Wednesday, 1 May 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 01.05.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 May 2019

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ मे २०१ सकाळी ७.१० मि.

****



Ø  राज्य वर्धापनदिनाचा आज सर्वत्र उत्साह

Ø  राज्यातल्या भीषण दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी निवडणूक आचारसंहिता शिथील करण्याची मुख्यमंत्र्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Ø  वर्ध्याच्या प्रचारसभेत भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केलं नसल्याचं निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण

आणि

Ø  तथाकथित आध्यात्मिक गुरु नारायण साई याला सुरत सत्र न्यायालयाची आजन्म तुरुंगवासाची शिक्षा

****



 महाराष्ट्र राज्याचा वर्धापन दिन आज सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. या निमित्तानं सर्वत्र ध्वजारोहणासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. औरंगाबाद इथं राज्याचे परीवहन मंत्री दिवाकर रावते, नांदेड इथं पालकमंत्री रामदास कदम, बीड इथं पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या तर लातूर इथं पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते आज मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे.



 जागतिक कामगार दिवसही आज पाळला जात आहे. कामगारांना त्यांच्या न्याय्य हक्कांची जाणीव करून देण्याच्या उद्देशानं हा दिवस पाळला जातो.

****



 राज्यातल्या भीषण दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी निवडणूक आयोगानं राज्यातली आचारसंहिता शिथील करावी अशी मागणी करणार एक पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल निवडणूक आयोगाकडे दिलं आहे. राज्यात १० मार्चपासून लागू असलेली आचारसंहिता राज्यातल्या लोकसभेच्या सर्व जागांचं मतदान सपलं असल्यामुळे ती शिथिल करण्याची मागणी करण्यात आली आहे. राज्य सरकारनं राज्यातल्या १५१ तालुक्यांना दुष्काळग्रस्त म्हणून यापूर्वीच घोषित केलं आहे तसंच दुष्काळ निवारणासाठी चार हजार ७१४ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. दुष्काळी परिस्थितीचं गांभिर्य बघता उपाययोजना करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी या पत्रात नमूद केलं आहे. ग्रामीण भागातल्या रूग्णालयांसाठी तपासणी उपकरणांच्या निविदा मागवण्याच्या आदेशाला अंतिम स्वरूप देण्याची परवानगी देखील मुख्यमंत्र्यांनी या पत्राद्वारे निवडणूक आयोगाला मागितली आहे. ग्रामीण भागात या उपाययोजनांची अधिक निकड असल्याचं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.

****



 भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरूद्ध आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केल्याची तक्रार निवडणूक आयोगानं फेटाळून लावली आहे. राज्यातल्या वर्धा इथं केलेल्या प्रचार सभेत पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन करणारं वक्तव्य केल्याची तक्रार काँग्रेस पक्षानं निवडणूक आयोगाकडे केली होती. आयोगानं या प्रकरणाचा तपास करून मोदी यांनी आपल्या या भाषणात  आचारसंहितेचं उल्लंघन केलं नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

****



 केंद्रीय निवडणूक आयोगानं भारतीय जनता पक्षाचे गुजरातचे प्रदेशाध्यक्ष जितुभाई वगानी यांच्यावर ७२ तासांची तर उत्तरप्रदेशातले समाजवादी पक्षाचे नेते आजमखान यांच्यावर ४८ तासांची निवडणूक प्रचार बंदी घातली आहे. जितुभाई यांनी सुरत मधील अमरोली इथंल्या सभेला संबोधित करतांना अपमानाकारक शब्दांचा वापर केल्यामुळे तर आजमखान यांनी उत्तर प्रदेशातल्या निवडणूक अधिकाऱ्यांविरूद्ध  धर्मविषयक तसंच चिथावणीखोर भाषण केल्याबद्दल ही बंदी घातली आहे. आजमखान यांच्यावर या महिन्यात दुसऱ्यांदा अशी बंदी घालण्यात आली आहे.

