▼

Wednesday, 24 April 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 24.04.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

मराठी बातमीपत्र

२४ एप्रिल  २०१९ सकाळी ११.०० वाजता

****



 राज्यातल्या सतरा मतदारसंघात चौथ्या टप्प्यातलं मतदान येत्या २९ एप्रिलला होणार असून या सर्वच ठिकाणी आता प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रचारासाठी विविध राजकीय पक्षांच्या महत्वाच्या नेत्यांच्या सभा आणि मेळावे यांचं आयोजन करण्यात येत आहे.

****



 लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्जांची छाननी आज होणार आहे. या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा काल शेवटचा दिवस होता. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत येत्या शुक्रवारपर्यंत आहे. या टप्प्यात सात राज्यांमधल्या 59 लोकसभा मतदारसंघामधे येत्या 12 मे रोजी मतदान होणार आहे.

****



 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना, राफेल प्रकरणातल्या न्यायालयाच्या निर्णयासंदर्भात केलेल्या चुकीच्या वक्तव्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयानं फौजदारी अवमान नोटिस पाठवली आहे. याशिवाय, भाजपा खासदार मीनाक्षी लेखी यांनी गांधी यांच्या विरोधात दाखल केलेली फौजदारी अवमान याचिका बंद करावी, ही काँग्रेस अध्यक्षांची मागणीही न्यायालयानं फेटाळली असून, लेखी यांच्या याचिकेवर येत्या तीस तारखेला सुनावणी होईल, असं न्यायालयानं म्हटलं आहे.

****



 ईशान्य भारतातल्या अरुणाचल प्रदेश आणि आसाम या राज्यांच्या सीमावर्ती भागांमध्ये आज पहाटे पावणेदोन वाजता भूकंपाचा धक्का बसला. रिश्टर स्केलवर या धक्क्याची तीव्रता सहा पूर्णांक एक इतकी नोंदली गेली. त्यानंतर सकाळी सहा वाजता तिबेटमध्ये एक आणि सव्वासहाच्या सुमाराला नेपाळमध्येही थोड्या कमी तीव्रतेचे दोन धक्के जाणवले. या धक्क्यांमध्ये जीवित किंवा वित्तहानीचं वृत्त आलेलं नाही.

****



 पाकिस्तानला धडा शिकवण्याबाबतच्या पंतप्रधानांच्या वक्तव्यांचा आता कंटाळा आला असून, पंतप्रधान देशातल्या लोकांशी संबंधित मुद्द्यांवर कधी बोलणार आहेत, असा प्रश्न काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी विचारला आहे. आज केलेल्या अनेक ट्विट संदेशांतून, चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली असून, पंतप्रधानांनी आता, त्यांच्या पक्षाच्या नेत्यांकडून दिल्या जात असलेल्या प्रक्षोभक भाषणांबद्दलही बोलावं, असं म्हटलं आहे.

****



 काल पार पडलेल्या तिसऱ्या टप्प्यातल्या मतदानामध्ये राज्यात कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघांमध्ये सर्वाधिक मतदान झाल्याचं स्पष्ट झालं आहे. कोल्हापूर मतदारसंघात सत्तर पूर्णांक चव्वेचाळीस तर हातकणंगल्यात एकोणसत्तर पूर्णांक पंचाहत्तर  टक्के इतकं मतदान झालं आहे. मात्र, धामणी खोऱ्यातल्या पंचवीस हजारहून जास्त मतदारांनी पाणी टंचाईच्या मुद्द्यावरून मतदानावार बहिष्कार घातला होता, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 भुसावळ मतदारसंघातल्या एका मतदानकेंद्रावरच्या मतदान यंत्रावर घेतलेला आक्षेप चुकीचा निघाल्यामुळे, आक्षेप घेणाऱ्या अमोल सुरवाडे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 नांदेड इथले प्रसिद्ध व्यावसायिक आणि भारत विद्यालयाचे माजी सचीव हरिभाऊ कोटगिरे यांचं काल निधन झालं. ते पंच्याऐंशी वर्षांचे होते. जनकल्याण समितीचे कोषाध्यक्ष तसंच विश्व हिंदू परिषदेचे नांदेड शहराध्यक्ष अशी पदंही त्यांनी भूषवली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते स्वयंसेवक होते.

****



 कमळाचं चित्र असलेली साडी परिधान करून लोकसभेसाठी मतदान केल्याबद्दल सांगलीच्या महापौर संगिता खोत यांच्यावर काल रात्री आचार संहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. भाजपच्या निवडणूक चिन्हाचा त्यांनी प्रचार केला, अशी तक्रार प्रशासनाला मिळाल्यानंतर निवडणूक आयोगानं खोत यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 ज्येष्ठ पुरातत्वतज्ज्ञ, इतिहास संशोधक आणि लेखक मधुकर श्रीपाद माटे यांचं काल रात्री पुण्यात निधन झालं. ते नव्वद वर्षांचे होते. ज्येष्ठ साहित्यिक आणि समाज सुधारक श्री.म.माटे यांचे ते पुत्र होते.

****



 भारता सोबतच्या राजनैतिक संबंधांच्या सत्तराव्या वर्धापनदिनानिमित्त इंडोनेशिया या देशानं, पुरातन भारतीय महाकाव्य रामायणावर आधारित एक टपाल तिकीट जारी केलं आहे. भारतीय राजदूत प्रदीप कुमार रावत आणि इंडोनेशियाचे उप परराष्ट्रमंत्री  अब्दुर्रहमान मोहम्म

द फाकिर यांच्या उपस्थितीत या विशेष स्मारक तिकिटाचं उद्घाटन झालं.रामायणातला, सीताहरणाच्या वेळी जटायूनं रावणाला केलेल्या विरोधाचा प्रसंग या तिकिटावर चित्रित करण्यात आला आहे.

*****

***

No comments:

Post a Comment