Tuesday, 30 April 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.04.2019 20.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 April 2019

Time 20.00 to 20.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० एप्रिल २०१९ - २०.००

****

लोकसभा निवडणूक केवळ सरकार बनवणार नाही तर २१ व्या शतकातल्या भारताच्या स्थानाचा देखील ही निवडणूक निर्णय करणार असल्याचं भारतीय जनता पक्षाच जेष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. उत्तरप्रदेशातल्या बहराईच इथं एका निवडणूक जाहीर सभेत ते आज  बोलत होते. विकासासाठी देशात मजबूत सरकारची गरज असून मजबूत सरकार केवळ भारतीय जनता पक्षचं देऊ शकत असल्याचं ते म्हणाले. प्रत्येक भारतीय नागरिकाला प्रतिष्ठा आणि सुरक्षा उपलब्ध करून देण्यास भाजपचं प्राधान्य असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

राजस्थानमधल्या दौसा इथं झालेल्या निवडणूक जाहीर सभेत बोलतांना भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार, देशाच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करू शकत नसल्याचं सांगितलं. काँग्रेसवर टीका करताना त्यांनी एकच परिवार गेल्या ५५ वर्षांपासून देशावर राज्य करत असून त्यांना आपल्या कामाचा हिशोब द्यावा लागेल, असं ते म्हणाले.

****

काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी आपल्या नागरिकतेसंदर्भातल्या मुद्यावर स्पष्टीकरण देण्याची मागणी भारतीय जनता पक्षानं केली आहे. पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी यासंदर्भात बोलतांना यामध्ये कोणतही राजकारण नसल्याचं सांगितलं. गांधी यांच्या नागरिकतेबाबत कोणतीही शंका असता कामा नये, असं ते म्हणाले.

दरम्यान, गांधी यांच्या नागरिकतेबाबत गृह मंत्रालयाने पाठवलेली नोटीस ही भारतीय जनता पक्षाची राजकीय चाल असल्याचा आरोप काँग्रेस पक्षानं केला आहे. लोकांचं लक्ष विचलित करण्याचा हा प्रकार असल्याचं पक्षानं म्हटलं आहे. ****

काँग्रेसच्या न्याय योजनेमुळे जनतेला खर्च करण्यासाठी त्यांच्या बँक खात्यात पैसे उपलब्ध होतील, यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळू शकेल, परिणामी विमुद्रीकरण आणि वस्तु आणि सेवा करामुळे निर्माण झालेल्या स्थितीपासून दिलासा मिळेल, अशी आशा काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी व्यक्त केली आहे. मध्यप्रदेशमध्ये पन्ना जिल्ह्यातल्या अमानगंज इथं निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. विमुद्रीकरण तसंच वस्तु आणि सेवाकरामुळे  जनतेची क्रय शक्ती संपल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणांमधून घोडेबाजाराचे संकेत मिळत असल्यानं, निवडणूक आयोगानं त्यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी, तृणमूल काँग्रेस पक्षानं केली आहे. मोदींनी काल पश्चिम बंगालमध्ये एका प्रचार सभेत, तृणमूल काँग्रेसचे ४० आमदार आपल्या संपर्कात असून, निवडणूक निकालानंतर ते सर्व जण भाजपात प्रवेश करणार असल्याचं विधान केलं होतं. हा निवडणूक प्रचाराचा योग्य मार्ग नसून, मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न आहे, असं तृणमूल काँग्रेसनं निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात म्हटलं असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. लोकशाहीला मारक ठरणारी विधानं केल्याप्रकरणी पंतप्रधानांवर कठोर कारवाई करण्याची मागणी तृणमूल काँग्रेसनं या पत्रातून केली आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात दाखल आचारसंहिता भंगाच्या तक्रारींवर निर्णय सुनावण्यास, निवडणूक आयोग सक्षम असल्याचं, सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. काँग्रेसच्या खासदार सुश्मिता देव यांनी ही तक्रार दाखल केली आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं, निवडणूक आयोगाला आपलं म्हणणं मांडण्यास सांगितलं आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी गुरुवारी होणार आहे.

****

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी, सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना  पंतप्रधानांबाबत अवमानकारक वक्तव्य केल्या प्रकरणी, आज पुन्हा न्यायालयात माफी मागितली. राफेल विमान खरेदी संदर्भातल्या एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या विधानाचा राहुल गांधी यांनी विपर्यास केला होता. या प्रकरणी भाजप खासदार मीनाक्षी लेखी यांनी अवमान याचिका सवोच्च न्यायालयात दाखल केली होती. गांधी यांच्या खेद व्यक्त करण्याच्या पद्धतीबाबत सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी नाराजी व्यक्त केल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

धुळे महापालिकेतले भाजपचे स्वीकृत सदस्य हिरामण गवळी यांच्यासह आणखी दोन जणांविरूद्ध पोलिस  ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळ्यात काल मतदानाच्या दिवशी भाजपचे कार्यकर्ते मतदारांना कथित रित्या पैसे वाटप करताना, विकास राठोड याने मोबाइलमध्ये चित्रीकरण केल्यामुळे, गवळी यांच्यासह  दोन जणांनी राठोड याला मारहाण केली, तसंच त्याच्या मोबाईल हिसकावला, असं या तक्रारीत म्हटलं आहे.

****

सार्वजनिक कर्ज घेऊन देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेस पक्षानं केला आहे. पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सत्तेवर असलेल्या सरकारनं आपल्या चार वर्ष ९ महिन्यांच्या कार्यकाळात ३० लाख २८ हजार कोटी रूपयांचं सर्वाजनिक कर्ज घेतल्या आरोप अर्थ मंत्रालयाचा हवाला देत केला. २०१४ नंतर देशाच्या सार्वजिनक कर्जात ५७ टक्के वाढ झाली असल्याचंही ते म्हणाले.

****

No comments:

Post a Comment