Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 04 March 2019
Time 7.10 AM to
7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ मार्च २०१९ सकाळी ७.१० मि.
****
v बहुजन
वंचित आघाडीला चार जागा देण्याची महाआघाडीची तयारी- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण
v भारतीय
जनता पक्षाची राज्यभर विजय संकल्प वाहन रॅली
v भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉक्टर रघुराम राजन यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा
राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
आणि
v अवैध
व्यावसायिकांना सहकार्य करणाऱ्या जालना पोलीस दलातल्या दोन अधिकाऱ्यांसह सहा कर्मचारी
निलंबित
****
बहुजन वंचित आघाडी ही काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या
महाआघाडीत सामिल झाल्यास त्यांना चार जागा देण्याची तयारी असल्याची माहिती काँग्रेसचे
प्रदेशाध्यक्ष खा़सदार अशोक चव्हाण यांनी दिली. नांदेड इथं काल ते वार्ताहरांशी बोलत
होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राज्यघटनेच्या चौकटीत आणण्याच्या अटीबाबत बोलतांना
चव्हाण यांनी सांगितलं की, काँग्रेसची भूमिका ही कायम संघ विरोधात राहिली आहे, ॲडव्होकेट
प्रकाश आंबेडकर यांना नेमके काय अपेक्षित आहे, याचा मसुदा दिल्यास काँग्रेस तो मान्य
करील असं ते म्हणाले.
****
राज्यात काल भारतीय जनता पक्षानं ठिकठिकाणी विजय संकल्प वाहन रॅली काढली. मुंबईत मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. मराठवाड्यातही विविध ठिकाणी ही रॅली काढण्यात आली. औरंगाबाद शहरातल्या तिन्ही
मतदारसंघातून तसंच जालना
जिल्ह्यातल्या पाचही विधानसभा मतदार संघातून ही रॅली काढण्यात आली. यात खासदार आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकंत्री
बबनराव लोणीकर यांनी सहभाग घेतला. लातूर इथं पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली तर नांदेड इथं पक्षाचे महासचिव विजय पुराणिक यांच्या
उपस्थितीत ही रॅली काढण्यात आली.
****
शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या पुरस्कारांचं
वितरण काल नाशिक इथं झालं. यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावे दिला
जाणाऱ्या समाजभूषण पुरस्कारासह, महात्मा जोतीबा फुले तसंच राजर्षी शाहू महाराज आणि
संत रविदास यांच्या नावे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचा समावेश होता. याप्रसंगी केंद्रीय
सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले उपस्थित होते.
यावेळी बोलतांना बडोले यांनी, राज्य सरकारनं कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्मृती योजनेंतर्गत
जमीन खरेदीसाठीच्या वित्त सहाय्यात आठ लाख रुपयांची वाढ केल्याचं सांगून मुंबईत रविदास भवन उभारण्यासाठी निधी मंजूर
केल्याचं सांगितलं.
****
आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनांद्वारे
राज्यातल्या ९० टक्के लोकांना आरोग्य विम्याचं संरक्षण मिळालं आहे, असं मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. पालघर इथं काल अटल आरोग्य महाशिबिराचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या
हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. अटल आरोग्य शिबीर खऱ्या अर्थानं समाजातल्या शेवटच्या
माणसापर्यंत आरोग्य सेवा पोहचवणारं शिबिर आहे, असंही ते म्हणाले.
****
धनगर समाजाला आदिवासी विकास विभागाच्या सर्व योजना
लागू करण्याचा निर्णय , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी लोकसभा निवडणुकीमुळं
घेतल्याचा आरोप आदिवासी संघटनांनी केला आहे.
यासंदर्भात काल नंदुरबार इथं माजी मंत्री पदमाकर वळवी यांच्या नेतृत्वाखाली या संघटनांनी
वार्ताहर परिषद घेतली. या राजकीय निर्णयामुळे आदिवासींची कुचंबणा करत, आदिवासी संस्कृतीवरच
आघात करण्याचं काम भाजपा सरकारनं केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
चार दिवसात सरकारनं हा निर्णय मागं घ्यावा, अन्यथा
तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनांनी दिला
आहे. प्रत्येक पक्षातल्या आदिवासी लोकप्रतिनीधींनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी
लागेल, असंही या संघटनांचं मत आहे.
