Sunday, 10 February 2019

Text - AIR News Bulletin, Aurangabad 10.02.2019....Morning Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 10 February 2019

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १० फेब्रुवारी २०१सकाळी ७.१० मि.

****

·      दुष्काळ ही शाश्वत विकासाची संधी मानून काम करण्याची आवश्यकता- औरंगाबाद इथं आयोजित दुष्काळ निवारण-निर्मूलन परिषदेत मान्यवरांचं मत.

·      अहमदनगर जिल्ह्यातल्या पुणतांबा इथलं शेतकऱ्यांच्या मुलींचं अन्नत्याग आंदोलन मागे.

·      राज्यातल्या तापमानात उल्लेखनीय घट; मराठवाडाही गारठला.

आणि

·      भारत -न्यूझीलंड दरम्यान तीन टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत महिला तसंच पुरुष संघांचा आज शेवटचा सामना.

****

मराठवाड्यासह राज्यभरात यावर्षी पडलेला दुष्काळ भयावह असून याचा सामना करण्यासाठी शासकीय यंत्रणांना मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. दुष्काळ ही शाश्वत विकास करण्याची संधी आहे असं मानून कार्य करण्याची गरज असल्याचं मत औरंगाबाद इथं आयोजित दुष्काळ निवारण-निर्मूलन परिषदेत मान्यवरांनी काल व्यक्त केलं.

जलतज्ज्ञ प्राध्यापक प्रदीप पुरंदरे यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं. प्राध्यापक एच एम देसरडा, सुभाष काकुस्ते , के ई हरिदास, चंद्रकांत चव्हाण, डॉक्टर मारोती तेगमपुरे, डॉक्टर उमाकांत राठोड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

विलंब न करता जलसाठ्यांचं आरक्षण पिण्याच्या पाण्यासाठी करावं, ऊस, केळी अशा जास्त पाणी लागणाऱ्या पिकांचा पाणीपुरवठा बंद करावा, मद्य निर्मितीला पाणी देऊ नये, शेतकरी आणि शेतमजुरांना रोजगार हमी योजनेची कामं सर्वत्र उपलब्ध करुन द्यावीत यासह इतर काही ठराव या परिषदेत मंजूर करण्यात आले.

****

आपल्या कुटुंब व्यवस्थेत महिला सर्वात जास्त सर्जनशील असल्यानं केंद्र सरकारनं महिलांना केंद्रस्थानी ठेवल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल ‘हिरकणी महाराष्ट्राची’ आणि जिल्हा ‘व्यवसाय नियोजन स्पर्धा’ या योजनांची सुरुवात करताना ते बोलत होते. योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी महिलांचा सहभाग अत्यंत महत्वाचा असल्याचं ते म्हणाले. हिरकणी महाराष्ट्राची योजनेद्वारे ग्रामीण भागातील महिला बचत गटांना आर्थिक पाठबळ मिळणार आहे. तर जिल्हा व्यवसाय नियोजन स्पर्धा या योजनेतून ग्रामीण भागातल्या उद्योगांच्या विकासासाठी शासन अर्थसहाय्य करणार आहे. हिरकणी महाराष्ट्राची या योजनेची सुरुवात लातूर आणि चंद्रपूर इथून होणार असल्याचं कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी सांगितलं. 

****

राज्यात खनिज क्षेत्रातल्या उद्योगांच्या क्लस्टर उभारणीवर भर देण्यात येणार असल्याचं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं काल उद्योग आणि खनिकर्म विभागाच्या वतीनं आयोजित ‘मिनकॉन कॉनक्लेव्ह’मध्ये ते बोलत होते. राज्यात ज्या ठिकाणी खनिजसंपदा आढळते तिथं त्यावर आधारित प्रक्रिया उद्योग आणि मूल्यसंवर्धन उद्योग उभारण्यात येणार असून, यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळही भरीव सहकार्य करणार असल्याचं देसाई यांनी सांगितलं.

****

बँक खातेदारांचा कायम खाते क्रमांक - पॅन आणि इतर बाबींची माहिती खातेदारांच्या सहमतीशिवाय पत मानांकन संस्थेकडे दिल्याबद्दल आक्षेप घेणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि भारतीय रिर्व्ह बँकेकडून उत्तर मागितलं आहे. अर्थमंत्रालय आणि रिर्व्ह बँकेनं यावर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी नोटीस मुख्य न्यायमूर्ती राजेंद्र मेनन आणि न्यायमूर्ती व्ही के राव यांच्या पीठानं जारी केली आहे. खातेदारांचा कायम खाते क्रमांक आणि इतर माहितीची देवाणघेवाण करणं, हे गोपनीयतेच्या हक्कांचं उल्लंघन असल्याचं याचिकेत म्हटलं आहे.

