Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 April 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक २९ एप्रिल २०१९ दुपारी १.०० वा.
****
देशभरात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या
टप्प्यात आज नऊ राज्यातल्या ७२ जागांवर मतदान होत आहे. सकाळी अकरा वाजेपर्यंत या चौथ्या
टप्प्यात देशभरातल्या ७२ मतदार संघात सरासरी २२ टक्के मतदान झालं. यामध्ये पश्चिम बंगालमध्ये
सर्वाधिक ३५ टक्के तर जम्मू काश्मीरमध्ये सर्वात कमी चार टक्के मतदानाची नोंद झाली.
झारखंड आणि राजस्थान मध्ये प्रत्येकी २९ टक्के, मध्यप्रदेशात २७ टक्के, उत्तर प्रदेशात
२१ टक्के, ओडिशात २० टक्के, बिहारमध्ये १८ टक्के तर, महाराष्ट्रात १५ टक्के मतदान नोंदवलं
गेलं.
राज्यातल्या मुंबईमधल्या सहा मतदार संघांसह ठाणे,
कल्याण, पालघर, भिवंडी, धुळे, नंदुरबार, नाशिक, दिंडोरी, शिर्डी, मावळ आणि शिरूर या
१७ लोकसभा मतदारसंघांत सकाळी अकरा वाजेपर्यंत सरासरी १५ टक्के मतदान झालं. यापैकी पालघर
मतदार संघात सुमारे २० टक्के, ठाणे १३, भिवंडी १४, तर कल्याण मतदार संघात अवघं सात
टक्के मतदानाची नोंद झाली.
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्र
नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पर्यटन मंत्री
जयकुमार रावल, नंदूरबारच्या भाजप महायुतीच्या उमेदवार हीना गावीत, यांच्यासह विविध
राजकीय पक्षांच्या नेत्यांनी, आज सकाळी मतदान केलं. ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले,
प्रसिद्ध गीतकार गुलजार, जावेद अख्तर, अभिनेत्री शबाना आझमी, रेखा, माधुरी दीक्षित,
सोनाली बेंद्रे, आमीर खान, माधवन, यांच्यासह चित्रपट सृष्टीतल्या अनेकांनी आज आपापल्या
मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावला.
****
नाशिक आणि दिंडोरी मतदार संघात मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅट
चालत नसल्याच्या तसेच यंत्र बंद पडल्याच्या तक्रारीनंतर, या दोन्ही मतदार संघात सुमारे
75 यंत्रं बदलावी लागली, या सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. मतदार यादीत
नावं न सापडण्याचे किरकोळ प्रकार वगळता मतदान सुरळीत सुरू आहे. तुषार वाखारकर या सध्या
सॅन फ्रान्सिस्को येथे अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या नाशिककर मतदाराने खास मतदानासाठी
नाशिकला येऊन मतदानाचा हक्क बजावल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
जळगाव लोकसभा मतदार संघातल्या भडगाव इथल्या एका मतदान केंद्रावर आज फेरमतदान होत आहे. गेल्या मंगळवारी,
२३ तारखेला झालेल्या मतदानाच्या वेळेस चाचणी मतदान काढून
न टाकताच, मतदान घेण्यात आल्याचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर, निवडणूक निर्णय अधिकारी
डॉ. अविनाश ढाकणे यांनी मतदान केंद्रातल्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केलं होत. त्यामुळं
या केंद्रावर फेरमतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
****
बंगालच्या उपसागरात घोंघावत असलेलं फॅनी चक्रीवादळ
अधिकाधिक तीव्र होत आहे. सध्या ते ताशी २१ किलोमीटर वेगानं वायव्य दिशेकडे सरकत आहे.
या वादळामुळे केरळमधे आज आणि उद्या हलका ते मध्यम पाऊस पडू शकेल. काही ठिकाणी मुसळधार
पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशाच्या
किनारी भागातही पावसाची शक्यता आहे. ओडिशा किनारपट्टीवर गुरुवारी मध्यम स्वरुपाचा तर
शुक्रवारी मुसळधार पाऊस होण्याची शक्यताही हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मच्छिमारांना खोल समुद्रात न
जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान या वादळाच्या स्थितीवर सरकार
पूर्णपणे लक्ष ठेवून आहे. नौदल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाला सतर्कतेच्या सूचना
देण्यात आल्या आहेत.
****
रायगड जिल्ह्यातल्या
अनेक भागात काल तापमानानं उच्चांक गाठला. पोलादपूर तालुक्यातील लोहारमाळ इथं ४४ पूर्णांक
५ सेल्सिअस अंश तापमानाची नोंद झाली. मोठ्या प्रमाणावर झालेली वृक्षतोड हे कोकणातल्या
तापमान वाढीचं कारण असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
आईपीएल क्रिकेट स्पर्धेत
काल कोलकाता इथं झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघानं मुंबई इंडियन्स संघाचा
३४ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना कोलकाता संघानं २० षटकात २ गडी बाद २३२
धावांचा डोंगर उभारला. प्रत्त्युतरादाखल मुंबईला
२० षटकात ७ गडी बाद १९८ धावांपर्यंत मजल मारता आली. हार्दिक पांड्याने केवळ ३४ चेंडूत
९१ धावा केल्या. नाबाद ८० धावा आणि दोन गडी बाद करणाऱ्या रसेलला सामनावीर म्हणून गौरवण्यात
आलं. कालच्या दुसऱ्या एका सामन्यात रॉयल चेंलेजर्स बंगलोरचा १६ धावांनी पराभव करत दिल्ली
कॅपिटल्स संघ पुढच्या बाद फेरीसाठी पात्र ठरला. या स्पर्धेत आज सनरायजर्स हैद्राबाद
आणि किंग्जस इलेवन पंजाब यांच्यात हैद्राबाद इथं रात्री ८ वाजता सामना खेळला जाणार
आहे.
*****
***
No comments:
Post a Comment