▼

Tuesday, 21 May 2019

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 21.05.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21 May 2019

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ मे २०१९ दुपारी १.०० वा.

****

काळा पैसा प्रतिबंधक कायदा २०१६ पूर्वलक्ष्यी प्रभावानं लागू करण्यास दिल्ली उच्च न्यायालयानं दिलेली स्थगिती सर्वोच्च न्यायालयानं आज रद्द केली. केंद्र सरकारनं दिल्ली सरकारच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या या निर्णयामुळे, ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यातला एक संशयीत गौतम खेतान याच्या विरोधात या कायद्यातली कलमं लावणं आयकर खात्याला शक्य होणार आहे.

****

लोकसभा निवडणुकीच्या येत्या तेवीस तारखेला होणार असलेल्या मतमोजणी दरम्यान, मतदानयंत्रांवरच्या शंभर टक्के मतांची  पोचपावतींशी पडताळणी करावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली. चेन्नई इथल्या `टेक फॉर ऑल` या संस्थेनं ही याचिका दाखल केली होती. या मुद्द्यावर सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं आधीच निर्देश दिलेले असल्यानं यावर पुन्हा सुनावणी घेण्याची गरज नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं.

****

मतदानोत्तर कल चाचण्या अर्थात एक्झिट पोल म्हणजे विरोधी पक्षांची उमेद खच्ची करण्याचं षड्यंत्र असल्याचं मत काँग्रेस महासचिव प्रियंका वाड्रा यांनी आज नवी दिल्लीत एका संदेशाद्वारे व्यक्त केलं आहे. पक्ष कार्यकर्त्यांनी या पार्श्र्वभूमीवर मतमोजणी केंद्रांवर नजर ठेवण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. विरोधी पक्षांना निराश करण्यासाठी हे कल प्रसारित केले जात असल्याचा आरोपही प्रियंका वाड्रा यांनी केला आहे.

****

राष्ट्रवादी कॉग्रेस राज्यातील लोकसभा निवडणुकीत दोन अंकी जागा जिंकेल असा विश्वास पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी व्यक्त केला आहे. मतदानोत्तर जनमत चाचण्यांच्या पार्श्र्वभूमीवर ते काल अलिबागमध्ये माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रायगड आणि मावळ या दोन्ही जागा चांगल्या फरकानं जिंकेल असा दावाही त्यांनी यावेळी केला. सुनील तटकरे हे स्वतः रायगडमधून लोकसभेची जागा लढवत आहेत.
दरम्यान, मतदानोत्तर जनमत चाचण्यांतून व्यक्त करण्यात येत असलेले अंदाज चुकीचे असल्याचा दावा शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनीही अलिबागमध्ये केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात जिल्हा सुरक्षा दलाचे दोन जवान आज जखमी झाले. रायपूरपासून सुमारे पाचशे किलोमीटर अंतरावरील गोगुंडा गावानजिक जंगलामध्ये सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरुद्ध सुरू केलेल्या एका संयुक्त मोहीमेवेळी अत्याधुनिक स्फोटकांच्या सहाय्यानं हा स्फोट घडवण्यात आल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. यातील जखमी जवानांना उपचारांसाठी विमानानं रायपूरला हलवण्यात येणार असल्याचं एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यानं पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितलं.

****

वाढत्या उन्हाळ्यामुळे राज्यातली विजेची मागणी वाढलेली असताना, राज्याच्या महानिर्मिती या वीज निर्मिती कंपनीनं काल दहा हजार मेगावॅट वीज उत्पादन घेतलं. हे आजवरचं सर्वोच्च वीज उत्पादन आहे. महानिर्मितीनं राज्यातल्या औष्णिक, जल, पवन आणि सौर अशा सगळ्या प्रकारच्या ऊर्जा प्रकल्पांच्या सहाय्यानं काल वीज निर्मितीचा हा उच्चांक गाठला. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या ऐतिहासिक कामगिरीबद्दल महानिर्मितीच्या अधिकारी आणि कर्मचा-यांचं अभिनंदन केलं आहे. राज्याची विजेची गरज बावीस हजार तीनशे मेगॅवॅटची असून, यातला सर्वात मोठा वाटा महानिर्मितीकडून पुरवला जात आहे. उर्वरित वीज खाजगी वीज निर्मिती कंपन्या आणि केंद्र सरकारच्या प्रकल्पातून घेतली जात असल्याची माहिती शासनानं दिली आहे. 

****

लोकसभा निवडणुकीच्या येत्या गुरुवारी होणाऱ्या मतमोजणीदरम्यान पत्रकारांना मतमोजणी केंद्राच्या परिसरात मोबाईल घेऊन जाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी रत्नागिरीतल्या पत्रकारांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे केली आहे. मोबाइलच्या वापराला प्रतिबंध केला, तर कोणत्याही पत्रकाराला बातम्या देण्याचं मुख्य कामच करता येणार नाही, म्हणून ही मागणी करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

गौहत्ती इथे सुरू असलेल्या दुसऱ्या भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धेत काल भारताच्या सात मुष्टियोद्ध्यांनी आपापले पहिले सामने जिंकले, तर एम.सी मेरी कोम आज आपला सामना खेळणार आहे. पाच दिवस चालणारी ही स्पर्धा उद्या संपत असून,या स्पर्धेत आतापर्यंत दहा भारतीय खेळाडूंनी पदक निश्चित केलं आहे.

//*************//






































































No comments:

Post a Comment