Saturday, 15 June 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 15.06.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 15 June 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ जून २०१ सकाळी ७.१० मि.
****

Ø  देशभरात सातशे औद्योगिक समूह उभारण्याच्या योजनेवर उद्योग मंत्रालयात काम सुरू
Ø  राज्यमंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्र्यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा
Ø  जगमित्र जमीन खरेदी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा धनंजय मुंडे यांना दिलासा
Ø  कवी सुशीलकुमार शिंदे आणि लेखक सलीम सरदार मुल्ला यांना साहित्य अकादमी पुरस्कार
आणि
Ø  मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात तांत्रिक ब्लॉक मुळे पुढचे तीन महिने रेल्वे गाड्या रद्द
****

 सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालय, देशभरात सातशे औद्योगिक समह उभारण्याच्या योजनेवर काम करत आहे, केंद्रीय उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी काल नवी दिल्लीत भारतीय उद्योग महासंघाच्या परिषदेत ही माहिती दिली. उद्योजकांना या क्षेत्रात अधिक गुंतवणूक करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. सुक्ष्म, लघू आणि मध्यम क्षेत्रात, विकास आणि रोजगार निर्माणाची मोठी क्षमता असल्याचंही गडकरी यांनी यावेळी सांगितलं.
****

 राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी ट्वट करुन याबाबत माहिती दिली. सोमवारपासून सुरू होत आलेल्या विधीमंडळ अधिवेशनापूर्वी उद्या रविवारी मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. मंत्रिमंडळात सध्या मुख्यमंत्र्यांसह सदतीस मंत्री असून, आणखी पाच मंत्र्यांचा समावेश करता येऊ शकेल.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी काल राज्यपाल सी विद्यासागर राव यांचीही भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.
****

 काँग्रेसच्या विधीमंडळ नेतेपदी बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे. विधानसभा नेतेपदी विजय वडेट्टीवार यांची तर उपनेतेपदी मोहम्मद आरीफ नसीम खान यांची निवड करण्यात आली आहे.
****

 जगमित्र जमीन खरेदी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना दिलासा दिला आहे. या प्रकरणी मुंडे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याच्या, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली.

 बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यात पुस इथल्या नियोजित जगमित्र साखर कारखान्यासाठी चुकीच्या पद्धतीने जमीन खरेदी केल्याप्रकरणी मुंडे यांच्यासह चौदा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठानं दिले होते, या आदेशासह मुंडे यांच्या विरुद्ध काल बर्दापूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यालाही स्थगिती देण्यात आली आहे.
****

 नर्मदा नदीवरच्या सरदार सरोवर पुनर्वसन वसाहतीमधल्या समस्या सोडवण्याच्या मागणीसाठी, नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांच्या नेतृत्त्वाखाली, नंदूरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर काल धडक आंदोलन करण्यात आलं. सरदार सरोवरातून वीज निर्मिती झालीच नाही, महाराष्ट्रातून जनतेचं विस्थापन हे वीजनिर्मितीसाठीच झालं असल्याकडे पाटकर यांनी लक्ष वेधलं. 
****

 मराठा क्रांती मोर्चेकऱ्यांवरील गंभीर गुन्हे वगळता अन्य गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया गतीनं राबवणार असल्याची ग्वाही, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. मराठा समाजाच्या शिष्टमंडळासमवेत काल मुंबई इथं झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
****

 भारतीय तंत्रज्ञान संस्था - आयआयटी मध्ये प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या जेईई परीक्षेत चंद्रपूर जिल्हयातल्या बल्लारपूर इथल्या कार्तीकेय गुप्ता यानं ३७२ पैकी ३४६ गुण मिळवून देशात प्रथम क्रमांक मिळवला. मुंबईच्या तुलीप पांडे हिनं मुलींमधून तिसरा क्रमांक मिळवला आहे.
****

 साहित्य अकादमीचे पुरस्कार काल जाहीर झाले, मराठी भाषा गटात कवी सुशीलकुमार शिंदे आणि बालसाहित्यिक सलीम सरदार मुल्ला यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कांबर यांनी काल देशातल्या २३ भाषांसाठीच्या पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये शिंदे यांच्या ‘शहर आत्महत्या करायचं म्हणतंय’ या काव्यसंग्रहाची तर सलीम सरदार मुल्ला यांच्या ‘जंगल खजिन्याचा शोध’ या कादंबरीची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. ५० हजार रूपये आणि कांस्यपदक असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
**** 

