Sunday, 16 June 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 16.06.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१६ जून  २०१९ सकाळी ११.०० वाजता
****

 संसदेच्या अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज सुरळीत चालावं, यासाठी सरकार विरोधी पक्षाला सहकार्य करण्याचं आवाहन करेल, अशी शक्यता याबाबतच्या वृत्तात वर्तवली आहे. संसदेच्या या अधिवेशनात, येत्या २० तारखेला राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सदनांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. या अधिवेशनात मुस्लीम महिला विवाह संरक्षण अर्थात तिहेरी तलाक विधेयक, आधार आणि इतर कायदे सुधारणा विधेयक, आदी विधेयकं सादर केली जाणार आहेत. येत्या पाच जुलैला अर्थमंत्री निर्मला सीतारामन् २०१९-२० या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प लोकसभेत सादर करतील.
****

लुप्त होत चाललेल्या सर्व भारतीय भाषांना नवीन धोरणामुळे संरक्षण मिळेल, असं नवीन शिक्षण धोरणाच्या मसुदा समितीचे सदस्य प्रा. एम. के. श्रीधर  यांनी म्हटलं आहे. बंगळुरू इथं काल झालेल्या एका परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली प्रस्तावित राष्ट्रीय शिक्षण आयोग तयार केला जाईल, ज्यामध्ये शिक्षण तज्ज्ञांचा समावेश असेल, अशी ही माहिती श्रीधर यांनी यावेळी दिली.
****

 सुधारीत गोवर्धन, गोवंश सेवा केंद्र योजना, गोशाळेची अनुदानासाठी निवड करण्यास शासनानं मान्यता दिली आहे. इच्छुक स्वयंसेवी संस्थांनी पंचायत समिती मार्फत स्वयंपूर्ण प्रस्ताव येत्या ३० जूनपर्यंत जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त नांदेड या कार्यालयास सादर करावेत, असं आवाहन नांदेडच्या जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्तांनी केलं आहे.
****

 औरंगाबाद मधल्या तीसगाव, तसंच शहरातल्या काही भागांत, आमदार संजय शिरसाट यांच्या निधीतून ४० लाख रुपये खर्चाच्या विकास कामांचं उद्घाटन काल करण्यात आलं. यापुढेही विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
****
 आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत, भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा सामना आज इंग्लंडमधल्या मँचेस्टर इथं होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरू होणाऱ्या या सामन्याचं थेट समालोचन आकाशवाणी वरुन दुपारी २ वाजून ३० मिनिटांपासून प्रसारित केलं जाईल.
*****
***

No comments:

Post a Comment