आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२८
मार्च २०१९ सकाळी
११.०० वाजता
****
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठीची
अधिसूचना आज जारी होणार आहे. या तिसऱ्या टप्प्यात गुजरातच्या सर्व २६ जागांसाठी, केरळच्या
सर्व २०, गोव्यातल्या दोन्ही, उत्तर प्रदेश दहा, छत्तीसगड सात, ओडिशा सहा, बिहार आणि
पश्चिम बंगाल प्रत्येकी पाच, आसाम चार, जम्मू काश्मीर, दीव दमण, दादरा नगर हवेलीच्या
प्रत्येकी एक आणि कर्नाटक तसंच महाराष्ट्रातल्या प्रत्येकी चौदा जागांवर, येत्या २३
एप्रिलला मतदान होणार आहे. महाराष्ट्रातल्या चौदा जागांमध्ये मराठवाड्यातल्या औरंगाबाद
आणि जालना या दोन जागांसह, जळगाव, रावेर, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली,
सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणगंले या मतदार संघांचा समावेश आहे.
या सर्व मतदार संघांमध्ये चार एप्रिलपर्यंत उमेदवारी
अर्ज भरता येणार आहेत. दरम्यान, पहिल्या टप्प्यात अकरा एप्रिलला होणाऱ्या निवडणुकीसाठी
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज दुपारी तीन वाजता संपणार आहे.
या पहिल्या टप्प्यात राज्यातले नागपूर, रामटेक, वर्धा, गडचिरोली-चिमूर, भंडारा- गोंदिया,
चंद्रपूर, आणि यवतमाळ- वाशिम या सात मतदारसंघाचा समावेश आहे.
****
अहमदनगर लोकसभा मतदार संघातले भाजपचे उमेदवार डॉ
सुजय विखे यांनी काल रात्री भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप गांधी यांची भेट घेतली, काँग्रेसचे
विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, तसंच गांधी यांचे पुत्र सुवेंद्र
यावेळी उपस्थित होते. सुवेंद्र गांधी यांनी अहमदनगर इथून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार
असल्याचं जाहीर केलं आहे, या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
****
नागपुरातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांचा आपल्याला
पाठिंबा असल्याचा दावा, भाजपचे नागपूरचे उमेदवार नीतीन गडकरी यांनी केला आहे. या कार्यकर्त्यांचे
आपल्याला पाठिंब्याचे दूरध्वनी, तसंच शुभेच्छा संदेश येत असल्याचं गडकरी यांनी सांगितलं.
नागपुरात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात अकरा एप्रिलला मतदान होणार आहे.
****
लोकसभा निवडणुक आचार संहिता लागू झाल्यापासून अमरावती
जिल्ह्यात आता पर्यंत दारू जप्तीच्या पऩ्नास कारवाया करण्यात आल्या असून, संबंधितांविरोधात
गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगानं पोलीस प्रशासन आणि
उत्पादन विभागाकडून ही कारवाई करण्यात येत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
औरंगाबाद जिल्हा परिषदेतली, काँग्रेस सोबतची युती
तोडण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना
आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांच्या समन्वयकांच्या बैठकीत हा निर्णय झाला. शिवसेनेनं
ही युती तोडली तरचं प्रचारात सहभागी होण्याची अट, भाजपनं घातली होती, त्यानंतर काल
हा निर्णय घेण्यात आला.
****
गोव्यात, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातून भारतीय
जनता पक्षात प्रवेश केलेले आमदार दीपक पावसकर यांचा काल रात्री साडेअकरा वाजता गोवा
मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची
शपथ दिली. तत्पूर्वी काल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे
एकमेव सदस्य असलेले, सुदीन ढवळीकर यांचं उपमुख्यमंत्रिपद काढून घेत, त्यांना मंत्रिमंडळातूनही
वगळलं.
या पक्षाचे दोन आमदार भाजपत दाखल झाल्यामुळे, चाळीस
आमदारांच्या गोवा विधानसभेत भाजपचं संख्याबळ चौदा झालं आहे, विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचेही
गोव्यात १४ आमदार आहेत. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आणि अन्य एका सदस्यांचं निधन
तसंच काँग्रेसच्या दोन आमदारांचे राजीनामे, यामुळे रिक्त झालेल्या गोवा विधानसभेतल्या
जागांसाठी लोकसभा निवडणुकीसोबत, पोटनिवडणूक होणार आहे.
****
जम्मू- काश्मीरमध्ये शोपीया इथं सैन्य दल आणि दहशतवाद्यांच्या
चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले, काल रात्री केल्लर इथं ही चकमक सुरू झाली असून ती
अजुनही सुरूच असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. हंदवाडा आणि कूपवाडा इथंही
दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू आहे.
****
छत्तीसगडच्या
सुकमा जिल्ह्यात काल दहा नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं, यात
दोन महिला नक्षलवाद्यांचाही समावेश आहे, हे नक्षलवादी स्वत:हून पोलिस ठाण्यात
आल्याचं अप्पर पोलिस अधीक्षक शलभ सिन्हा यांनी सांगीतलं. हे सर्व नक्षलवादी बलांगटोक
या गावातले आहेत.
****
सुलतान अजलन शहा हॉकी स्पर्धेत परवा शनिवारी भारत
आणि दक्षिण कोरिया संघांमध्ये अंतिम लढत होणार आहे. इपोह इथं काल खेळल्या गेलेल्या
राउंड- रॉबिन उपांत्य फेरीच्या सामन्यात, भारतानं कॅनडाचा ७-३ अशा फरकानं पराभव करत
अंतिम फेरीत प्रवेश केला. मनदीपसिंहनं हॅटट्रीक करत सामन्यातला विजय सुकर केला. अन्य
एका सामन्यात दक्षिण कोरीयानं मलेशियाला हरवत अंतिम फेरी गाठली आहे.
*****
***
No comments:
Post a Comment