Sunday, 3 March 2019

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 03.03.2019 7.10


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 03 March 2019

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ मार्च २०१ सकाळी ७.१० मि.

****

§   आदिवासी समाजाप्रमाणेच, धनगर समाजासाठीच्या विविध योजना, स्वतंत्र आर्थिक तरतूदींसह, सुरू ठेवण्याचा मंत्रीमंडळ उपसमितीचा निर्णय

§   कोकणातल्या नाणार तेलशुध्दीकरण प्रकल्पाच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द

§   डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपकेंद्राच्या विकासासाठी १४ कोटी ८७ लाख रुपयांची तरतूद



आणि

§   ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा सहा गडी राखून विजय

****

आदिवासी समाजाप्रमाणेच, धनगर समाजासाठीच्या विविध योजना, स्वतंत्र आर्थिक तरतूदींसह, सुरू ठेवण्याचा निर्णय, मंत्रिमंडळ उपसमितीनं घेतला आहे. धनगर आरक्षणासंदर्भात स्थापन, मंत्रिमंडळ उपसमितीची पहिली बैठक काल मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. धनगर आरक्षणाबाबत टाटा सामाजिक संशोधन संस्थेनं तयार केलेला अहवाल, महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्याकडे काल हस्तांतरीत करण्यात आला. आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारला शिफारस करणं, तसंच उच्च न्यायालयातलं प्रकरण आणि इतर कायदेशीर बाबींविषयी ते शासनाला मार्गदर्शन करतील. महाधिवक्त्यांचं मत येईपर्यंत धनगर समाजासाठीच्या योजना सुरू राहणार आहेत. सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचं नाव देण्याचा निर्णयही, या बैठकीत घेण्यात आला.

****

कोकणातल्या नाणार तेलशुध्दीकरण प्रकल्पासाठी सुरू केलेली भूसंपादन प्रक्रियेची अधिसूचना, रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्याच्या निर्णयावर स्वाक्षरी केली आहे. लोकसभा निवडणुकांसाठी, भारतीय जनता पक्ष - शिवसेना युतीवर शिक्कामोर्तब करताना, शिवसेनेनं नाणार मुद्दा उपस्थित केला होता. या प्रकल्पासाठी अधिग्रहीत करण्यात आलेल्या नाणार इथल्या ग्रामस्थांच्या जमिनी त्यांना परत करण्यात येतील असं, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं.

****

व्हिडिओकॉन कंपनीचे प्रवर्तक वेणूगोपाल धूत आणि आय सी आय सी आय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर काल सक्तवसुली संचालनालयात हजर झाले. तपास पथकानं या दोघांची मुंबई आणि औरंगाबाद इथं असलेली निवासस्थानं आणि कार्यालयांची तपासणी केली. आय सी आय सी आय बँकेनं व्हिडिओकॉन कंपनीचे प्रवर्तक वेणूगोपाल धूत यांना सुमारे एक हजार ८७५ कोटी रुपये कर्ज देताना झालेली, अनियमितता आणि भ्रष्टाचाराच्या तपासासाठी ही चौकशी केली जात आहे. सक्तवसुली संचालनालयानं चंदा कोचर, दीपक कोचर, धूत यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

****

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि चिनी पेपर उत्पादक कंपनी नाईन ड्रॅगन्स यांच्यामध्ये काल सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत झालेल्या या करारानुसार ही कंपनी चार हजार पाचशे कोटी रूपयांची गुंतवणूक करणार असून, या माध्यमातून पुढच्या पाच वर्षांमध्ये दहा हजारांवर रोजगारनिर्मिती करणार असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

उस्मानाबाद इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्राच्या परिसर विकासासाठी येत्या आर्थिक वर्षात १४ कोटी ८७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून या निधीतून, येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी वस्तीगृह उभारण्यात येईल, अशी माहिती ज्येष्ठ व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर यांनी दिली. विद्यापीठ अधिसभा, व्यवस्थापन परिषद, विद्यापीठ उपपरिसर मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या विविध महत्त्वपूर्ण ठरावांची माहिती काल निंबाळकर यांनी उस्मानाबाद इथं वार्ताहरांना दिली. काम सुरू करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ९० लाखांचा निधीही यावेळी निंबाळकर यांच्या हस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सुपूर्द करण्यात आला.

****

क्रिकेट -

ऑस्ट्रेलियाविरूद्धचा पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना काल भारतानं सहा गडी राखून जिंकला. हैदराबाद इथं झालेल्या या सामन्यात, ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करून, सात बाद २३६ धावा केल्या, भारतानं एकोणपन्नासाव्या षटकात सहा गडी राखून हे लक्ष्य साध्य केलं. केदार जाधवनं नाबाद ८१, महेंद्रसिंह धोनीनं ५९, कर्णधार विराट कोहलीनं ४४ धावा केल्या. मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादवनं प्रत्येकी दोन तर केदार जाधवनं एक बळी टिपला. मालिकेतला पुढचा सामना, मंगळवारी नागपूर इथं होणार आहे.

****

दिव्यागांनी ऑनलाईन नोंदणी करुन वैश्विक ओळखपत्र मिळवावं असं आवाहन बीड जिल्ह्यातल्या धारुरच्या तहसीलदार शिवनंदा लंगडापुरे यांनी केलं आहे. धारुर इथं आयोजित ओळखपत्र नोंदणी शिबीरात काल त्या बोलत होत्या. दिव्यांगासाठी शासन राबवत असलेल्या विविध योजनांचा लाभ या ओळखपत्राद्वारे घेता येणार आहे.

****

डिजीटल शाळेसह मुलांच्या गुणवत्तेत वाढ करुन स्वच्छतेचे संस्कार रुजवण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न केल्यास शाळा आदर्श बनू शकते, असं मत नांदेड जिल्हा परिषदेच्या  पाणी आणि स्वच्छता मिशन कक्षाचे कार्यक्रम व्यवस्थापक मिलिंद व्यवहारे यांनी केलं आहे. नांदेड जिल्ह्यात लोहा तालुक्यात डेर इथं, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानातर्गत जिल्हास्तरीय पाहणी काल झाली, त्यावेळी ते बोलत होते.

****

परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यातल्या एपीजे अब्दूल कलाम शाळेनं प्रवेशपत्र न दिल्यानं, ४६ विद्यार्थ्यांना दहावीची परीक्षा देता आली नाही. मालेवाडी इथल्या रेखाजी पवार माध्यमिक केंद्रावर हा प्रकार घडला. आर्थिक व्यवहार पूर्ण न झाल्यानं प्रवेश पत्र देण्यात आलं नसल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

परभणी महापालिकेनं, नळपट्टी तसंच मालमत्ताकर थकबाकी वसुलीसाठी विशेष सवलत योजना जाहीर केली आहे. शहरवासियांनी नळपट्टी तसंच घरपट्टी थकबाकी, चालू मागणीसह एकरकमी भरल्यास, मालमत्ताकराच्या थकबाकीवरच्या दंडात ५० टक्के तर नळपट्टी थकबाकीवरच्या दंडात १०० टक्के सूट जाहीर केली आहे. १५ मार्च पर्यंत ही योजना सूरू राहिल.

****

मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं नांदेडच्या कवयिञी लीला धनपलवार यांच्या नावानं देण्यात येणारा विशेष काव्यपुरस्कार नांदेडचे कवी गोविंद कुळकर्णी यांना जाहीर झाला आहे. कुळकर्णी यांना १७ मार्च रोजी हा पुरस्कार देण्यात येणार आहे. ११ हजार रुपये रोख, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.

//***********//


No comments:

Post a Comment