जेदार साहित्य निर्माण केल्याचं त्यांनी सांगितलं.

****

नांदेड इथं आजपासून नरहर कुरुंदकर व्याख्यानमालेला सुरुवात होत आहे. सुप्रसिद्ध हिंदी नाटककार, कवी आणि समीक्षक डॉ. नरेंद्र मोहन हे प्रमुख वक्ते असून, आज सायंकाळी सहा वाजता त्यांचं ‘विभाजन - हिंदी, उर्दू कहानियोंका विशेष संदर्भ’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.

****

भारत आणि न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघादरम्यान हॅमिल्टन इथं झालेला तिसऱ्या आणि शेवटच्या टी-ट्वेंटी सामन्यात न्यूझीलंडनं भारताचा दोन धावांनी पराभव केला.

****

No comments:

Post a Comment