Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 April 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक ३० एप्रिल २०१९ दुपारी १.०० वा.
****
केंद्रीय गृहमंत्रालयाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना नागरिकत्वाच्या
मुद्द्यावरुन नोटीस बजावली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचं नागरिकत्व आणि
शैक्षणिक पात्रतेचा मुद्दा अमेठीतल्या एका अपक्ष उमेदवाराने काही दिवसांपूर्वीच उपस्थित
केला होता. राहुल गांधी यांनी ‘ब्लॅक ऑप्स लिमिटेड’ या कंपनीच्या कागदपत्रांवर आपण
ब्रिटीश नागरिक असल्याचं म्हटल्याचा, त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी निवडणूक आयोगाने
राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवला होता.
मात्र, भारतात दुहेरी नागरिकत्व
बेकायदा असून या प्रकरणी, गृह मंत्रालयानं राहुल गांधी यांचं नागरिकत्व रद्द करावं,
अशी मागणी भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे. या तक्रारीच्या आधारे राहुल
गांधी यांना बजावण्यात आलेल्या नोटीसमध्ये, पंधरा दिवसांच्या मुदतीत यासंदर्भात सत्य
माहिती सादर करण्यास सांगितलं आहे.
****
संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी काल किर्गिस्तानमध्ये
बिश्केक इथं आयोजित शांघाय सहकारी संघटना - एससीओ या संरक्षण मंत्र्यांच्या परिषदेत
भाग घेतला. या परिषदेत, या क्षेत्रातली सुरक्षाविषयक
आव्हाने विकसित झाल्याच्या पार्श्वभूमीवर सदस्य देशांमध्ये संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य
वाढविण्याच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली.
दरम्यान, सीतारामन यांनी
चीन तसंच रशियाचे आपले समपदस्थ आणि किर्गिस्तानच्या सशस्त्र दलाच्या अधिकाऱ्यांसह द्विपक्षीय
बैठकाही केल्या. भारत २०१७ मध्ये एससीओचा
पूर्ण सदस्य बनला आहे.
****
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या फानी या चक्रीवादळाचा
फटका बसलेल्या चार राज्यांमध्ये मदत आणि बचावकार्य राबवण्यासाठी केंद्र सरकारनं एक
हजार शहाऐंशी कोटी रुपयांची अग्रीम आर्थिक मदत जारी केली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन
समितीच्या निर्णयानुसार हा निधी, राज्यांच्या आपत्ती निवारण कोषात जमा केला जाईल. यामध्ये
आंध्र प्रदेशासाठी दोनशे कोटी, ओडिशा तीनशे चाळीस कोटी, तामिळनाडू तीनशे नऊ कोटी तर
पश्चिम बंगालसाठी दोनशे पस्तीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
दरम्यान, आपदग्रस्तांच्या मदतीसाठी विशाखापट्टणम्,
चेन्नई तसंच अरककोणम इथं, नौदलाची सुसज्ज जहाजं तैनात करण्यात आली आहेत. नौदलाची विमानंही
नौदलाच्या विमानतळांवर पूर्ण तयारीत असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
शिर्डी इथं काल झालेल्या
विमान अपघात प्रकरणी स्पाईस जेट कंपनीनं विमानाच्या दोन्ही वैमानिकांना अंतर्गत चौकशी
पूर्ण होईपर्यंत निलंबित केलं आहे. काल सायंकाळी साडे चार वाजेच्या सुमारास दिल्लीहून
शिर्डीला आलेलं प्रवासी विमान धावपट्टीवरून घसरून किरकोळ अपघात झाला. विमानात १६४ प्रवासी
होते, सर्व प्रवासी सुखरुप असल्याचं, विमान कंपनीकडून सांगण्यात आलं. या अपघातामुळे
शिर्डी विमानतळावरची विमान वाहतुक काही काळ ठप्प झाली होती.
दरम्यान, या प्रकरणी सखोल चौकशी करण्यासाठी, नागरी हवाई वाहतुक
विभागाच्या महासंचालकांनी, एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे.
****
पालघर जिल्ह्यात पोलिसांनी सुमारे बारा लाख रुपये
किमतीचा गुटखा जप्त केला आहे. अहमदाबादहून गुटख्याची चोरटी वाहतुक होत असल्याच्या माहितीवरून
पोलिसांनी, मुंबई अहमदाबाद रस्त्यावर आज पहाटे, आंबोळी गावाजवळ एका टॅम्पोतून हा गुटखा
जप्त केला. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून, हे दोघे रायगड जिल्ह्यातल्या
पनवेल इथले रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांविरोधात अन्नसुरक्षा आणि
प्रमाणन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. राज्यात गेल्या सात वर्षांपासून गुटखा निर्मिती,
वाहतुक, साठवणूक आणि विक्रीवर बंदी आहे. गुटखा विक्री हा अजामीनपात्र गुन्हा असल्याचा
निर्णय, राज्य सरकारनं गेल्या वर्षी जारी केला
आहे.
****
यवतमाळच्या
मारेगावजवळ ट्रक आणि चारचाकी गाडीच्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. यवतमाळ
कडून चंद्रपूरकडे जाणाऱ्या अज्ञात ट्रकने चारचाकी वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात
दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर नववधू साक्षी उपरे हिचा रुग्णालयात हलवताना मृत्यू
झाला. या अपघातात ६ जण जखमी झाले असून त्यांच्यावर चंद्रपूर इथं उपचार सुरू असल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
काल झालेल्या मतदान प्रक्रियेत दिंडोरी लोकसभा मतदारसंघात
६५ टक्के तर नाशिक मतदारसंघात ५९ टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली
आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत या वर्षी मतदानाचा टक्का वाढल्याचं या वृत्तात म्हटलं
आहे.
*****
***
No comments:
Post a Comment