Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 April 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३०
एप्रिल २०१९ सायंकाळी ६.००
****
देशातल्या
उच्च शिक्षण व्यवस्थेत आमुलाग्र बदलाची गरज उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी
व्यक्त केली आहे. ते आज नवी दिल्लीत शिक्षण-उद्योजकता आणि नैतिकता या विषयावर एका कार्यक्रमात
बोलत होते. विचार आणि रचनात्मकतेचा वापर करून अभ्यासक्रमात बदल केला पाहिजे, असं सांगतानाच
उपराष्ट्रपतींनी, शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासावर भर द्यावा,
आणि खासगी शिक्षण संस्थांमध्ये कौशल्य विकास केंद्र असणं बंधनकारक करावं, असं म्हटलं
आहे.
****
राफेल
लढाऊ विमान खरेदी प्रकरणातल्या सर्व पुनर्विचार याचिकांवर सर्वोच्च न्यायालय येत्या
सहा मे रोजी सुनावणी घेणार आहे. यासंदर्भात केंद्र सरकारनं चार मे पर्यंत आपलं म्हणणं
दाखल करावं, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. १४ डिसेंबर २०१८ रोजी न्यायालयानं,
या खरेदी प्रकरणी दाखल सर्व याचिका निकाली काढत, हा व्यवहार पारदर्शक असल्याचा निर्णय
दिला होता. मात्र माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, अरुण शौरी, ज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत
भूषण यांच्यासह अनेकांनी या निर्णयावर फेरविचार याचिका दाखल केल्या आहेत.
****
काँग्रेस अध्यक्ष
राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाबाबतचा वाद म्हणजे, सध्याच्या मुद्यांवरून लक्ष विचलित
करण्याच्या प्रयत्न असल्याचं, काँग्रेस पक्षानं म्हटलं आहे. भाजप खासदार सुब्रह्ममण्यम्
स्वामी यांच्या तक्रारीवरून केंद्रीय गृहमंत्रालयाने, राहुल गांधी यांना नोटीस बजावून,
पंधरा दिवसांत याबाबत सत्य माहिती सांगण्याचे निर्देश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर
पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांच्यासह इतर नेत्यांनी, हा वाद म्हणजे, ज्वलंत
मुद्यांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न असल्याचं, म्हटलं.
****
शारदा
चिटफंड घोटाळा प्रकरणी, कोलकत्याचे माजी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांची न्यायालयीन
कोठडी हवी असेल, तर केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबाआयनं आणखी पुरावे सादर करावेत, असं
सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. यासंदर्भात पुरावे उद्या पुरावे सादर करु, असं सीबीआयच्या
महाधिवक्त्यानी आज न्यायालयात सांगितलं.
****
पायाभूत
सुविधा क्षेत्रात मार्च महिन्यात चार पूर्णांक सात दशांश टक्के वाढ झाल्याचं, या संबंधीच्या
अहवालात म्हटलं आहे. गेल्या वर्षात या कालावधीतल्या वाढीच्या तुलनेत हे प्रमाण शून्य
पूर्णांक वीस शतांश टक्क्यांनी अधिक आहे. २०१८ - १९ या संपूर्ण आर्थिक वर्षात पायाभूत
क्षेत्रातल्या सर्व, म्हणजे कोळसा, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, खतं, सिमेंट आणि ऊर्जा
निर्मिती या क्षेत्रांचा एकूण विकास दर चार पूर्णांक तीन दशांश टक्के राहिल्याचं, पीटीआयच्या
वृत्तात म्हटलं आहे.
****
तथाकथित आध्यात्मिक गुरु
नारायण साई याला सुरत सत्र न्यायालयानं आजन्म तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. ऑक्टोबर
२०१३ मध्ये दाखल लैंगिक अत्याचाराच्या एका प्रकरणात नारायण साई, गेल्या शुक्रवारी सुरत
सत्र न्यायालयात दोषी ठरला. त्यानंतर न्यायालयानं आज त्याला ही शिक्षा सुनावली. नारायण
साई हा तथाकथित आधात्मिक गुरु आसाराम याचा मुलगा आहे. आसारामही लैंगिक अत्याचार प्रकरणात
गेल्या सुमारे सहा वर्षांपासून, जोधपूर तुरुंगात आहे.
****
रत्नागिरी जिल्ह्यात खेड, चिपळूण, लांजा आणि राजापूर तालुक्यातल्या २० गावांमधल्या
४० वाड्यांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत
आहे. इथल्या नागरिकांना सध्या पाच टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. वाढण्याची
शक्यता असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
****
परभणी
जिल्ह्याच्या सोनपेठ तालुक्यात वाणीसंगम इथं गोदावरी नदी पात्रातून गेल्या तीन महिन्यापासून
अवैध वाळू उपसा सुरु आहे. वाळूचा अवैध उपसा आणि अवैध वाहतूक थांबवावी, अशी मागणी, वाणी
संगम इथल्या नागरिकांनी, परभणीच्या जिल्ह्याधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली
आहे.
****
नांदेड- मुंबई- नांदेड तपोवन एक्सप्रेस आणि मनमाड- धर्माबाद- मनमाड
मराठवाडा एक्सप्रेस या दोन रेल्वे गाड्यांना
उद्यापासून ३१ मे पर्यंत एक वातानुकुलित द्वितीय श्रेणीचा एक अतिरिक्त
डबा जोडला जाणार आहे.
****
राज्यात आलेली उष्णतेची
लाट आणखी दोन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं, विदर्भातल्या जवळपास
सगळ्याच शहरात पुढचे दोन दिवस उन अधिक राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. नागरिकांनी
वाढत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी आवश्यक उपाय करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment