Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 12 February
2019
Time 18.00
to 18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ फेब्रुवारी २०१९ सायंकाळी ६.००
****
लोकसभेत आज ‘अर्थ विधेयक २०१९’ पारित करण्यासाठी चर्चा सुरु झाली. मध्यम वर्ग
आणि प्रामाणिक करदात्यांना फायदा मिळवून देण्याचा या विधेयकाचा उद्देश असल्याचं अर्थमंत्री
पियुष गोयल यांनी चर्चा सुरु करताना सांगितलं. या विधेयकावरची चर्चा अद्याप सुरु आहे.
****
राज्यसभेत आज ‘आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा प्राधिकरण विधेयक २०१९’ मांडण्यात
आलं. दुपारच्या सत्रात कामकाज सुरु झाल्यानंतर विरोधकांनी विविध मुद्यांवरुन केलेल्या
गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकुब झालं.
दरम्यान, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा उद्या समारोप होत आहे.
****
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज राज्याच्या ग्रामीण भागासाठी काही महत्वाचे
निर्णय घेण्यात आले. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या मर्यादेत
दोन हजार कोटी रुपयांची तात्पुरत्या स्वरुपाची वाढ करण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिली.
आता ही रक्कम दोन हजार १५० कोटी रुपये इतकी झाली आहे. गेल्या खरीप हंगामातल्या १५१
दुष्काळी तालुक्यातल्या शेतकऱ्यांना शेतपिकाच्या नुकसानीपोटी तातडीनं मदत वाटप करण्यासाठी
हा निर्णय घेण्यात आला.
राज्यात ३४९ फिरते पशुवैद्यकीय चिकित्सालय स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य
योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात दुर्गम भागात ८० चिकित्सालयं
स्थापन करण्यात येणार आहेत. या फिरत्या पशुचिकित्सा पथकासाठी १६ कोटी ७४ लाख रुपयांच्या
खर्चास मान्यता देण्यात आली.
केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान ही योजना राज्यात राबवण्यास
मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या अभियानाअंतर्गत जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्राम
पंचायतीतल्या सदस्यांना प्रशिक्षण आणि क्षमता वाढीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार
आहेत.
राज्यातल्या सहकारी सुतगिरण्यांना अर्थसहाय्य करण्याच्या आकृतीबंधात सुधारणा
करण्यासही या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातल्या
कापूस उत्पादक प्रदेशात सहकारी सूत गिरण्यांच्या स्थापनेला प्रोत्साहन मिळणार आहे.
****
राज्याच्या एकात्मिक जल आराखड्यात कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठी २३ पूर्णांक
६६ दशलक्ष घनफूट पाण्याची तरतूद करण्यात आल्याबदल उस्मानाबादचे आमदार सुजितसिंह ठाकुर
यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांचे आभार मानले
आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत राज्याच्या एकात्मिक जल
आराखड्यास महाराष्ट्र जलसंपत्ती नियम प्राधिकरण अधिनियमाअंतर्गत राज्य जल परिषदेने
मान्यता दिली. आमदार ठाकूर यांनी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात कृष्णा मराठवाडा
सिंचन प्रकल्पासाठी पाण्याची तरतूद करण्याची मागणी केली होती.
****
मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या दोन पुरस्कारांची घोषणा
आज करण्यात आली. यंदाचा लोटू पाटील पुरस्कार ख्यातनाम रंगकर्मी मोहन आगाशे यांना, तर
यशवंतराव चव्हाण विशेष पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते भाई संपतराव पवार यांना जाहीर झाला
आहे. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी येत्या १२ मार्चला,
सुप्रसिद्ध कवी ना. धो. महानोर यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
अकरा हजार रूपये रोख, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
****
वीज बिलातील वाढीव आकारणी तसंच विविध प्रकारचे अधिभार, खंडित वीज पुरवठा आणि
महागडी वीज या प्रश्नांसंदर्भात औरंगाबाद जिल्ह्यातल्या लघू, मध्यम आणि सूक्ष्म उद्योजकांच्या
संघटनांच्या पदाधिकारी, सदस्यांनी आज ‘वीज बील होळी’ आंदोलन केलं. औरंगाबाद इथल्या
रेल्वेस्टेशन औद्योगिक वसाहतीतल्या सीएमआयए कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं. संघटनेचे
अध्यक्ष किशोर राठी, सीएमआयएचे अध्यक्ष राम भोगले, जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष
जगन्नाथ काळे यांनी आंदोलनाचं नेतृत्व केलं.
****
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जालना जिल्हा प्रशासनाकडून मतदार याद्या
अद्ययावत करण्यात आल्या आहेत. जिल्ह्याच्या मतदार यादीत ६६ हजार ६०९ मतदारांची नावं
वाढली असून, पाच हजार २९० मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. जालना जिल्ह्यातल्या
मतदारांची संख्या आता १५ लाख १६ हजार ४३१ इतकी झाली आहे.
****
जालना तालुक्यातल्या डुकरीपिंप्री इथं बैलगाडी विहिरीत पडून एका शेतकऱ्याचा
मृत्यू झाला. सोपान नागवे हे आज सकाळी बैलगाडीनं शेतात जात असताना बैलगाडी विहरित पडल्यानं
झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
****
मराठवाड्यात काही भागात तापमानात लक्षणीय वाढ झाली असून, उर्वरित राज्यात तापमान
सरासरीच्या जवळ आहे. औरंगाबाद आणि बीड सरासरी १६, तर परभणी आणि नांदेड इथं सरासरी २०
अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
****
No comments:
Post a Comment