आकाशवाणी औरंगाबाद
मराठी बातमीपत्र
२९ एप्रिल २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात ९
राज्यातल्या ९१ लोकसभा मतदारसंघात मतदानास
सकाळी सात वाजता सुरूवात झाली. यामध्ये राज्यातल्या मुंबई मधल्या सहा मतदार संघांसह ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडी,
धुळे, नंदुरबार, नाशिक, दिंडोरी, शिर्डी, मावळ आणि शिरूर या १७ लोकसभा मतदार संघांचा
समावेश आहे. या टप्प्यात भाजप नेत्या पूनम महाजन, शिवसेनेचे अरविंद सावंत,
काँग्रेसचे मिलिंद देवरा, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष
भामरे, हीना गावित, समीर भुजबळ,
पार्थ पवार यांच्यासह राज्यातल्या १७ मतदार संघातल्या एकूण ३२३ उमेदवारांचं राजकीय
भवितव्य आज मतदार
यंत्रात बंद होईल.
या १७ मतदारसंघात तीन कोटी, ११ लाख, ब्याण्णव हजार,
८२३ मतदार आहेत. मतदानाचा टक्का वाढवण्याच्या दृष्टीनं निवडणूक आयोगानं विविध उपक्रम
राबवले आहेत. दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर जाण्यासाठी सोयीच्या दृष्टीनं वाहतुकीची
व्यवस्था करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं प्रत्येक विधानसभा
मतदारसंघात एक सखी मतदान केंद्र असणार आहे.
****
राज्यातल्या सतरा लोकसभा
मतदारसंघात सकाळी नऊ वाजेपर्यंत सरासरी सुमारे सात टक्के मतदान झालं आहे. नंदुरबार
इथं नऊ वाजेपर्यंत ८ पूर्णाक ७३ दशांश टक्के , धुळे ६ पूर्णाक ३१ दशांश टक्के, दिंडोरी
७ पूर्णाक २८, नाशिक ६ पूर्णाक ६९, पालघर ७
पूर्णाक ८६, भिंवडी ६ पूर्णांक २१ , कल्याण ५ टक्के, ठाणे ६ पूर्णाक ७७, मावळ ६ पूर्णाक
६७, शिरुर ७ पूर्णांक ७, तर शिर्डी मतदार संघात सकाळी नऊ वाजेपर्यंत ७ पूर्णांक २८
शतांश टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. मुंबई दक्षिण मध्य मतदार संघात सकाळी नऊ वाजेपर्यंत
सहा पूर्णांक ४४ शतांश टक्के, मुंबई दक्षिण ६ टक्के, मुंबई उत्तर पश्चिम सात टक्के, मुंबई उत्तर पूर्व सात टक्के, मुंबई पूर्व मध्य
सहा टक्के, तर उत्तर मुंबई मतदार संघात सात दशांश ८५ शतांश टक्के मतदानाची नोंद झाली
आहे.
या सर्व मतदार संघात दिग्गजांनी आज सकाळीसच आपापल्या
मतदान केंद्रावर जावून मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी
तथा अपर मुख्य सचिव अश्वनी कुमार, ज्येष्ठ अणू शास्त्रज्ञ तसंच निवडणूक आयोगाचे ब्रँड
एम्बेसेडर डॉ अनिल काकोडकर, भाजप नेत्या पूनम महाजन, विनोद तावडे, धुळे मतदार संघातले
उमेदवार केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भामरे, तसंच अपक्ष उमेदवार अनिल गोटे, माजी मंत्री
तथा नवापूर चे आमदार सुरुपसिंग नाईक, विधान परिषद आमदार अमरीशभाई पटेल, नाशिकचे पोलिस
आयुक्त विश्वास नांगरे पाटील, ज्येष्ठ उद्योजक अनिल अंबानी, यांच्यासह अनेक मान्यवरांचा
समावेश आहे.
लोकसभा निवडणुकीत आज मतदानाचा चौथा टप्पा पूर्ण झाल्यावर,
राज्यातल्या ४८ मतदार संघांमधलं मतदान पूर्ण होईल. देशात अजून तीन टप्प्यात, येत्या
६ मे, १२ मे आणि १९ मे रोजी मतदान होणार असून, त्यानंतर २३ मे रोजी देशभरात मतमोजणी
आणि निवडणूक निकाल जाहीर होईल.
****
लोकसभा निवडणुकीतील निकालाची पैज लावणाऱ्या सांगली
जिल्ह्यातल्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. शिपूर इथले रणजीत देसाई आणि विजयनगर
इथले राजकुमार लहू कोरे यांनी, निवडणूक निकालावर एक लाख रुपयांची पैज लागली होती. त्यासाठी या दोघांनी केलेला
लेखी करार हा, मुंबई जुगार प्रतिबंधक अधिनियम
प्रमाणे एक प्रकारचा सट्टा असल्याने, मिरज ग्रामीण पोलिसांनी या दोघांना अटक केली.
या दोघांनीही आपापल्या बँक खात्यांचे एक लाख रुपयांचे धनादेश मध्यस्थाकडे देऊन ठेवले
असल्याची माहिती, आमच्या वार्ताहरानं कळवली आहे.
****
देशभरात उष्णतेची लाट असून राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यात
हवामान विभागानं उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
राज्यात काल मराठवाड्यातल्या परभणी, विदर्भातल्या
अकोला आणि चंद्रपूर इथं सर्वाधिक ४७ पूर्णांक २ अंश सेल्सियस तापमानाची नोंद केली आहे. अमरावती ४५ पूर्णांक आठ, जळगाव
४५ पूर्णांक ऐवढी नोंद झालेली आहे.
*****
***
No comments:
Post a Comment