Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 02 May 2019
Time
18.00 to 18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ मे २०१९ सायंकाळी ६.००
****
राज्यातल्या दुष्काळ स्थितीचा आढावा घेण्यासाठी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत राज्य मंत्रिमंडळाची
बैठक झाली. दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी आचारसंहितेचा कोणताही अडसर नाही तसंच राज्यातले
निवडणुकांचे सर्व टप्पे झाल्यामुळे दुष्काळी स्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक कामं
करण्याकरिता निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली
असल्याचं
मुख्यमंत्र्यांनी
या संदर्भात वार्ताहरांशी
बोलताना
सांगितलं. पालकमंत्र्यांना
जिल्ह्याचा आढावा घेण्याचे आणि चारा छावण्यांना भेटी देण्याच्या
सूचना देण्यात आल्या आहेत. दुष्काळकालीन
उपाययोजनांसाठी
राज्य सरकार तयार आहे. बारा हजार गावांमधे चार हजार
774 टँकर्सद्वारे पाणी पुरवलं जात आहे. जायकवाडी धरणात मृतसाठा भरपूर असून सध्या ते
पाणी वापरता येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. नरेगांतर्गत 97 टक्के मजुरी वेळेत देण्यात
आली आहे. दुष्काळी
भागात एक हजार 264 चाराछावण्या सुरु करण्यात आल्या असून, त्यात
सुमारे साडेआठ लाख जनावरं आहेत, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी
नमुद केलं.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यात काल झालेल्या नक्षलवादी
हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबांचं सांत्वन केलं आहे. त्यांनी शहीद जवानांच्या
परिवाराला प्रत्येकी २५ लाख रूपये तातडीच्या मदतीची घोषणा केली आहे. याविषयी अधिक माहिती
देत आहेत आमचे वार्ताहर...
या
वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी
असल्याची ग्वाही दिली. शहीद जवानांच्या कुटुंबींना २५ लाख रुपयांची तातडीची मदत तसेच
त्यांच्या नोकरीच्या कालवधी पर्यंत संपूर्ण वेतन देण्याचे आश्वान या वेळी मुख्यमंत्र्यांनी
दिलं. मानवदनेनंतर शहीद जवानांचे पार्थिव गावाकडे रवाना करण्यात आलं.
आकाशवाणी बातम्यांसाठी
जयंत निमगडे
हे सर्व शहीद जवान २०१०- २०११च्या तुकडीचे आहेत.
दरम्यान, या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली आहे.
****
निती आयोगामार्फत देशातील आर्थिकदृष्ट्या मागास
असलेल्या ११५ जिल्ह्यांची आकांक्षित जिल्हे म्हणून निवड करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील
वाशिम, उस्मानाबाद, गडचिरोली व नंदुरबार अशा चार जिल्ह्यांचा समावेश आहे. कृषी, शिक्षण,
आरोग्य आणि आहार, आर्थिक स्वायत्तता आणि कौशल्य
विकास तसंच पायाभूत सुविधा या पाच निकषांच्या आधारे जिल्ह्यांची यादी तयार केली.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज
जाहीर करण्यात आला आहे. निकाल मंडळाच्या www.cbse.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
देशभरातून सुमारे 13 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. या परीक्षेत हंसिका
शुक्ला आणि करीश्मा अरोरा यांनी पाचशेपैकी प्रत्येकी 499 गुण मिळवून प्रथम येण्याचा
मान पटकावला आहे.
****
‘फानी’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या
तीनही संरक्षण दलांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय तटरक्षक दल आणि नौदलानं
आपली जहाजं आणि हेलिकॉप्टर्स सज्ज ठेवली
असून, लष्कर आणि हवाईदलही सज्ज आहेत. अत्यंत
तीव्र स्वरुपाचं हे चक्रीवादळ उद्या ओदिशा समुद्रकिनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे.
****
विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट असून, राज्यातलं
सर्वाधिक तापमान काल ब्रह्मपुरी इथं 47 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. चंद्रपूरमधे पुढले
पाच दिवस तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली
आहे. अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातही काही ठिकाणी उष्णतेची
लाट राहण्याचा अंदाज आहे. येत्या 48 तासात कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता
हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीसाठी माती परीक्षण आधारित खतं वापरावी आणि पीक पद्धतीत
बदल करावे, असं आवाहन कृषी शास्त्रज्ज्ञ किशोर झाडे यांनी केलं आहे. त्यांनी आज औरंगाबाद
इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रात खरीप हंगाम पूर्व
नियोजना संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. येत्या १८ मे रोजी परभणी इथं वसंतराव
नाईक कृषी विद्यापीठात शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम मेळाव्याचं आयोजन करण्यात आल्याची
माहिती यावेळी देण्यात आली.
*****
No comments:
Post a Comment