Thursday, 13 June 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 13.06.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 13 June 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १ जून २०१९ सायंकाळी ६.००
****
राज्य शासन अकरावी प्रवेशासंदर्भात विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ देणार नाही असं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केलं आहे. अकरावी प्रवेश प्रक्रिया नियमित वेळापत्रकानुसारच सुरु करण्यात येत असून या प्रक्रियेला कोणताही विलंब झालेला नसल्याची माहिती त्यांनी दिली. राज्य मंडळ, सीबीएसई आणि आयसीएसई विद्यार्थ्यांचे समान पातळीवर मूल्यमापन होणं आवश्यक आहे. अकरावी प्रवेशासाठी काही नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी चढाओढ असते, हे लक्षात घेता या महाविद्यालयांमधील जागा वाढविता येऊ शकतील का याबाबत बैठक घेण्यात येणार असल्याचं शिक्षण मंत्री तावडे यांनी नमुद केलं.
दरम्यान, दहावी आणि बारावीच्या पुरवणी परिक्षा येत्या १७ जुलैपासून होणार असल्याचं राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं कळवलं आहे. 
****
गेल्या चार वर्षांपासून २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी हा दिवस राज्यातल्या  सर्व  २८८ तालुक्यांमधल्या तालुका क्रीडा संकुलामध्ये साजरा करण्यात येणार असून प्रत्येक तालुक्यांमध्ये किमान पाच हजार विदयार्थी सहभागी होणार असल्याचं शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं.
****
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी अमित गणपत गोरखे यांची आज नियुक्ती करण्यात आली आहे. अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या योजना गतीमान पद्धतीनं राबवण्यासाठी कसोशीनं प्रयत्न करणार असल्याचा विश्र्वास गोरखे यांनी व्यक्त केला आहे.
****
औरंगाबाद महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज ऑल इंडीया मजलीसए इत्तेहादूल मुसलमीन - एआयएमआयएम पक्षाचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाचा ठराव आणि शहराचा पाणी प्रश्नाच्या मुद्दावरून गोंधळ झाला. राजदंड पळवणे, घोषणाबाजीनंतर पोलिसांनी पाचारन करण्यात आलं. सभागृहाची शिस्त भंग केल्या प्रकरणी एआयएमआयएमच्या काही नगरसेवकांना निलंबित करण्यात आलं असून नेहमी गोंधळ घालणाऱ्या वीस नगरसेवकांच्या कायम निलंबनाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवणार असल्याचं महापौर नंदकुमार घोडेले यांनी वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं.
****
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी आमदार नितीन पाटील यांची आज बिनविरोध निवड झाली आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आमदार अब्दूल सत्तार, संदीपान भुमरे या संचालक मंडळातील प्रमुख सदस्यांच्या उपस्थितीत ही निवड झाली. जिल्हा उपनिबंधक पीठासीन अधिकारी अनिलकुमार दाबशेटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रीया झाली.
****

विद्यार्थ्यांनी कारकीर्द घडवतांना ध्येय निश्चित करुन वाटचाल केली तर त्यांना यश निश्चित मिळतं, असं प्रतिपादन विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.रविंद्र सिंगल यांनी केलं आहे. नांदेड जिल्हा पोलीस दल तसंच नांदेड जिल्हा आणि महानगर पत्रकार संघ आणि वृत्तपत्र वितरक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं नांदेड इथं आयोजित एका शिबीरात मार्गदर्शन करताना आज ते बोलत होते.  जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
****
धुळे तालुक्यात गेल्या अकरा तारखेला झालेल्या वादळानं केलेल्या हाणीची नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या नेतृत्वाखाली भाजप शिष्टमंडळानं केली आहे. या शिष्टमंडळानं आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना या संबंधी मागण्यांचं निवेदन सादर केलं.  धुळे एमआयडीसी परिसरात वादळामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करून नुकसानग्रस्तांना शासकीय मदत करण्यासाठी राज्य शासनाला सविस्तर अहवाल सादर करावा, ही मागणीही यावेळी करण्यात आली.
****
अमरावती जिल्ह्यात गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यानं जिल्ह्याची भूजलपातळी गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत पंधरा ते चोवीस फुटांपर्यंत खालावली आहे. भूजल निरीक्षण विभागानं मे महिन्यात केलेल्या विहीरींच्या पातळीच्या सर्वेक्षणात ही बाब समोर आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
येत्या ४८ तासांत कोकणात बऱ्याच ठिकाणी, दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी; तर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा वीजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
****

No comments:

Post a Comment