****



 राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणातल्या सर्व पुनर्विचार याचिकांवर सर्वोच्च न्यायालय येत्या सहा मे रोजी सुनावणी घेणार आहे. यासंदर्भात केंद्र सरकारनं चार मे पर्यंत आपलं म्हणणं दाखल करावं, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं काल दिले. १४ डिसेंबर २०१८ रोजी न्यायालयानं, या खरेदी प्रकरणी दाखल सर्व याचिका निकाली काढत, हा व्यवहार पारदर्शक असल्याचा निर्णय दिला होता. मात्र माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, अरुण शौरी, ज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत भूषण यांच्यासह अनेकांनी या निर्णयावर फेरविचार याचिका दाखल केल्या आहेत. 

****



 केंद्रीय गृहमंत्रालयाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना नागरिकत्वाच्या मुद्द्यावरुन नोटीस बजावली आहे. गांधी यांनी ‘ब्लॅक ऑप्स लिमिटेड’ या कंपनीच्या कागदपत्रांवर आपण ब्रिटीश नागरिक असल्याचं म्हटल्याचा, त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी, गृह मंत्रालयानं राहुल गांधी यांचं नागरिकत्व रद्द करावं, अशी मागणी भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे. या तक्रारीच्या आधारे राहुल गांधी यांना बजावण्यात आलेल्या नोटीसमध्ये, पंधरा दिवसांच्या मुदतीत यासंदर्भात माहिती सादर करण्यास सांगितलं आहे.



 दरम्यान, राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाबाबतचा वाद म्हणजे, सध्याच्या मुद्यांवरून लक्ष विचलित करण्याच्या प्रयत्न असल्याचं, काँग्रेस पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांच्यासह इतर नेत्यांनी, म्हटलं आहे.

****



 पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात दाखल आचारसंहिता भंगाच्या तक्रारींवर निर्णय घेण्यास, निवडणूक आयोग सक्षम असल्याचं, सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. काँग्रेसच्या खासदार सुश्मिता देव यांनी ही तक्रार दाखल केली आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं, निवडणूक आयोगाला आपलं म्हणणं मांडण्यास सांगितलं आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी गुरुवारी होणार आहे.

****



हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.

****



 तथाकथित आध्यात्मिक गुरु नारायण साई याला सुरत सत्र न्यायालयानं आजन्म तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. ऑक्टोबर २०१३ मध्ये दाखल लैंगिक अत्याचाराच्या एका प्रकरणात नारायण साई, गेल्या शुक्रवारी सुरत सत्र न्यायालयात दोषी ठरला. त्यानंतर न्यायालयानं काल त्याला ही शिक्षा सुनावली. नारायण साई हा तथाकथित आधात्मिक गुरु आसाराम याचा मुलगा आहे. आसारामही लैंगिक अत्याचार प्रकरणात गेल्या सुमारे सहा वर्षांपासून, जोधपूर तुरुंगात आहे.

****



 पालघर जिल्ह्यात पोलिसांनी सुमारे बारा लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. अहमदाबादहून गुटख्याची चोरटी वाहतुक होत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी, मुंबई- अहमदाबाद रस्त्यावर काल, आंबोळी गावाजवळ एका टॅम्पोतून हा गुटखा जप्त केला. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून, हे दोघे रायगड जिल्ह्यातल्या पनवेलचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांविरोधात अन्न सुरक्षा आणि प्रमाणन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. राज्यात गेल्या सात वर्षांपासून गुटखा निर्मिती, वाहतुक, साठवणूक आणि विक्रीवर बंदी आहे. गुटखा विक्री हा अजामीनपात्र गुन्हा असल्याचा निर्णय, राज्य सरकारनं गेल्या वर्षी  जारी केला आहे.

