Friday, 8 February 2019

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 08.02.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 08 February 2019

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०८  फेब्रुवारी २०१९ दुपारी .०० वा.

****

राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा थेट सहभाग असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी केला आहे. आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत गांधी यांनी वार्ताहरांशी बोलताना, पंतप्रधानांनी उद्योजक अनिल अंबानी यांना, तीस हजार कोटी रुपये मिळवून दिल्याच्या आरोपाचा, पुनरुच्चार केला. सर्वोच्‍च न्यायालयातही, केंद्र सरकारनं यासंदर्भात खोटं शपथपत्र दिल्याचं, गांधी यांनी सांगितलं.



दरम्यान राफेल मुद्यावरून आज संसदेत प्रचंड गदारोळ झाला. पंतप्रधान कार्यालयानं राफेल खरेदीसंदर्भात फ्रान्स सरकारसोबत केलेल्या समांतर चर्चेवर, संरक्षण मंत्रालयानं आक्षेप घेतला होता, अशा आशयाचं वृत्त, एका वृत्तपत्रानं प्रसिद्ध केलं, राज्यसभेत विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांना, स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून, हा मुद्दा मांडण्याची परवानगी, सभापती व्यंकय्या नायडू यांनी दिली नाही, त्यावर आझादांसह काँग्रेसच्या इतर सदस्यांनी, जोरदार घोषणाबाजी केल्यानं, सभापतींनी सदनाचं कामकाज, दिवसभरासाठी स्थगित केलं. विविध मुद्यांवरुन झालेल्या गदारोळामुळे, या अधिवेशनात, राज्यसभेत आजपर्यंत कामकाज झालेलं नाही. 



लोकसभेत काँग्रेससह, तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष आणि तेलगु देशम पक्षाच्या खासदारांनी, या वृत्तपत्राच्या प्रती झळकावत, घोषणाबाजी करत, हौद्यात धाव घेतली, त्यामुळे अध्यक्षांनी कामकाज बारा वाजेपर्यंत स्थगित केलं.

कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी, या वृत्ताच्या आधारे सरकारवर टीका केली. मात्र संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी, हे सर्व आरोप फेटाळून लावले. गेल्या महिन्यात सदनात या विषयावर दिलेल्या निवेदनातही, आपण हा मुद्दा निराधार असल्याचं सांगितलं होतं, याकडे संरक्षण मंत्र्यांनी लक्ष वेधलं. त्यानंतरही सदनात विरोधी सदस्यांचा गदारोळ सुरूच राहिला. या गदारोळातच अध्यक्षांनी शून्य प्रहराचं कामकाज पुकारलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी धनगर तसंच लिंगायत आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला.

****

राफेल व्यवहारासंदर्भात विरोधकांनी केलेले आरोप फेटाळून लावत, संसदीय कामकाज मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी, सर्वोच्च न्यायालयानं या मुद्यावर, यापूर्वीच निर्णय दिल्याचं म्हटलं आहे. ते आज संसद परिसरात वार्ताहरांशी बोलत होते. या मुद्यावर लोकसभेत चर्चा झाली असून, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी, संपूर्ण माहिती दिली असल्याचं तोमर म्हणाले.

****

खुल्या प्रवर्गातल्या आर्थिक मागासवर्गीयांना, नोकरी आणि शिक्षणात, दहा टक्के आरक्षणाच्या निर्णयाला, आव्हान देणाऱ्या याचिकेवर, सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारकडून उत्तर मागितलं आहे. मात्र, सरकारच्या या निर्णयाला, स्थगिती देणार नसल्याचंही, न्यायालयानं स्पष्ट केलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज छत्तीसगड आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. छत्तीसगड मध्ये रायगड जिल्ह्यातल्या कोदतराय इथं त्यांनी, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसभेला संबोधित केलं. कोलकाता उच्च न्यायालयाच्या, जलपायगुडी खंडपीठाचं उद्घाटनही पंतप्रधान आज करणार आहेत.

****

आम आदमी पक्ष महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक लढवणार असून, प्रादेशिक पक्षांसोबत आघाडी करणार असल्याचं, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुधीर सावंत यांनी सांगितलं. आज मुंबईत पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना, सावंत यांनी, जागा वाटपाबद्दल १५ फेब्रुवारीपर्यंत निर्णय होईल, अशी माहिती दिली. मुंबईतल्या लोकसभेच्या सगळ्या जागा लढवणार असून, उर्वरित महाराष्ट्रातल्या जागांबाबत समविचारी पक्षांसोबत आघाडी केल्यानंतर विचार केला जाईल, असं सावंत म्हणाले.

****

न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा दुसरा टी ट्वेंटी सामना आज ऑकलंड इथं सुरु आहे. न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा न्यूझीलंडच्या पाच बाद एकशे एकतीस धावा झाल्या होत्या.

दरम्यान, न्यूझीलंड आणि भारतीय महिला क्रिकेट संघादरम्यान झालेल्या दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात आज भारताचा पराभव झाला.

****

चेन्नई खुल्या एटीपी टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत आज, भारताच्या प्रज्ञेश गुणेश्वरनचा सामना ऑस्ट्रेलियाच्या जेम्स डकवर्थ बरोबर होणार आहे. प्रज्ञेशनं काल उप-उपान्त्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताच्याच अर्जुन काधेचा सहा - चार, सहा - दोन असा पराभव केला होता. उपान्त्यपूर्व फेरीच्या अन्य एका लढतीत भारताच्या शशि कुमारचा सामना ब्रिटनच्या ब्राईडेन क्लीन विरुद्ध होणार आहे.

//***********//


No comments:

Post a Comment