Friday, 29 March 2019

Text - AIR News Bulletin, Aurangabad 29.03.2019....Bulletin at 20.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 March 2019

Time 20.00 to 20.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ मार्च २०१९ - २०.००

****

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली, मराठवाड्यातल्या औरंगाबाद आणि जालना वगळता सहा मतदार संघांमध्ये दुसऱ्या टप्प्यात अठरा एप्रिलला मतदान होणार आहे.

नांदेड मतदार संघातून एकूण ४१ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले, आता या मतदार संघात काँग्रेसचे अशोक चव्हाण, भाजपचे प्रतापराव पाटील चिखलीकर, वंचित बहुजन आघाडीचे यशपाल भिंगे यांच्यासह १४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

हिंगोलीतून सेना भाजप युतीचे हेमंत पाटील, काँग्रेसचे सुभाष वानखेडे, आणि वंचित बहुजन आघाडीचे मोहन राठोड यांच्यासह २८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

परभणीतून शिवसेनेचे संजय जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर, वंचित बहुजन आघाडीचे आलमगीर मोहम्मद खान, भाकपचे राजन क्षीरसागर यांच्यासह १७ उमेदवार,

बीडमधून भाजपच्या डॉ.प्रीतम मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे, यांच्यासह ३६ उमेदवार,

लातूरमध्ये भाजपचे सुधाकर श्रृंगारे, काँग्रेसचे मच्छिंद्र कामंत, वंचित बहुजन आघाडीचे राम गारकर, आणि बसपाचे सिद्धार्थ सूर्यवंशी, यांच्यासह १० उमेदवार, 

उस्मानाबादमध्ये शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राणा जगजितसिंह पाटील, वंचित बहुजन आघाडीचे अर्जून सलगर, बसपाचे शिवाजी ओमन यांच्यासह १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

****

या दुसऱ्या टप्प्यातल्या उर्वरित मतदार संघांपैकी अमरावती मतदार संघातून सेना भाजप युतीचे आनंदराव अडसूळ आणि काँग्रेस आघाडीच्या नवनीत राणा, बुलडाण्यातून सेना भाजप युतीचे प्रतापराव जाधव आणि काँग्रेस आघाडीचे राजेंद्र शिंगणे, अकोल्यातून सेना भाजप युतीचे संजय धोत्रे, काँग्रेस आघाडीचे हिदायत पटेल आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, तर सोलापुरातून भाजप सेना युतीचे जय सिद्धेश्वर स्वामी, काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, यांच्यात मुख्य लढत होणार आहे.

****

भारतीय कम्युनिस्ट पक्षानं लोकसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा आज प्रसिद्ध केला. पक्षाचे सचिव डी राजा यांनी नवी दिल्लीत याबाबत अधिक माहिती दिली. स्वामिनाथन समितीच्या शिफारशी, शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव, अनुसूचित जाती जमातींसाठी कल्याणकारी योजना, बेरोजगारी भत्ता, आदी मुद्यांचा या जाहीरनाम्यात समावेश आहे.

****

पाटीदार नेता हार्दिक पटेल यांना गुजरातमधून लोकसभा निवडणूक लढवता येण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. पटेल यांच्यावर २०१५ मध्ये दंगल भडकावल्याचा गुन्हा सिद्ध झाला आहे. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका गुजरात उच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली. गुजरात सरकारच्या वकिलांनी यासंदर्भात युक्तिवाद करताना, हार्दिक यांच्याविरोधात विविध ठिकाणी १७ गुन्ह्यांची नोंद असून, यापैकी दोन गुन्हे देशद्रोहाचे असल्याचं सांगितलं. गुजरातमध्ये अर्ज भरण्याची मुदत चार एप्रिलला संपत आहे. त्यापूर्वी पटेल यांना, सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी दाद मागून, संबंधित प्रकरणी स्थगिती आदेश मिळवणं कठीण असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी निवडणूक आयोगानं कला, क्रीडा, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातल्या बारा जणांची ‘सदिच्छादूत’ म्हणून नियुक्ती केली आहे. या मध्ये अणुशास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, डॉ.निशिगंधा वाड, उषा जाधव, क्रिकेटपटू स्मृती मानधना, धावपटू ललिता बाबर, जलतरणपटू वीरधवल खाडे, नेमबाज राही सरनोबत, तृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत तसंच दिव्यांग कार्यकर्ता नीलेश सिंगीत यांचा समावेश आहे.

****

उमेदवारांनी माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समिती कडून प्रमाणित केलेली जाहिरात प्रकाशित करावी, असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी केलं आहे. उमेदवारांकडून प्रसारित होणाऱ्या, कोणत्याही माध्यम प्रकारातल्या जाहिरात मजकूरांचं प्रमाणीकरण आणि त्यावर देखरेख ठेवण्यासाठी ही समिती गठीत करण्यात आली आहे.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या किनवटचे नगराध्यक्ष, तसंच नगर परिषदेच्या दोन कर्मचाऱ्यांविरूद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आचारसंहिता लागू असताना नगरपालिकेच्या नवीन टॅक्ट्ररचं लोकार्पण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मतदारसंघात, आचारसंहिता भंगाचा, दाखल झालेला हा दुसरा गुन्हा आहे.

****

No comments:

Post a Comment