****



 महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीही मराठवाड्यातल्या सुमारे वीस गावांमध्ये अभिनेता आमीर खान यांच्या पाणी फाऊंडेशन संस्थेच्या वतीनं महाश्रमदान आयोजित करण्यात आलं आहे. मराठवाडा विभागाला दुष्काळमुक्त करून एक जलक्रांती विभाग बनवण्यासाठी शहरी भागातल्या नागरिक, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं या महाश्रमदानात सहभागी होण्याचं आवाहन पाणी फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आलं आहे.

****



 भारतीय माध्यमिक शिक्षण प्रमाणपत्र – आयसीएसई परिषदेनं गेल्या मार्च महिन्यात घेतलेल्या १० वी आणि १२ च्या परिक्षांचे निकाल येत्या ७ मे रोजी जाहीर होणार असल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं आहे. दुपारी तीन वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर हा निकाल जाहीर होणार असल्याचं पीटीआयच्या वृत्तांत म्हटलं आहे.

****



 परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ तालुक्यात वाणीसंगम इथं गोदावरी नदी पात्रातून गेल्या तीन महिन्यापासून अवैध वाळू उपसा सुरु आहे. वाळूचा अवैध उपसा आणि अवैध वाहतूक थांबवावी, अशी मागणी, वाणी संगम इथल्या नागरिकांनी, परभणीच्या जिल्ह्याधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

****



 बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुक्यातल्या पवारवाडी इथल्या जय महेश साखर कारखान्याचं गोदाम तसंच, उत्पादन विभागासह कार्यालय सील करण्यात आलं आहे. गाळप हंगाम संपून महिना उलटला तरी या कारखान्यानं शेतकऱ्यांना रास्त दराप्रमाणे पैसे दिले नसल्याच्या कारणानं साखर आयुक्त आणि विभागीय आयुक्तांच्या आदेशावरून काल ही कारवाई करण्यात आली.

****



 दुष्काळात करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची पाहणी तसंच शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी काल उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उस्मानाबाद आणि कळंब तालुक्यातल्या विविध गावांना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेटी दिल्या. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार शासनाच्या विविध उपाययोजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या आहेत की नाही याची पाहणी यावेळी करण्यात आल्याचं या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.

****



 भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ नेते, गंगापूर नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष जोरावर खान यांचं काल दुपारी गंगापूर इथं निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. भूमिहीन, सालदार, शेतमजूरांच्या अनेक लढ्यात ते सहभागी झाले होते. त्यांच्या पार्थिवावर काल रात्री गंगापूर इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.

****



 नांदेड जिल्ह्यातल्या माहूर तालुक्यातल्या सारखणी इथं वन विभागानं सापळा रचून काल दोन मांडूळ प्रजातींचे साप ताब्यात घेतले. या सापांची किंमत दोन ते अडीच कोटी रूपये एवढी आहे. या प्रकरणी एका महिलेसह सहा जणांना वन विभागानं अटक केली आहे.

****



 चंद्रपूर इथल्या महाकाली देवीचं दर्शन घेऊन परत येत असतांना यवतमाळ जिल्ह्यातल्या मारेगावजवळ झालेल्या भीषण अपघातात नववधूसह तीन महिला ठार, तर आठजण जखमी झाले. अपघातातले मयत हे हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूरचे रहिवासी आहेत. काल पहाटे हा अपघात झाला.



 अन्य एका अपघातात नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातल्या घारगाव शिवारात काल एका अज्ञात वाहनानं दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीहून प्रवास करणाऱ्या तीन जणांचा मृत्यू झाला. अपघातात मृत्यू झालेली तिघेही पुणे जिल्ह्यात वाहनांवर चालक म्हणून काम करत होते, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 नांदेड- मुंबई- नांदेड तपोवन एक्सप्रेस आणि मनमाड- धर्माबाद- मनमाड मराठवाडा एक्सप्रेस या दोन रेल्वे गाड्यांना आजपासून ३१ मे पर्यंत वातानुकुलित द्वितीय श्रेणीचा एक अतिरिक्त डबा जोडला जाणार आहे.

*****

***

No comments:

Post a Comment