Friday, 14 June 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 14.06.2019 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१४ जून  २०१९ सकाळी ११.०० वाजता
****

`मुख्यमंत्री फेलोशिप` कार्यक्रमात सहभागी होण्याचा आज शेवटचा दिवस आहे. प्रशासन प्रक्रियेत युवकांना सहभागी करुन घेण्यासाठी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबवल्या जात या योजनेसाठी, २१ ते २६ वयोगटातल्या, प्रथम श्रेणीतले पदवीधर आणि पूर्णवेळ कामाचा एक वर्षाचा अनुभव असलेल्या युवकांना `महादेस डॉट महाराष्ट्र ॲट द रेट जीओव्ही डॉट इन` या संकेत स्थळावर अर्ज करता येईल. युवकांचा उत्साह, नावीन्यपूर्ण दृष्टीकोन आणि तंत्रज्ञानातली त्यांची गती, याचा प्रशासकीय कामकाजात वापर व्हावा आणि युवकांनाही शासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा, हे या कार्यक्रमाचं मुख्य उद्दीष्ट आहे.
****
विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्याविरुद्धच्या अनधिकृत जमीन खरेदी प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या प्रकरणी मुंडे यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिले होते, त्या निर्णयाला मुंडे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. दरम्यान, मुंडे यांच्याविरुद्ध बीड जिल्ह्यातल्या बर्दापूर पोलीस ठाण्यात शासकीय जमीन बेकायदेशीररित्या हस्तांतरित केल्यावरून आज गुन्हा दाखल झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.  मुंडे यांच्या नियोजित जगमित्र शुगर्स या कारखान्याच्या जमिनीच्या वादावरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.  

****

बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी एक शेतकरी एक रोहीत्र ही योजना आजपासून सुरु करण्यात येत आहे. परळी तालुक्यातल्या पांगरी आणि घाटनांदूर इथं पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते आज या योजनेला सुरुवात होत आहे. १७५ कोटी रुपये किंमतीच्या योजनेची अंमलबजावणी राज्य वीज वितरण कंपनीच्या उच्चदाब वितरण प्रणाली अंतर्गत होणार आहे.
****
कोलकात्ता इथं डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय-घाटी इथं निवासी डॉक्टरांच्यामार्ड संघटनेतर्फे आज कामबंद आंदोलन केलं जाणार आहे.

****


No comments:

Post a Comment