****
गोपीनाथ मुंडे यांनी वाचिंतांचा आवाज शासनापर्यंत
पोहोचवला, तसंच शेतकरी आणि ऊस तोड कामगारांचे प्रश्न सोडवले, असं राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.
नाशिक इथं काल पवार यांच्या हस्ते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याचं अनावरण आणि एका महाविद्यालयाच्या इमारतीचं उद्घाटन
झालं, त्यावेळी ते बोलत होते. ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे, माजी उपमुख्यमंत्री
छगन भुजबळ यांच्यासह अन्य मान्यवर याप्रसंगी
उपस्थित होते.
****
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा २०१८ सालचा राष्ट्रीय
पुरस्कार भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉक्टर रघुराम राजन यांना जाहीर झाला आहे. यशवंतराव चव्हाण
यांच्या १०६ व्या जयंती निमित्त येत्या १२
मार्चला प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत राजन यांना हा पुरस्कार
प्रदान केला जाईल.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
महाशिवरात्रीचा उत्सव आज देशभरात साजरा होत आहे.
यानिमित्त ठिकठिकाणच्या शिव मंदीरांमध्ये दर्शनासाठी भाविकांचा उत्साह दिसून येत आहे. मराठवाड्याच्या औरंगाबाद
जिल्ह्यात वेरुळचं घृष्णेश्वर, हिंगोली जिल्हात औंढा नागनाथ आणि बीड जिह्यात परळी वैजनाथ या ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी भाविकांनी
आज पहाटेपासूनच गर्दी केली आहे.
****
जालना पोलीस दलातल्या दोन अधिकाऱ्यांसह सहा कर्मचाऱ्यांना
पोलीस अधीक्षक एस. चैतन्या यांनी काल तडकाफडकी निलंबित केलं, तर एका पोलीस निरीक्षकाची
नियंत्रण कक्षात बदली केली आहे. त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातल्या अवैध व्यावसायिकांवर
कारवाई करण्याऐवजी त्यांना सहकार्यच केल्याचं चौकशी अहवालात निष्पन्न झालं होतं. या अहवालाच्या
आधारे ही कारवाई करण्यात आल्याचं पोलीस अधीक्षक एस. चैतन्या यांनी सांगितलं. सहायक
पोलीस निरीक्षक सुनीलकुमार काकडे, पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड, हवालदार रामेश्वर जाधव, कपील जाधव, इंद्रजित काळेबाग, संतोष
सावंत, सदाशिव राठोड, रामप्रसाद पहुरे अशी निलंबित अधिकारी, कर्मचाऱ्यांची नावं आहेत.
लातूर जिल्ह्यात उमरगा पोलिस
ठाण्यात हाणामारी करणाऱ्या चार पोलिसांना पोलिस अधीक्षक आर. राजा यांनी निलंबित केलं
आहे.
****
औरंगाबाद शहरातल्या चिकलठाणा बाजार तळासमोर दुचाकी
दुभाजकाला धडकून काल झालेल्या अपघातात एक जण ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला. मोहसीन
युसूफ अत्तार असं मृताचं नावं असून, साहिल सुभान अत्तार गंभीर जखमी झाला आहे. चिकलठाणा
एम.आय.डी.सी. पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली.
****
लातूर इथल्या श्री सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थानच्या
महाशिवरात्री यात्रा महोत्सवाला आजपासून प्रारंभ होणार आहे. १८ मार्चपर्यंत चालणाऱ्या
या महोत्सवात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याचं,
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात गंगाखेड इथं काल पशु प्रदर्शन मेळावा
घेण्यात आला. यात शेतकरी आणि पशुपालकांना पशुसंवर्धन,
विज्ञानावर आधारित आधुनिक शेती आणि शेतीपुरक उद्योग याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं.
*****
***
No comments:
Post a Comment