▼

Tuesday, 2 April 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 02.04.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद



०२ एप्रिल  २०१९ सकाळी ११.०० वाजता

****



 लोकसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्प्यासाठीची अधिसूचना आज जाहीर होणार आहे. या टप्प्यात येत्या 9 तारखेपर्यंत अर्ज दाखल करता येणार असून, 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या चौथ्या टप्प्यात नाशिक लोकसभा मतदार संघातही मतदान होणार आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.  उमेदवारी अर्ज दाखल करताना, सीसीटीव्हीची करडी नजर असेल असं त्यांनी यावेळी सांगितलं.

****



 लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध करण्याची शक्यता आहे. पक्षाच्या दिल्लीत इथल्या मुख्यालयात पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी स्वत: जाहीरनामा प्रसिद्ध करतील, असं पीटीआयचं वृत्त आहे. माजी अर्थमंत्री पी चिदंबरम् यांच्या अध्यक्षतेखालच्या एका समितीनं हा जाहीरनाम तयार केला आहे. या जाहीरनाम्यातून कोणा एका व्यक्तीची मतं नव्हे, तर जनतेचा आवाज ध्वनित होईल, असं राहुल गांधी यांनी म्हटल्याचं, या वृत्तात म्हटलं आहे.

****



 पंतप्रधानांच्या जातीयवादी भाषणांविरोधात निवडणूक आयोगानं तत्काळ कारवाई करायला हवी, असं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी यांनी म्हटलं आहे. यासंबंधी केलेल्या एका ट्वीटमध्ये येचुरी यांनी ही मागणी केली आहे. उपग्रहरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतल्यावर, पंतप्रधानांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणावरही येचुरी यांनी आक्षेप घेतला होता. पंतप्रधानांची ही भाषणं म्हणजे आदर्श आचारसंहितेचा भंग असल्याचं, येचुरी यांनी म्हटलं आहे.

****



 मागील आठवड्यात भारताने केलेल्या अँटीसॅट मिशन शक्ती या अभियानात उपग्रहाचे ४०० तुकडे झाले. या तुकड्यामुळे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला मोठा धोका निर्माण झाला असल्याचं, नासा या अमेरिकन संस्थेनं म्हटलं आहे. यापैकी ६० तुकडे शोधण्यात नासाला आतापर्यंत यश आलं असून, यापैकी २४ तुकड्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला धोका असल्याचं नासाचं मत आहे. नासा अजूनही मोठ्या तुकड्यांचा शोध घेत असल्याचं या बातमीत म्हटलं आहे.

****



 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या प्रदर्शनासंदर्भात निर्णय देण्यापूर्वी, निवडणूक आयोगाला या प्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या उत्तराची प्रतीक्षा आहे. विरोधी पक्षांनी आयोगाकडे तक्रार करून, या चित्रपटाचं प्रदर्शन रोखण्याची मागणी केली आहे. हा चित्रपट येत्या शुक्रवारी पाच एप्रिलला प्रदर्शित होत असून, चित्रपटाच्या निर्मात्यांनी निवडणूक आयोगासमोर आपली बाजू यापूर्वीच मांडली आहे. भाजपच्या महासचिवांनी यासंदर्भात आपली भूमिका मांडल्यावर, आयोग या प्रकरणी निर्णय सुनावेल, असं या संदर्भातल्या एका समितीच्या अधिकाऱ्यांनं सांगितलं.

****



 2019-20 या नवीन आर्थिक वर्षाचं पहिलं द्विमासिक आर्थिक धोरण ठरवण्यासाठी आज भारतीय रिजर्व्ह बँकेच्या अर्थ विषयक समितीची पहिली बैठक सुरू होत आहे. ही बैठक येत्या गुरुवार पर्यंत चालणार असून, गुरुवारी ही समिती आपले या वर्षीचे पहिले द्विमासिक आर्थिक धोरण जाहीर करेल, असं रिजर्व्ह बँकेच्या प्रवक्त्यानं सांगितलं. या धोरणात बँक आपल्या व्याजदरात पाव टक्के कपात करेल अशी आशा उद्योग जगत आणि अर्थतज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

****



 मुंबईत छत्रपती शिवाजी टर्मिनल इथं झालेल्या पादचारी पुल दुर्घटना प्रकरणी मुंबई महानगर पालिकेच्या सहाय्यक अभियंत्याला अटक करण्यात आली आहे. एस एफ काकुळते असं त्यांचं नाव असून, त्यांना काल रात्री अटक करण्यात आली, असं मुंबई पोलिसांच्या प्रवक्याने सांगितलं. ही या प्रकरणातील दुसरी अटक आहे. १४ मार्च रोजी झालेल्या या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू तर ३१ लोक जखमी झाले होते.

****

 अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमदनगर जिल्हा परिषदेचे ज्येष्ठ सदस्य शिवाजीराजे गाडे यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं. ते ५४ वर्षांचे होते. काल दिवसभर गाडे हे काँग्रेस आघाडी उमेदवाराच्या प्रचारात सहभागी झाले होते. रात्री तीन वाजता त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला, त्यात त्यांचं निधन झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं. गाडे यांच्या पार्थिव देहावर आज त्यांच्या गावी बारागाव नांदूर इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राहुरी पंचायत समितीचे माजी सभापती असलेले गाडे यांनी मुळा-प्रवरा सहकारी वीज संस्थेचे अध्यक्ष, राहुरी कारखान्याचे उपाध्यक्ष, आदी पदांची जबाबदारीही  सांभाळली होती.

*****

***

No comments:

Post a Comment