Tuesday, 26 March 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 26.03.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 26 March 2019

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २ मार्च २०१९ दुपारी .०० वा.

****



 भारतीय जनता पक्षानं, पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी यांना लोकसभा निवडणूक लढवू नये, असं सांगितलं आहे. पक्षानं, यंदाच्या निवडणुकीत वयाची ऐंशी वर्ष पूर्ण केलेल्या अनेक विद्यमान खासदारांना संधी दिलेली नाही, नव्वद वर्षांचे लालकृष्ण अडवाणी यांच्यासह, बी सी खंडुरी, करिया मुंडा यांच्यासह अनेक ज्येष्ठांच्या या यादीत आता मुरली मनोहर जोशी यांचं नावही समाविष्ट झालं आहे. जोशी हे कानपूरचे विद्यमान खासदार आहेत. त्यापूर्वी ते २००९ मध्ये वाराणसी मतदार संघाचं प्रतिनिधीत्व करत होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी त्यांनी २०१४ मध्ये वाराणसी ऐवजी कानपूर मतदार संघातून निवडणूक लढवली होती.

****



 निवडणूक आयोगानं, निवडणूक काळात संभाव्य वापरात येणारं सुमारे ५४० कोटी रुपये किंमतीचं साहित्य जप्त केलं आहे. यामध्ये अवैध मद्यसाठा, अंमली पदार्थ, दागिने आणि रोख रकमेचा समावेश आहे. अशा कारवाईत तमिळनाडू प्रथम स्थानावर तर उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे. निवडणूक आयोगाकडून ही माहिती देण्यात आली.

****



 भाजप नेते नीतीन गडकरी यांनी आपल्याकडे २५ कोटी बारा लाख रुपयांची मालमत्ता असल्याचं, उमेदवारी अर्जासोबतच्या शपथपत्रात नमूद केलं आहे. यामध्ये सुमारे सात कोटी रुपयांची अचल संपत्ती तर सुमारे सत्तर लाख रुपयांची चल संपत्ती आहे. आपल्यावर सुमारे दीड कोटींपेक्षा अधिक रकमेचं कर्ज असल्याचंही गडकरींनी यात नमूद केलं आहे.

****



 देशात वैद्यकीय संशोधनाला चालना देण्यासाठी, आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयानं औषधं आणि चिकित्साशास्त्रीय चाचण्या नियम २०१९ जारी केला आहे. या नव्या नियमांमुळे नवी औषधं आणि चाचण्यांच्या, मंजूरी संबंधी नियमांमध्ये, बदल केले जातील. नवीन औषधं, मानवी उपचारासाठी नव्या औषधांचा शोध, तसंच चिकित्सात्मक चाचण्यांवर हे सर्व नियम लागू होतील.

****



 छत्तीसशे कोटी रूपयांच्या व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर व्यवहाराप्रकरणी, अंमलबजावणी संचालनालय -इडी ने दिल्लीतून एकाला अटक केली आहे. सुषेण गुप्ता असं त्याचं नाव असून, ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर व्यवहारासह, संरक्षण दलाच्या अनेक व्यवहारात त्याचा सहभाग होता, अशी माहिती इडीच्या अधिकाऱ्यांनी दिली. काळा पैसा वैध करण्यास प्रतिबंध कायद्याखाली त्याला अटक करण्यात आली. राजीव सक्सेना याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. याच प्रकरणात गौतम खेतान आणि ख्रिश्चेन मिशेल या दोघांना यापूर्वी अटक करण्यात आली आहे.

****



सिंगापूर विमान कंपनीच्या मुंबई सिंगापूर विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली होती. त्यामुळे नियंत्रण कक्षात चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. हे विमान काल रात्री मुंबईहून सिंगापूरकडे निघालं होतं, आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास ते सिंगापूर विमानतळावर सुखरूप उतरलं. विमानात २६३ प्रवासी होते.



 मुंबईहून मुरूड जंजिऱ्याकडे जाणाऱ्या एस टी बसमध्येही काल बॉम्ब असल्याची  माहिती मिळाली होती. ही बस अलिबाग जिल्ह्यातल्या रेवदंडा स्थानकात येताच, बसची संपूर्ण तपासणी करण्यात आली. पूर्ण तपासणी अंती ही अफवा असल्याचं स्पष्ट झालं. कर्जत आगाराच्या एका बसमध्ये नुकताच बॉम्ब सापडला होता, त्यापार्श्वभूमीवर सतर्कता बाळगली जात आहे.

****



 बुलडाणा जिल्ह्यात देऊळगावराजा इथं काल वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाली. या प्रकरणी दोन्ही गटातल्या ३० जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून, एका नगरसेवकासह ११ जणांविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. यापैकी आतापर्यंत १७ आरोपींना अटक करण्यात आली असून, १३ आरोपी अजून फरार आहेत.

****



 जालना जिल्ह्यात आज पहाटे रस्ता अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. पुलाचा अंदाज न आल्यानं दुचाकी खड्यात पडून हा अपघात झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



         नवी दिल्ली इथं आज सुरु होणाऱ्या भारतीय खुल्या सुपर 500बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधूचा सामना प्रतिस्पर्धी मुग्धा आग्रे हिच्याशी होणार आहे. महिला एकेरी सामन्यात वृषाली गुम्मादी, साईउत्तेजिता राव यांच्यामध्ये, तर किदंबी श्रीकांत याचा सामनाहाँगकाँगच्या विंग की विनसेंस सोबत असेल.

*****

***

No comments:

Post a Comment