Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 May 2019
Time Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ मे
२०१९ सायंकाळी ६.००
****
गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात पंधरा जवान शहीद झाले आहेत.
काल रात्री दादापूर इथं छत्तीस वाहनं जाळल्यानंतर नक्षलवाद्यांनी आज दुपारी साडे बारा
वाजता कुरखेड्यापासून सहा किलोमीटर अंतरावरच्या जांभूरखेडा गावाजवळ भूसुरुंगाचा भयंकर
स्फोट घडवून आणला. शीघ्र कृती दलाच्या पथकातले जवान एका खाजगी वाहनानं कुरखेडा इथून
जात असताना जांभूरखेडा गावाच्या अलिकडे नक्षलवाद्यांनी हा स्फोट केला. पंधरा जवान आणि
वाहन चालक, असे १६ जण या स्फोटात मृत्युमुखी पडले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला असून, हा
भ्याड हल्ला करणा-यांना धडा शिकवला जाईल, असं म्हटलं आहे. शहीद झालेल्या जवानांच्या
बलिदानाचं देशाला नेहमी स्मरण राहील, असं सांगून, पंतप्रधानांनी, शहीदांच्या कुटुंबियांच्या
दु:खात सहभागी असल्याचं म्हटलं आहे.
नक्षलवाद्यांनी केलेल्या ह्या हल्ल्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
निषेध केला असून, नक्षलवादाशी लढा अधिक तीव्र केला जाईल, असा इशारा दिला आहे.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. केंद्र सरकारकडून सर्व ती मदत देण्यासाठी गृहमंत्रालय
राज्य सरकारच्या संपर्कात असल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं आहे.
नक्षलवाद्यांच्या, मतदान न करण्याच्या धमक्यांना न जुमानता गडचिरोली जिल्ह्यात
नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदान केल्यामुळे दहशत पसरवण्याकरता नक्षलवाद्यांनी हे
कृत्य केल्याचं मत गडचिरोलीचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं आहे.
या हल्लयाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी, महाराष्ट्रदिनानिमित्त आज संध्याकाळी राजभवनामध्ये
आयोजित चहापान आणि सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केला आहे.
लोकशाही उलथून टाकणं, हेच माओवाद्यांचं उद्दिष्ट असून, माओवाद्यांना सडेतोड
उत्तर दिलं जाईल, असा इशारा राज्याचे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी दिला
आहे. या घटनेला गुप्तचर विभागाचं अपयश म्हणता येणार नाही, असंही जयस्वाल यांनी मुंबईत
पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रालय असल्यामुळे, या
नक्षलवादी हल्ल्याच्या पार्श्र्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे,
अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. नक्षलग्रस्त
भागातल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीबाबत सरकारनं निष्काळजीपणा दाखवल्यामुळेच
नक्षलवादी कृत्यं वाढली असल्याची टीकाही पवार यांनी केली आहे.
****
महाराष्ट्र राज्याचा एकोणसाठावा वर्धापन दिन आज साजरा होत आहे.
राज्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्या
हस्ते मुंबईत झाला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईतल्या हुतात्मा
स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केलं. औरंगाबाद इथं राज्याचे परिवहन मंत्री
दिवाकर रावते यांच्या हस्ते, नांदेडमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांच्या
हस्ते, जालन्यात पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते तर बीड
इथे पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण झालं.
हिंगोली इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या
हस्ते झालं.
परभणी इथं जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण झालं.
****
बीड जिल्ह्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे गेल्या दोन
हंगामांच्या ऊसबिलाचे, जिल्ह्यातल्या विविध साखर कारखान्यांनी थकवलेले कथित कोट्यवधी
रुपये मिळावेत या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर
अन्नत्याग आणि धरणे आंदोलन केलं. येत्या वीस दिवसात साखर आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार
संबंधित कारखान्यांच्या संचालक मंडळ आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांवर जिल्हाधिका-यांनी कठोर
कारवाई करण्याची मागणी या संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी यावेळी केली
असून अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
****
न्याय प्रक्रिया राबवताना संबंधित घटकांनी अभ्यासपूर्ण
पद्धतीनं न्याय करावा आणि पक्षकाराच्या चेहऱ्यावर समाधान दिसेल असा न्याय निवाडा असावा,
असं प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि बीड जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती
रविंद्र घुगे यांनी केलं आहे. बीड जिल्ह्यातल्या माजलगाव इथं जिल्हा आणि अतिरिक्त सत्र
न्यायालयाच्या इमारतीचा उद्घाटन समारंभ आज
झाला, त्यावेळी ते बोलत होते.
****
No comments:
Post a Comment