Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 09 February
2019
Time 18.00
to 18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ९ फेब्रुवारी २०१९ सायंकाळी ६.००
****
जनहित
याचिका ही भारताची न्यायव्यवस्था प्रक्रियेला एक देणगी असल्याचं राष्ट्रपती रामनाथ
कोविंद यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी लिहिलेल्या
‘कायदा, न्याय आणि न्यायिक शक्ती - न्यायमूर्ती भगवती यांचा दृष्टीकोण’ या पुस्तकाच्या
प्रकाशन प्रसंगी बोलत होते. केवळ एक पत्राची दखल घेऊन त्या आधारे याचिका दाखल करून
त्यास प्रतिसाद देण्याचा भारतीय न्यायव्यवस्थेचा आदर्श आणि साधेपणा वाखाण्याजोगा असल्याचे
गौरवोद्गारही राष्ट्रपतींनी यावेळी काढले.
****
सुधारित
नागरिकत्व कायदा पूर्ण देशाशी संबंधित असून, पूर्ण तपासणी केल्याशिवाय कोणालाही नागरिकत्व
दिलं जाणार नसल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आसाममधल्या चांगसारी
इथं जनसभेला ते संबोधित करत होते. शेजारच्या राज्यातल्या अल्पसंख्याकांना आश्रय देण्यास
सरकार कटीबद्ध असल्याचं पंतप्रधान म्हणाले. त्यानंतर तीनसुकिया इथं ‘हॉलाँग गॅस प्रक्रिया
प्रकल्पा’चं उद्घाटन तसंच नुमालीगढ इथं ‘गॅस शुद्धीकरण प्रकल्पा’ची पायाभरणी आणि गुवाहाटी
इथं ब्रह्मपुत्रेवरच्या सहा पदरी पुलाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं.
दरम्यान,
पंतप्रधानांनी आज त्रिपुराची राजधानी आगरतळा इथं गारजी - बेलोनिया रेल्वे मार्गाचं
लोकार्पण आणि नरसिंहगढ इथं त्रिपुरा तंत्रज्ञान संस्थेच्या नवीन परिसराचं उद्घाटन केलं.
****
शारदा
चिटफंड घोटाळ्यासंदर्भात केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयनं आज कोलकाताचे पोलिस आयुक्त
राजीव कुमार यांची मेघालयची राजधानी शिलाँग इथं चौकशी केली. ही चौकशी तीन टप्प्यात
केली जाणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयला
राजीव कुमार यांना अटक न करण्याचे आदेश दिले, मात्र कुमार यांनी तपासात सहकार्य करण्याचंही
न्यायालयानं सांगितलं आहे.
****
आपल्या
कुटुंब व्यवस्थेत महिला सर्वात जास्त सर्जनशील असल्यानं केंद्र सरकारनं महिलांना केंद्रस्थानी
ठेवल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलं आहे. मुंबईत
आज ‘हिरकणी महाराष्ट्राची’ आणि जिल्हा ‘व्यवसाय नियोजन स्पर्धा’ या योजनांची सुरुवात
करताना ते बोलत होते. योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी महिलांचा सहभाग अत्यंत महत्वाचा
असल्याचं ते म्हणाले. हिरकणी महाराष्ट्राची योजनेद्वारे ग्रामीण भागातील महिला बचत
गटांना आर्थिक पाठबळ मिळणार आहे. तर जिल्हा व्यवसाय नियोजन स्पर्धा या योजनेतून ग्रामीण
भागातल्या उद्योगांच्या विकासासाठी शासन अर्थसहाय्य करणार आहे. हिरकणी महाराष्ट्राची
या योजनेची सुरुवात लातूर आणि चंद्रपूर इथून होणार असल्याचं कामगार मंत्री संभाजी पाटील
निलंगेकर यांनी यावेळी सांगितलं.
****
उत्तरप्रदेशात
प्रयागराज इथं उद्या वसंतपंचमीनिमित्त होणाऱ्या शाही स्नानासाठी प्रशासन सज्ज आहे.
शाही स्नानाचं हे तिसरं आणि अखेरचं पर्व असणार आहे. त्यानंतर माघी पौर्णिमा आणि महाशिवरात्रीला
महास्नान सोहळा होईल.
****
राज्यात
खनिज क्षेत्रातल्या उद्योगांच्या क्लस्टर उभारणीवर भर देण्यात येणार असल्याचं उद्योगमंत्री
सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं आज उद्योग आणि खनिकर्म विभागाच्या वतीनं
आयोजित ‘मिनकॉन कॉनक्लेव्ह’ मध्ये ते बोलत होते. राज्यात ज्या ठिकाणी खनिजसंपदा आढळते
तिथं त्यावर आधारित प्रक्रिया उद्योग आणि मूल्यसंवर्धन उद्योग उभारण्यात येणार असून,
यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळही भरीव सहकार्य करणार असल्याचं देसाई यांनी
सांगितलं.
****
राज्यात
तापमानात उल्लेखनीय घट झाली आहे. आज सर्वात कमी चार अंश सेल्सिअस तापमान नाशिक इथं
नोंदवलं गेलं. औरंगाबाद सहा पूर्णांक पाच, नांदेड आणि बीड सरासरी नऊ, तर परभणी इथं
११ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढच्या दोन दिवसात मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात
तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
चेन्नई
खुल्या एटीपी टेनिस स्पर्धेत आज भारताचं आव्हान संपुष्टात आलं. आज झालेल्या उपान्त्य
फेरीच्या सामन्यात भारताचा प्रज्ञेश गुणेश्वरन आणि शशिकुमार मुकुंद यांचा पराभव झाला.
ऑस्ट्रेलियाच्या अँन्ड्र्यू हॅरिसनं प्रज्ञेशचा चार - सहा, सहा - तीन असा, तर फ्रान्सच्या
कोरेन्टिन मूटेटनं शशिकुमारचा तीन - सहा, सहा - चार, सहा - दोन असा पराभव केला.
****
भारत
आणि न्यूझीलंड दरम्यान तीन टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील महिला तसंच पुरुष
संघांचा तिसरा आणि शेवटचा सामना उद्या हॅमिल्टन इथं होणार आहे. महिला संघाचा सामना
सकाळी साडेआठ वाजता तर पुरुषांचा सामना दुपारी साडेबारा वाजता सुरु होईल. न्यूझीलंडच्या
महिला संघानं याआधीचे दोन्ही सामने जिंकून मालिकेत दोन - शून्य अशी विजयी आघाडी मिळवली
आहे, तर दोन्ही पुरुष संघ मालिकेत एक - एकनं बरोबरीत आहेत.
****
No comments:
Post a Comment