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****

 निझामाबाद पुणे निझामाबाद आणि पंढरपूर निझामाबाद पंढरपूर या गाड्या आजपासून २७ सप्टेंबर पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. तर नांदेड - दौंड- नांदेड ही गाडी आजपासून २६ सप्टेंबर पर्यंत कोपरगाव-दौंड-कोपरगाव दरम्यान अंशत: रद्द करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागामध्ये घेण्यात येणाऱ्या तांत्रिक ब्लॉक मुळे या गाड्या रद्द करण्यात आल्याचं रेल्वे विभागानं कळवलं आहे. मात्र येत्या बारा जुलै रोजी साजऱ्या होत असलेल्या, आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी, या सर्व गाड्या आठ जुलै ते १४ जुलै दरम्यान आपल्या नियमित वेळेवर धावणार असल्याचं, रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
****

 उच्चदाब वीज वितरण प्रणाली योजने अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना स्वतंत्र रोहित्र देण्याचा शासनाचा निर्णय झालेला असून याअंतर्गत बीड जिल्ह्यातल्या पात्र शेतकऱ्यांना वीज रोहित्र दिलं जाणार आहे, असं बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीनं आयोजित ‘एक शेतकरी एक रोहित्र’ या योजनेच्या बीड जिल्ह्यातल्या शुभारंभ प्रसंगी त्या काल बोलत होत्या. यासाठी एकशे अठ्ठयाऐंशी कोटी रुपये निधी मंजूर केला आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
****

 नाशिक इथल्या मुथुट फायनान्स कंपनीच्या कार्यालयात काल सकाळी दरोड्याचा प्रयत्न झाला. यावेळी दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात एक जण ठार झाला. कर्मचाऱ्यांनी दरोडेखोरांना प्रतिकार करून, दक्षता दाखवत धोक्याची घंटी वाजवल्यानं दरोडेखोरांनी गोळीबार केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या, विसापूर शाखेची पंचवीस लाख रुपयांची रोकड काल लुटण्यात आली. सांगली जिल्ह्यात तासगांव विसापूर रस्त्यावर घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे.  
****

 मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातल्या चार आरोपींना मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. धनसिंह, लोकेश शर्मा, मनोहर नरवारिया आणि राजेंद्र चौधरी अशी त्यांची नावं असून, त्यांच्यावरच्या आरोपांना आधार नसल्याचं सांगत न्यायालयानं जामीन मंजूर केला. ा प्रकरणातल्या अन्य नऊ आरोपींच्या विरोधात तपास यंत्रणांनी सादर केलेल्या पुराव्यांसंदर्भात न्यायालय विचार करत असल्याचं, यावेळी सांगण्यात आलं.
****

 परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ तालुक्यातल्या जिल्हा परिषदेच्या तसंच खाजगी, अनुदानित, अंशत: अनुदानित शाळांमधल्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना, शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तकं देण्यात येणार आहेत. सोनपेठ तालुक्यातल्या सोनपेठ शिरशी, खडका, उखळी, वडगाव आणि नरवाडी या गावातल्या शाळांचा यात समावेश आहे.
****

 जालना जिल्हा वार्षिक विकास योजनेतून २०१९-२० या वर्षात २८६ कोटी ६० लाख रुपयांची विकास काम करण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात काल झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी ही माहिती दिली. 
****

 उस्मानाबाद तालुक्यातल्या सारोळा बुद्रुक ते शिंदेवाडी-म्हसोबापाटी या जवळपास साडे पाच  किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तीन कोटी ४१ लाख रूपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे सारोळा, शिंदेवाडी, वाघोलीसह या परिसरातल्या गावांना जोडणारे रस्ते दुरुस्त होणार असल्याचं ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांनी सांगितलं.
****

 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल इंग्लंडनं वेस्ट इंडिजवर आठ गडी राखून विजय मिळवला. या विजयानं इंग्लंड गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी पोहचला आहे.
*****
***

No comments:

Post a Comment