Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 03 May 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ मे २०१९ सायंकाळी ६.००
****
`फानी` चक्रीवादळामुळं ओडीशा किनारपट्टी परिसरात चार जणांचा
मृत्यू झाला आहे. या चक्रीवादळामुळं अकरा लाखाहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात
आलं आहे. ओडीशा आणि पश्चिम बंगालमधील विमानतळं
बंद ठेवण्यात आली आहेत. हे चक्रीवादळ आता पश्चिम बंगालकडे सरकलं आहे.
दरम्यान, ओडिशा, पश्चिम बंगाल,
आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि पुड्डुचेरीतल्या वादळग्रस्त भागांशी केंद्र सरकार सातत्यानं
संपर्कात असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज राजस्थानमधल्या
हिंदाऊन शहरात एका प्रचार सभेत बोलत होते. केंद्र सरकारनं वादळ प्रभावीत राज्यांना एक हजार कोटी रुपयांहून अधिक मदत जारी केली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद
दल, तटरक्षक दल, भारतीय सैन्य आणि नौदल मदत आणि बचाव कार्य करत असून,
या वादळाशी आपण एकत्रित लढा देत आहोत हे ‘एक भारत श्रेष्ठ भारत’चं उत्कृष्ट उदाहरण
असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी नमुद
केलं.
****
जम्मू काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यात
सुरक्षादलांशी झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिदीनचे तीन दहशतवादी मारले गेले आहेत. सैन्य
दलाचा एक जवान यात जखमी झाला आहे. शोपिया जिल्ह्यातील अदखारा गावात बुरहान गट - अकराचा
एकमेव जिवंत दहशतवादी लतीफ अहमद डार उर्फ लतीफ टायगर आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांना
या कारवाईत ठार करण्यात आलं. सैन्य, केंद्रीय राखीव पोलिस दल आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या
संयुक्त दलातर्फे या भागात तपास आणि नाकेबंदीची कारवाई सुरू करण्यात आल्यानंतर आज पहाटे
ही चकमक उडाली होती.
****
गडचिरोली इथं दोन दिवसांपुर्वी झालेल्या हल्ल्यासारखा
घातपात नक्षलवाद्यांना पुन्हा करता येऊ नये यासाठी योग्य खबरदारी घेण्यासाठी केंद्र
आणि राज्य सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी
दिली आहे. नक्षलवाद्यांच्या या हल्ल्यात शिघ्र पोलिस दलाच्या जवानांना नेणारे वाहन
भूसुरुंग स्फोटात सापडल्याने १५ जवान शहीद
झाले होते, वाहनाचा चालक मृत्यूमुखी पडला होता. ही अतिशय दूदैवी घटना होती आणि सरकार
याकडे एक आव्हान म्हणून बघत असल्याचं अहीर यांनी यावेळी नमुद केलं. सरकारला नक्षलवाद्यांवर प्रभावी वचक ठेवण्यात
यश आल्यामुळे नैराश्यातून हा हल्ला झाला आहे
आणि यातील कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
****
कॉंग्रेस पक्ष सत्तेत आल्यास कर्जाची परतफेड करु न
शकणाऱ्या एकाही शेतकऱ्याला तुरुंगवास होणार नाही तसंच , २२ लाख युवकांना सरकारी
नोकरी देण्याचं आश्वासन, कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलं आहे. ते आज रेवा इथं प्रचारसभेत बोलत होते.
कॉंग्रेस पक्षाच्या ऩ्याय योजनेतुन, वार्षीक
७२,००० हजार तर पाच वर्षात ३ लाख साठ हजार रूपयांचा लाभ महिलांच्या बँक खात्यात
जमा होणार असल्याचंही गांधी यांनी यावेळी सांगितलं.
****
मतदान पडताळणी पावती यंत्र व्ही व्ही पॅटच्या नमूना सर्वेक्षणाची संख्या वाढवण्याच्या
याचिकेवर सर्वोच्च न्यायालय पुढच्या आठवडयात सुनावणी घेणार आहे. ही पडताळणी पाच मतदान
केंद्रावर करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला दिले होते. मात्र
ही संख्या पुरेशी नाही, असं सांगत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या निर्णयावर फेरविचार
करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे.
****
धुळे इथल्या जिल्हा परिषद
निवडणुकीसाठी प्रभाग रचना आणि आरक्षणाचा कार्यक्रम राबविण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या
औरंगाबाद खंडपीठानं परवानगी दिली आहे. मात्र, जिल्हा परिषद निवडणुकीचा कार्यक्रम न्यायलयाच्या
पूर्वपरवानगी शिवाय जाहीर करू नये, असे आदेशही देण्यात आले आहेत.
****
जालना जिल्ह्यातील पाणीपुरवठा
विस्कळित झाल्यामुळं जालना-देऊळगावराजा मार्गावर संतप्त नागरिकांनी दीड तास रस्ता बंद
आंदोलन केल्यानं वाहतूक विस्कळित झाली होती. जायकवाडी योजनेच्या जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात होणारी गळती, पाणीचोरीच्या घटनांमुळे
या भागात महिनाभरापासून पाणीपुरवठा झालेला नसल्यानं हे आंदोलन करण्यात आलं. दरम्यान,
नगरपालिकेच्या पाणीपुरवठा अभियंत्यांनी पाणीपुरवठ्या संदर्भात आश्वासन दिल्यानंतर आंदोलन
मागं घेण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
***
No comments:
Post a Comment