आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०२ मे २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
नक्षलवाद्यांनी काल केलेला हल्ला
आणि दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं आज
राज्य मंत्रीमंडळाची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि गडचिरोलीमध्ये काल नक्षलवाद्यांनी
केलेल्या भूसुरुंगस्फोटाच्या पार्श्र्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली आहे. गडचिरोली
जिल्ह्यात काल दुपारी नक्षलवाद्यांनी घडवलेल्या भूसुरुंग स्फोटात शीघ्र कृती दलाचे
पंधरा जवान शहीद झाले होते आणि त्यांना नेणाऱ्या वाहनाचा चालक मृत्यूमुखी पडला होता.
****
नक्षलवाद्यांच्या
या हल्ल्यात ठार झालेल्या जवानांमध्ये हिंगोली जिल्ह्यातल्या ब्राह्मणवाडा गावच्या
संतोष चव्हाण आणि बीड जिल्ह्यातल्या आरिफ शेख यांचा समावेश आहे.
****
संयुक्त राष्ट्र संघटना- युनोनं जैश- ए- मोहम्म्द
या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अजहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलं आहे.
संयुक्त राष्ट्र प्रतिबंध समितीनं काल मसूद
अजहर याला दहशतवादी संघटनेच्या यादीत सामील केलं असल्याचं संयुक्त राष्ट्रातले भारताचे
राजदूत आणि स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरूद्दीन यांनी काल ट्विटरवर संदेशाद्वारे सांगितलं.
अमेरिका, ब्रिटन आणि फ्रांस या देशांनी भारताला पाठिंबा दिल्यानंतरही चीननं मसूदला
आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या प्रस्तावाला चार वेळा विशेषाधिकाराचा वापर करून आडकाठी आणली
होती, मात्र आता चीननेही भारताच्या या प्रस्तावाला सहमती दिल्यामुळे संयुक्त राष्ट्राने मसूद
अजहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलं आहे.
दरम्यान,
हा भारतीय कूटनितीचा विजय असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त
केली आहे.
****
‘फानी’ चक्रीवादळ उद्या ओदिशा समुद्रकिनाऱ्यावर धडकण्याची
शक्यता असून, यावेळी ताशी १७५ ते १८५ किलोमीटर वेगानं वारे वाहतील. या चक्रीवादाळाचा
फटका समुद्र तटावरच्या गंजम, गजपती, खुरदा, पुरी या जिल्ह्यांबरोबर जगतसिंगपूर, केंद्रापाडा,
भद्रक, जैजपूर आणि बालासोर या जिल्ह्यांनाही बसणार आहे. भारतीय तटरक्षक दल आणि नौदलानं
आपली जहाजं आणि हेलिकॉप्टर्स सज्ज ठेवली असून, लष्कर आणि हवाईदलालाही सज्ज राहायला
सांगितलं आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या २८ तुकडया ओदिशामधे, १२ तुकडया आंध्रप्रदेशमधे,
आणि ६ तुकडया पश्चिम बंगालमधे तैनात केल्या आहेत. अतिरिक्त् ३२ तुकडया सज्ज ठेवल्या
आहेत.
****
सांगली जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांकडे ऊस उत्पादक
शेतकऱ्यांची योग्य आणि किफायतशीर दर- एफआरपीची जवळपास २८० कोटी रूपयांहून अधिक रकम थकीत असून हंगाम संपून सव्वा महिना उलटला
तरीही साखर कारखानदार निर्णय घेत नसल्यामुळं शेतकरी अडचणीत आले आहेत. जिल्ह्यात चालू
हंगामात जवळपास ८३ लाख मेट्रिक टन ऊसाचं गाळप तर जवळपास ९१ लाख क्विंटल साखरेचं उत्पादन
झालं आहे.
दरम्यान, आचार संहिता संपल्या नंतर ऊसाच्या एफ आर
पी बाबत योग्य तोडगा काढू असं आश्वासन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिलं आहे.
****
बीड जिल्ह्यात परळी रेल्वे स्थानकाजवळ, दक्षिण मध्य
रेल्वेनं हाती घेतलेल्या दुरूस्तीच्या कामामुळे ८, ९, आणि १० मे अशा तीन दिवसांकरता
रेल्वे वाहतूक सेवा खंडीत राहणार आहे. यामुळे नांदेड विभागातल्या काही रेल्वे गाड्या
पूर्णतः तर काही रेल्वे गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. पूर्णा ते परळी आणि
परळी ते पूर्णा तसंच परळी ते अकोला ही प्रवासी रेल्वे गाडी या तिन दिवसांकरता रद्द
करण्यात आली आहे. तर आदिलाबाद ते परळी सवारी गाडी परभणी ते परळी दरम्यान अंशतः रद्द
करण्यात आली आहे. परळी ते आदिलाबाद ही गाडी ९ आणि १० मे, रोजी परळी ते परभणी दरम्यान
अंशतः रद्द करण्यात आली आहे. अकोला ते परळी प्रवासी गाडी ८ आणि ९मे, रोजी परभणी ते
परळी दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली असल्याचं नांदेदच्या रेल्वे विभागानं कळवलं आहे.
****
यवतमाळच्या मोहदा गावाजवळ दोन ट्रकचा
भीषण अपघातात झाला, या अपघातात दोन्ही ट्रक चालक जागीच ठार झाले. या अपघातामुळे यवतमाळ
चंद्रपूर हा मार्ग सुमारे सहा तास बंद होता. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलीस
आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेवुन जेसीबीच्या सहाय्यानं अपघातग्रस्त ट्रक मार्गावरून
हटविण्यात आल्या नंतर वाहतूक सुरळीत झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल रात्री चेन्नई इथं झालेल्या
सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं दिल्ली कॅपिटल्सवर ८० धावांनी दणदणीत विजय नोंदवला.
*****
***
No comments:
Post a Comment