Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 07 February
2019
Time 18.00
to 18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ७ फेब्रुवारी २०१९ सायंकाळी ६.००
****
राष्ट्रीय
लोकशाही आघाडी सरकारनं दिलेली वचनं पाळली नसल्याचा आरोप काँग्रेस नेते मल्लिकार्जुन
खरगे यांनी केला आहे. लोकसभेत आज राष्ट्रपतींच्या अभिभाषण प्रस्तावावरच्या चर्चेत ते
बोलत होते. देशात बेरोजगारी वाढली असल्याचं सांगून त्यांनी, विविध मंत्रालयं, विद्यापीठं
आणि अन्य क्षेत्रात असलेल्या रिक्त पदांचा उल्लेख केला. विमुद्रीकरणामुळे काळा पैसा
आणि दहशतवादावर अंकुश लावण्यात सरकार अपयशी ठरल्याचंही ते म्हणाले. सरकार अनुसूचित
जाती जमाती आणि इतर मागासवर्गीयांना आरक्षणात संरक्षण देण्यासाठी प्रभावी उपाययोजना
करत नसल्याचंही खरगे यावेळी म्हणाले.
विमुद्रीकरणामुळे
शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकांना फायदा झाला नसून, यामुळे काळा पैसाही बाहेर आला नसल्याची
टीका शिवसेनेचे आनंद आडसुळ यांनी केली. सत्ताधारी पक्षाकडून चर्चेत सहभागी होताना केंद्रीय
अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी, काँग्रेस पक्षानं ६० वर्षांपेक्षा
जास्त काळ सरकार चालवलं, मात्र जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याचं सांगितलं.
जनता दलाचे एच डी देवेगौडा, तृणमूल काँग्रेसचे दिनेश त्रिवेदी, तेलगु देसम पक्षाचे
जयदेव गाला आणि एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी यांनी या चर्चेत सहभाग घेतला.
****
राज्यसभेत
विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आजही कामकाजात व्यत्यय आला. दुपारी दोन वाजता कामकाज
सुरु झाल्यावर, विद्यापीठांमध्ये प्राध्यापक आरक्षणाच्या मुद्यावरून समाजवादी पक्ष
तसंच बहुजन समाज पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ केला. गदारोळ वाढत गेल्यानं राज्यसभेचं
कामकाज सभापती व्यंकय्या नायडू यांनी दिवसभरासाठी स्थगित केलं.
****
केंद्रीय
कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना, प्रधानमंत्री
किसान सन्मान निधी योजनेची प्रभावी आणि जलद अंमलबजावणी करण्यासाठी सहकार्य करण्याचं
आवाहन केलं आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांची निवड करुन त्यांची संपूर्ण माहिती
राज्य सरकारांनी संकलित करावी, असं सिंह यांनी लिहीलेल्या पत्रात म्हटलं आहे. या योजनेच्या
प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य पातळीपासून ते ग्रामीण पातळीपर्यंत प्रशासकीय यंत्रणेची
कटीबद्धता आवश्यक असल्याचंही कृषीमंत्र्यांनी सांगितलं.
****
छत्तीसगढमधल्या
विजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दहा नक्षलवादी
मारले गेले. बहरामगढ पोलिस स्थानकाजवळच्या जंगलात आज सकाळच्या सुमारास ही चकमक झाली.
चकमकीच्या ठिकाणाहून काही हत्यारं जप्त करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.
****
ग्रामीण
तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्याअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातल्या श्री संत नामदेव संस्थानसाठी
पहिल्या टप्प्यात १५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी मान्यता दिली आहे. मुंबईत आज ग्रमीण तिर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यासंदर्भात
झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली. या निधीतून भक्त निवास, भक्तांसाठीच्या
सुविधा, घनकचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा आदी सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. अमरावती
जिल्ह्यातल्या श्री संत गाडगेबाबा यांची कर्मभूमी असलेल्या आमला तीर्थक्षेत्राच्या
विकासासाठी सहा कोटी ७९ लाख आणि नागरवाडीच्या विकासासाठी १८ कोटी रुपये, तर रत्नागिरी
जिल्ह्यातल्या गणपतीपुळेच्या विकासासाठी १० कोटी रुपयांच्या आराखड्यासही यावेळी मंजुरी
देण्यात आली.
****
धनगर
समाजाला अनुसूचित जमाती मध्ये आरक्षण मिळावं, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसंदर्भात
औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज सकल धनगर समाजाच्या वतीनं मुंडण आंदोलन करण्यात
आलं. सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं नाव देण्यात यावं, शेळी
मेंढी विकास महामंडळाला २०० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करावी, यासह अन्य मागण्याचं
निवेदन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना देण्यात आलं.
****
उस्मानाबाद
शहर आणि परिसरात आज भूगर्भातून मोठा आवाज आला. दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास हा
आवाज आला असून, घरांवरची तावदानं हादरल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
मराठवाडा
आणि विदर्भाच्या काही भागात तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. आज सगळ्यात कमी नऊ पूर्णांक
नऊ अंश सेल्सिअस तापमान अहमदनगर इथं नोंदवलं गेलं. नाशिक १३ पूर्णांक दोन, बीड १४ पूर्णांक
आठ, औरंगाबाद १५ पूर्णांक सहा, तर परभणी आणि नांदेड इथं १९ अंश सेल्सिअस तापमानाची
नोंद झाली.
****
No comments:
Post a Comment