****

शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी अहमदनगर जिल्ह्यातल्या पुणतांबा इथं अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलींनी काल आंदोलन मागे घेतलं. कृषीराज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करु, असं आश्वासन दिल्यानंतर, हे आंदोलन मागे घेण्यात आलं. आंदोलनकर्त्या मुलींची प्रकृती बिघडल्यानं पोलिसांनी त्यांना रुग्णालयात हलवलं होतं. मुलींच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन लवकरच निर्णय घेऊ, असंही खोतकर यांनी यावेळी स्पष्ट केलं. उपोषण सध्या मागे घेतलं असलं तरी मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर पुन्हा तीव्र आंदोलन करु, असं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं.

****

राज्यातल्या तापमानात उल्लेखनीय घट झाली आहे. उत्तरेकडून अतिथंड वारे वाहत असल्यानं ही लाट पसरली आहे. काल सर्वांत कमी, चार अंश सेल्सिअस तापमान नाशिक इथं नोंदवलं गेलं, तर महाबळेश्वर इथं पारा शून्यापर्यंत खाली आला. औरंगाबाद सहा पूर्णांक पाच, नांदेड आणि बीड सरासरी नऊ, तर परभणी इथं ११ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढच्या दोन दिवसांत मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची तर नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी गारपिटीची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

****

हज यात्रेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन केल्यामुळे पारदर्शकतेबरोबरच यात्रेच्या खर्चात बचत झाल्याचं केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत हज यात्रेशी संबंधित दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात बोलत होते. २०१८ या वर्षात, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच अनुदानाशिवाय विक्रमी संख्येनं यात्रेकरु हज यात्रेला गेल्याची माहिती त्यांनी दिली.

****

राज्य शासनाच्या वस्त्रोद्योग धोरणातर्गत वस्त्रोद्योग घटकांना वीजदरात सवलत देण्यात येणार आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणीची मुदतवाढ १५ फेब्रुवारी पर्यंत वाढण्यात आली आहे. मराठवाडा विभागतल्या वस्त्रोद्यागांनी या सवलतीचा लाभ घेण्याचं आवाहन प्रादेशिक उप-संचालक शिवनाथ स्वामी यांनी केलं आहे. ते म्हणाले… 

खाजगी सुतगिरण्या आणि इतर वस्त्रोद्योग घटकांना जे १०७ अश्वशक्तीपेक्षा जास्त दाबाचा वापर करतात, त्यांना रुपये दोन प्रति युनिट वीजदरात सवलत मिळणार आहे. सुधारीत योजनेचा लाभ घेण्यासाठी मराठवाडा विभागातील सर्व वस्त्रोद्योग घटकांनी ऑनलाईन नोंदणी करुन या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं मी आवाहन करत आहे.

****

भारत आणि न्यूझीलंड दरम्यान तीन टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील महिला तसंच पुरुष संघांचा तिसरा आणि शेवटचा सामना आज हॅमिल्टन इथं होणार आहे. महिला संघाचा सामना सकाळी साडेआठ वाजता तर पुरुषांचा सामना दुपारी साडेबारा वाजता सुरु होईल.

न्यूझीलंडच्या महिला संघानं याआधीचे दोन्ही सामने जिंकून मालिकेत दोन - शून्य अशी विजयी आघाडी मिळवली आहे, तर दोन्ही पुरुष संघ मालिकेत एक - एकनं बरोबरीत आहेत.

****

ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्या हस्ते काल औरंगाबाद इथं ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर यांच्या तीन ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, महात्मा गांधी मिशनचे सचिव अंकुशराव कदम, सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राम भोगले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

****

बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथल्या नरहर कुरुंदकर स्मृती साहित्य समारोहाच्या वतीनं देण्यात येणारा स्वर्गीय नरहर कुरुंदकर स्मृती साहित्य पुरस्कार परभणीचे साहित्यिक प्राध्यापक इंद्रजीत भालेराव यांना आज प्रदान करण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमात, बीड इथल्या मनीषा तोकले आणि लातूर इथले माधव बावगे यांना स्वर्गीय आर डी देशपांडे सामाजिक सेवा पुरस्कारानी तर पोखर्णी इथले त्र्यंबक वडसकर यांना संतुकराव भोकरे बालसाहित्य सेवा पुरस्कारांनं यावेळी गौरवण्यात येणार आहे.

****

जालना ते दादर दरम्यान धावणारी रेल्वे, जनशताब्दी एक्सप्रेस आज रद्द करण्यात आली आहे. कल्याण आणि टिटवाळा रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे पुलाच्या कामासाठी ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे ही रेल्वे रद्द करण्यात आली आहे, त्याचबरोबर नांदेड-सतरागच्ची साप्ताहिक एक्सप्रेस रेल्वेगाडीच्या दोनही बाजूंच्या फेऱ्याही रद्द करण्यात आल्या आहेत. दुरुस्तीच्या विविध कामांसाठी ही रेल्वेगाडी रद्द करण्यात आली असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.

****

मराठवाड्यात शास्त्रीय संगीत रुजवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या देवगिरी संगीत प्रतिष्ठानच्या वतीनं आज औरंगाबाद इथं वत्सलाबा भीमसेन जोशी स्मृती संगीत सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. विवेकानंद महाविद्यालयाच्या सभागृहात आज सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात अंकिता जोशी यांचं गायन होणार आहे.

****

No comments:

Post a Comment