Friday, 8 February 2019

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 08.02.2019 11.00


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०८ फेब्रुवारी २०१९ सकाळी ११.०० वाजता

****

राज्यातल्या मतदारांच्या संख्येत २८ लाखाहून अधिक नवीन मतदारांची भर पडली आहे. यामध्ये जवळपास १२ लाख मतदार, १८ ते १९ वयोगटातले असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. ३१ जानेवारी रोजी प्रसिध्द झालेल्या मतदार यादीनुसार ३५ लाख ६८ हजार ३५२ नवीन मतदारांची नावं निवडणूक आयोगानं मतदार यादीत समाविष्ट केली, तर, सात लाख २९ हजार ३३५ मतदाराची नावं वगळली आहेत.

****

घरगुती प्रकरणासाठी न्यायालयाकडे दाद मागितल्याबद्दल एक महिला आणि तिच्या कुटुंबीयांना वाळीत टाकल्याप्रकरणी जात पंचायतीच्या सात सदस्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जालना जिल्ह्यातल्या राजूर इथं राहणाऱ्या या महिलेने पती आणि सासरच्या लोकांविरोधात न्यायालयात तक्रार दिली होती. त्यावरून पुण्यात भरलेल्या जात पंचायतीत या महिलेसह तिच्या माहेरच्या कुटुंबाला वाळीत टाकण्यात आलं होतं. सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

****

लातूर महापालिकेच्या मालमत्ता कर वसूली मोहिमेला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं येत्या अठरा फेब्रुवारीपर्यंत स्थगिती दिली आहे. अवाजवी कर लागू करुन त्याची वसुली करण्यात येत असल्याची तक्रार करत, विधीज्ञ व्यंकट बेंद्रे तसंच नगरसेवक प्रकाश पाठक यांनी खंडपीठात याचिका दाखल केली आहे, त्यावर काल झालेल्या सुनावणीदरम्यान, न्यायालयानं, मनपाला १८ फेब्रुवारीपर्यंत करवसुली मोहिमेला स्थगिती दिली आहे

****

न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाचा आज झालेल्या दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यातही पराभव झाला. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडलेल्या न्यूझीलंड महिला संघाच्या गोलंदाजीमुळे भारतीय महिला संघ निर्धारित षटकांत १३५ धावाच करू शकला, न्यूझीलंड संघानं हे आव्हान विसाव्या षटकात पार केलं.



दरम्यान, या दोन्ही देशांच्या पुरुष संघातही आज दुसरा टी ट्वेंटी सामना खेळवला जाणार आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत न्यूझीलंडचा महिला संघ दोन शून्य अशा विजयी आघाडीवर तर पुरुष संघ एक शून्यनं आघाडीवर आहे.

//***********//




























No comments:

Post a Comment